हे फिरस्त्या काळा

सोडून काळा, ही सराई फिरस्त्या

धरशील रस्ता कोणता तू?

काल बाबिलोनी ठेविला मुक्काम

नंतर तू रोम गाठिलेस

आज मंदिरात साधु पॉलाचिया

विसावा घ्यावया थांबलास

एक तुझा पाय दिसे रिकिबीत

झाली इतक्यात हालचाल

जन्म झाला नाही अशा त्या स्थळास

जावया झालास उतावीळ


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

श्रीमती सौभाग्यवती – काशीबाई हेरलेकर यांस

तूं या दीन जना स्वबन्धुपदवी आर्यें ! कृपेने दिली,
तेणें बुद्धि कृतज्ञ ही तुजकडे आहे सदा ओढली;
भाऊबीज तशांत आज असतां, व्हावी न कां ती मला
वारंवार तुझी स्मृती, वितरिते आनन्द जी आगळा ?          १

जीं तूं पाठविलीं मला स्वलिखितें, मीं ठेविलीं सादर,
त्यांतें काढुनि होतसें फिरुनि मी तद्वाचनी तत्पर;
त्यांचा आशय तो प्रसन्न सहसा अभ्यन्तरीं पावतां,
होतो व्यापृत मी पुन: गहिंवरे-नेत्रांस ये आर्द्रता !             २

विद्वत्ता, सुकवित्व, गद्य रचनाचातुर्य, वाक्-कौशल;
चित्ताची समुदात्तता, रसिकता, सौजन्य तें दुर्मिळ,
ऐसे आढळती नरांतहि क्कचित् एकत्र जे सद्रुण,
त्यांही मण्डित पण्डिते सति ! तुला माझें असो वन्दन !    ३

माझ्या या हृदयांत तूजविषयीं सद्भाव जो वागतो,
तो अत्यादरयुक्त नम्र जन मी पायीं तुझ्या अर्पितो;
अंगीकारुनि गे स्वये ! समजुनी त्यालाच ओवाळणी;
ठेवीं लोभ सदा स्वबन्धुवरि या, नेच्छीं दुजें याहुनी.        ४


- नम्र बन्धु केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
फैजपूर,यमद्वितीया शके १८२५

संस्कृतीचा गर्व

विकट हासूनी काळ ओरडला,

"खुळ्यांनो, तुम्हाला भान नाही

हजारो हजार वर्षापाठीमागे

तुम्हा जावे लागे खुणेसाठी

कोण होता तुम्ही? पटली ओळख?

आता का रे सुख चुकविता?

हजारो हजार वर्षे लोटतील

प्राप्त ती होईल गती पुन्हा

नका वाहू व्यर्थ संस्कृतीचा गर्व

हारवीन सर्व क्षणमात्रे !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

असा तू प्रवासी विक्षिप्त रे !

मुख मागे पण पुढे तू चालशी

रीत तुझी अशी उफराटी

सरळ का तुझे पडते पाऊल !

तुझी वाटचाल नाही सुधी

तुझी कुरकुर पाउलागणिक

नेहमी साशंक मुद्रा तुझी

मागीलासंबंधी प्रशंसा अक्षयी

पुढीलांविषयी पूर्वग्रह

पुढे पुढे तरी चालत असशी

असा तू प्रवासी विक्षिप्त रे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

रामराज्य मागे कधी झाले नाही

रामराज्य मागे कधी झाले नाही

होणार पुढेही नाही कधी

केवळ ते होते गोड मनोराज्य

कल्पनेचे काव्य वाल्मीकिचे

कधीच नव्हती रावणाची लंका

अपकीर्ति-डंका व्यर्थ त्याचा !

दोन्ही अधिराज्ये होती मानवांची

नव्हती देवांची -दानवांची

भाविकांनो, झाली होती दिशाभूल

सोडूनी द्या खूळ आता तरी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आई मानवते

आई मानवते, आता तुझी काही

बघवत नाही विटंबना

आक्रोश तुझा गे ऐकवत नाही

बघवत नाही अश्रु तुझे

उन्मत्त जाहले शंभर कौरव

जाहले पांडव हतबुद्ध

द्रौपदीस छळी दुष्ट दुःशासन

मिळे त्या शासन प्राणांतिक

कोण कृष्ण तुझी राखावया लाज

अवतार आज घेणार गे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मानवाचा आला पहिला नंबर

पशूंचे एकदा भरे सम्मेलन

होते आमंत्रण मानवाला

"दुबळा, भेकड, क्षुद्र कोण प्राणी !"

करी हेटाळणी जो तो त्याची

"ऐका हो," बोलला अध्यक्ष केसरि

"जाहीर मी करी बक्षीस हे

क्रूर हिंसा-कर्मी उच्चाङक गाठील

पात्र तो होईल बक्षिसाला"

मानवाचा आला पहिला नंबर

लाजले इतर पशु हिंस्त्र !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या