कोण मला त्राता तुझ्यावीण ?

पतंगासारखे मन धावे स्वैर

त्याचा सूत्रधार तूच देवा,

मोहाच्या धुक्यात चुकतो मी मार्ग

तेव्हा पांडुरंग, वाटाडया तू

भवडोही माझी झुकताच होडी

चतुर नावाडी तूच होशी

संकटाचे येता धावून श्वापद

करिशी पारध तूच त्याची

अशी देवा, माझी वाहशी तू चिंता

कोण मला त्राता तुझ्यावीण ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कृतज्ञ होऊन मान समाधान

का रे करितोस आता कुरकुर

लागे हुरहुर कशाची रे ?

अनुकूल सुखे तुला एकंदर

तुझे शिकंदर नशीब रे

उगाच आणखी मागसी मागणे

धरिसी धरणे देवाद्वारी

काय कमी केले तुला देवाजीने

देशी का दूषणे सदाकदा ?

कृतज्ञ होऊन मान समाधान

तुला जे निधान दिले त्यात !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

वल्हव वल्हव प्रभो, माझी होडी

छेड छेड माझी प्रभो, ही सतार

निघू दे झंकार गोड गोड

फुलव फुलव माझे हे प्रसून

कराया पूजन देवा तुझे

पाजळ पाजळ माझी फुलवात

ठेव ती तेवत गाभार्‍यात

स्फुरव स्फुरव माझे भावगीत

होवो ते अर्पित तुझे पायी

वल्हव वल्हव प्रभो, माझी होडी

नेई पैलथडी तुझ्या गावा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

यापुढे मी नाही गाणार गार्‍हाणे

यापुढे मी नाही गाणार गार्‍हाणे

देणार दूषणे तुला नाही

बोलणार नाही तुजला नवस

व्यर्थ हे सायास करीत मी

संकटा भिऊनी नाही मी यापुढे

तुजला साकडे घालणार

असंख्य पातके केली देवराया,

नाही निस्तराया सांगणार

आधी सुधारीन माझी वागणूक

प्रेरणाच एक हवी तुझी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आता भीत भीत तुला मी बाहत

आताशी मजला सय तुझी झाली

होती जी बुझली आजवेरी

सम्राट होतो मी आपुल्या राज्याचा

भिकारी दारचा झालो आता

ठेंगणे मजला तेव्हा अंतराळ

चंडोल घायाळ खाली आलो

धुंदीचे सोडून धुके भवताल

आत मी खुशाल गर्क होतो

आता भीत भीत तुला मी बाहत

साशंक पाहत आसपास


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बाळ तुझे गेले भेदरुन भारी

तुवा अचानक सोडून वादळ

किती रे गोंधळ माजवीला !

पाहायाची होती मौज वा कसोटी !

काय हेतु पोटी होता तुझ्या ?

वावटळीमध्ये सापडावे पीस

तसा कासावीस झालो तेव्हा

बागुलाचें भय आई दाखवीते

पोटाशी धरिते लागलीच

बाळ तुझे गेले भेदरुन भारी

आंजारी गोंजारी प्रभो, तया


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा - वसुंधरेवर खरा तू मानव

तपश्चर्या तुझी चालली कधीची

अगा हे दधीचि ऋषिश्रेष्ठा,

वसुंधरेवर खरा तू मानव

जिंकिले दानव अहिंसेने

करोत प्रळय स्फोटक असंख्य

तुझे गा अजिंक्य आत्मबळ

स्थापाया शांतीचे अहिंसाप्रेरक

दलितोद्धारक लोकराज्य

आपुल्या अस्थींचे निर्मूनीया वज्र

पारतंत्र्य-वृत्र संहारिला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या