परी बाळाला सकळ ती समान

तीन वर्षांचा बाळ गोड आला। नसे सीमा जणु त्याचिया सुखाला
हास्य त्याच्या मुखि गोड किति साजे। मूर्ति गोंडस ती गोजिरी विराजे।।

अधर मधुर तसे गोड गाल डोळे। सुखानंदाने भरुन जणू गेले
काय झाले सुख एवढे अपूर्व। तया बाळा, ज्यापुढे तुच्छ सर्व।।

“काय सापडले? हससी का असा रे। लबाडा सांग सांग सारे”
प्रश्न ऐकुन लागला हसायाला। अधिक निज मोदा दाखविता झाला।।

खिशामाजी तो बाळ बघू लागे। “काय आहे रे त्यात मला सांगे”
फिरुन हसला मत्प्रश्न ऐकुनी तो। कौतुकाने परि पुन्हा तो पहातो।।

हास्य ओठांतुन दाबल्या निघाले। बाळकाने मग फूल काढियेले
खिशातूनी ते गोड गुलाबाचे। दिव्य सुंदर सदधाम सुगंधाचे।।

काढि बाळक ते प्रथम फूल एक। दुजे काढी मग त्याहुनी सुरेख
आणि तिसरे ते कण्हेरिचे लाल। सकल संपत्ति प्रकट करी बाळ।।

परी राहे सुम अजुन एक आत। खिशामाजि पुन्हा घालि बाळ हात
फूल चौथे बाहेर काढियले। सर्व सुकलेले वाळुन जे गेले।।

चार पुष्पे मज दाखवून हासे। चार पुष्पे मज दाखवून नाचे
पुन्हा चारीही ठेवि ती खिशात। हसुन बाळक तो दूर निघुन जात।।

तीन पुष्पे रमणीय गोड छान। परी चवथे ते गलित शुष्क दीन
तुम्ही म्हटले असतेच तया घाण। परी बाळाला सकळ ती समान।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२९

ग्रंथमहिमा

दु:खाला जे विसरवनिया दिव्य आनंद देती
एकांती जे परम निकट स्नेहि सप्रेम होती
चित्ती ज्यांच्या मुळि न शिवतो भेद हा साव चोर
सर्वांनाही सुखवित सदा ग्रंथ हे संत थोर।।

कोणी येवो पुरुष वनिता बालिका बाल वृद्ध
सर्वा देती सुरस, करिती बुद्धिते जे समृद्ध
गांभीर्याते किति तरि पहा जीवनी आणितात
आपन्मग्ना हत-जन-मना ग्रंथ हे तातमात।।

तुम्हां द्याया सतत असती ग्रंथराजे तयार
पावित्र्याची परम विमला ज्ञानपीयूष-धार
जी संसारी तृषित हृदये ग्रंथ हे ज्ञानसिंधु
त्यांना होती मधुर, निवती सेविता एक बिंदु।।

झाले गेले कितिक परि ते ग्रंथ आहेत नित्य
आनंदाला वितरुन जगा दाविताती सुपंथ
सेवा धामी विपिनि करिता ग्रंथ तैशीच कारी
नाही सा-या भुवनि असले मित्र नित्योपकारी।।

रात्री प्रात:समयि उघडा ग्रंथ केव्हाहि वाचा
युष्मत्सेवा विपुल करणे हाच आनंद त्यांचा
हिंडायाची अविचलमने काळसिंधूवरून
ज्याला इच्छा, फिरविति तया ग्रंथ हातात धरून।।

नानालापे रमविति मना ग्रंथ ही गोड वेणू
जे जे वांछी मन वितरिती ग्रंथ ही कामधेनू
मातीलाही कनक करिती लाजवीती परीस
नाही मोठा हितकर सखा अन्य ग्रंथापरीस।।

आयुष्याची हितकर दिशा ग्रंथ हे दाखवीती
जीवित्वाची शिकविति कला नूतना दृष्टि देती
उन्मत्तांना नमविति विपदग्रस्त त्या हासवीती
प्रज्ञावंत स्थिर करुनिया मूर्ख त्या लाजवीती।।

संबोधूनी करिति जगदुत्कर्ष हे ग्रंथ साधे
ग्रंथलोके मनुजमतिला कार्यकौशल्य लाधे
नि:स्वार्थी हे अखिल-भुवनाचार्य सदग्रंथ दिव्य
मानव्याला उचलिति वरी पंथ दावीत भव्य।।

माता भ्राता प्रियसख गुरु तात वा रम्य कांता
नानारुपे रमविति पहा ग्रंथ हे मानवाता
जे ना कोणाप्रतिहि कथिले ग्रंथकारे विचार
ते या ग्रंथी प्रकट, उघडे अंतरातील सार।।

सांगे ना जी प्रियतमजनापाशिही ग्रंथकार
ओती ती हो खळबळ इथे, विवृत स्वांतदर
पापुद्रे ते सकळ दिसती चित्तकंदावरील
येई सारे हृदय कळुनी गूढ गंभीर खोल।।

ग्रंथाकारे विमल अमरा दिव्यरंगा समाधी
लावण्याची परम मधुरा लेखक स्वीय बांधी
कैसे तेथे झळकति हि-यांसारखे सद्विचार
जैसे नानाविध मणि तसे भावनांचे प्रकार।।

