चिमुकले बाळ आहे मी अल्लड

चिमुकला तारा करी लुकलुक

तयाचे कौतुक रात्र करी

चिमुकले फूल वेलीवरी डुले

वनदेवी भुले पाहून ते

चिमुकला झरा वाहे खेळकर

नदी कडेवर त्याला घेई

चिमुकले फूलपाखरु गोजिरे

करी ते साजिरे उपवन

चिमुकले बाळ आहे मी अल्लड

देव माझे लाड पुरवीतो


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

सुरेल वाजीव बन्सी पुन्हा

अगा गोकुळाच्या बहिश्वर प्राणा,

अवतार कृष्णा, घेई पुन्हा

नंदयशोदेच्या कन्हय्या केशवा,

घेऊन शैशवा येई पुन्हा

हास्यविनोदाचे फुलव राजीव

सुरेल वाजीव बन्सी पुन्हा

गुंजमाळ गळा, शिरी मोरपिसे

लाव आम्हा पिसे तुझे पुन्हा

झाला हा भारत दारिद्रे व्याकुळ

समृद्ध गोकुळ आण पुन्हा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोण माझा घात करणार ?

आहेतच तुझे स्कंधी माझ्या हात

कोण माझा घात करणार ?

प्रसंग मोठाले आले आणि गेले

निभावून नेले तूच मला

जे जे मी वांछिले ते तू मला दिले

नाही पडू दिले कमी काही

घडले हातून कैक अपराध

परी पदरात घातले तू

तरी माझी आहे चालली हाकाटी

असा जगजेठी, करंटा मी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

केव्हाची मी तुझी पाहताहे वाट

केव्हाची मी तुझी पाहताहे वाट

परी पदरात निराशाच !

केव्हाच माध्यान्ह टळूनीया गेली

पसरु लागली संध्या छाया

पुढती गेलेल्या कारवानांचिया

लागल्या यावया हाका कानी

तरी रेंगाळत चाललो मी आहे

तुला शोधिताहे आसपास

नाही सोसवत आता ओढाताण

होऊ लागे प्राण कासावीस


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

प्रभो, तुझ्या एका मंगल नामात

एका सूक्ष्म बीजावरी गेले लक्ष

त्यात महावृक्ष दिसे मला

बालनिर्झराच्या उगमात मला

आढळून आला महानद

बोल निघे बालकवीच्या तोंडून

ऐकिले त्यातून महाकाव्य

एका अणुमाजी शास्त्रज्ञ पाहती

कोटिविश्वशक्ती भरलेली

प्रभो, तुझ्या एका मंगल नामात

स्वरुप विराट सामावलें


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोण मला त्राता तुझ्यावीण ?

पतंगासारखे मन धावे स्वैर

त्याचा सूत्रधार तूच देवा,

मोहाच्या धुक्यात चुकतो मी मार्ग

तेव्हा पांडुरंग, वाटाडया तू

भवडोही माझी झुकताच होडी

चतुर नावाडी तूच होशी

संकटाचे येता धावून श्वापद

करिशी पारध तूच त्याची

अशी देवा, माझी वाहशी तू चिंता

कोण मला त्राता तुझ्यावीण ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कृतज्ञ होऊन मान समाधान

का रे करितोस आता कुरकुर

लागे हुरहुर कशाची रे ?

अनुकूल सुखे तुला एकंदर

तुझे शिकंदर नशीब रे

उगाच आणखी मागसी मागणे

धरिसी धरणे देवाद्वारी

काय कमी केले तुला देवाजीने

देशी का दूषणे सदाकदा ?

कृतज्ञ होऊन मान समाधान

तुला जे निधान दिले त्यात !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या