ग्रंथामाजी अमर असती दिव्य चैतन्यरुप
कर्ते, विश्वा सुखविति सदा मोद देती अमूप
केव्हाही ना मृति शिवतसे थोर सदग्रंथकारा
लोकोद्धारा निशिदीन उभा द्यावया ज्ञानधारा।।

त्रैलेक्यी या फिरविति तुम्हां ग्रंथ देऊन पंख
तत्त्वज्ञानी कवि मुनि तसे भेटती राव रंक
अंतर्यामी उसळविति ते गोड आनंदपूर
केव्हा केव्हा रडविति किती गाउनी दु:खसूर।।

संसाराचे त्रिविध मनुजा दाविती ग्रंथरुप
नाना रुपे मनुजहृदया ज्ञान देती अमूप
छेडोनीया तरल हृदयी सूक्ष्म तारा अनंत
जीवात्म्याला परिसविति ते दिव्य संगीत ग्रंथ।।

जे जे काही घडत असते मानवी जीवनात
अंतर्बाह्य प्रकट करिती ग्रंथ सामर्थ्यवंत
अंत:सृष्टी गुरु किती तरी बाह्यसृष्टीपरीस
ते सदग्रंथांवरुन कळते होइ अंतर्विकास।।

केव्हाही दुर्मुख न दिसती ग्रंथ नित्य प्रसन्न
ना कोणाला कथितिल कधी गोष्टी त्या भिन्न भिन्न
ग्रंथांऐसे परमसुख ना देखिले या जगात
ग्रंथी होता निरत मज तो होउ दे मृत्यु प्राप्त।।

आदर्शाला, शुभ अशुभ वा स्वीय रुपा बघाया
देती ग्रंथ स्वकरि मनुजा, या मिषे उद्धाराया
‘सत्याचा तो विजय ठरला, सत्य पूजा सदैव’
सदग्रंथी हे सतत असते सूत्र हो एकमेव।।

माते ना ते विभव रुचते राजवाडे नको ते
नाते गोते मजसि नलगे नाम मोठे नको ते
वस्त्रांची ती तलम न रुची ना अलंकार काम
व्हावे माझ्या निकट परि हे ग्रंथ कैवल्यधाम।।

रात्री माझ्या निकट असु दे तैलसंपूर्ण दीप
इच्छा नाही इतर असु दे ग्रंथराजे समीप
कोठे रानी मग सदनि वा अन्य देशी तुरुंगी
आनंदाने परिहरिन मी काळ सदग्रंथ-संगी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

गुढीपाडवा

नूतन संवत्सर आला। मोद मनाला बहु झाला
घालुन सुंदर सडे पथी। शोभा करिती लोक किती
उंच गुढी ही उभारली। चमके तेजे नभ:स्थळी
सुंदर पट सुंदर माळा। गुढी सजवली सुमंगला
मंद वायुने कशी डुले। जनमतिकलिका मुदे खुले
विसरा मागिल शुभाशुभ। नूतन करणे आरंभ
विसरा मागिल कलहाना। विसरा मागिल अपमाना
विसरा दुष्कृति मागील। टाका पुढती पाऊल
मागिल मंगल घेऊन। पुढेच जाऊ चालून
निर्मा उज्ज्वल आकांक्षा। निर्मा हृदयी शुभ वांछा
नूतन जीवन सजवावे। आशेने पुढती जावे
दु:ख दैन्य नैराश्य कथा। हरु संहरु जगदव्यथा
आनंदरसा निर्मू या। विपुल समस्ता देऊ या
आनंदाचे साम्राज्य। स्वातंत्र्याचे साम्राज्य
मांगल्याचे साम्राज्य। भूवर निर्मू या आज
चला सकल सवंगडे तुम्ही। आपणास ना काहि कमी
स्वर्ग धरित्रीवर आणू। पृथ्वी मोदाने न्हाणू
विजयध्वज उभवू दिव्य। स्वातंत्र्याचे ते भव्य
चला उभारा गुढी उंच। कुणी न राहो जगि नीच
करु वर अपुल्या या माना। घेऊ सन्मानस्थाना
गुढी नाचते गगनात। श्रद्धा नाचे हृदयात
सदैव आशा बाळगुन। सदैव विजयी होऊन
गुढीपाडवा शुभंकर। करु साजरा खरोखर।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९९९

नागपंचमी

अजि नागपंचमीचा। आला पवित्र वार
निज अंतरंगी आज। राखा मुळी न वैर
हृदयात प्रेमपूर। भरपूर आज वाहो
आनंद सर्व जीवा। जगतात आज राहो
हा नागपंचमीचा। दिन थोर थोर साचा
जो सर्प मूर्त मृत्यु। त्यालाहि पूजण्याचा
मृत्युहिही गोड माना। सर्पाहि पूज्य माना
जो दुष्ट घेइ चावा। त्यालाहि देव माना
सर्वांतरी सदंश। सर्वात सच्चिदंश
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
प्रेमा सदैव देऊ। अवघ्या चराचरास
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
नागाहि पूज्य मानू। त्या प्रेम गोड देऊ
मग बंधुबंधु आम्ही। किति गोड रीति राहू
हा थोर थोर दिवस। दिधला तुम्हां आम्हांस
घालून पूर्वजांनी। प्रेमा शिकावयास
वर्षात एक दिवस। ना सुष्ट दुष्ट पाहू
दिनी ह्या तरी निदान। सर्वांस प्रेम देऊ
अद्वैत तत्त्व थोर। कर्मात आणण्यास
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
ती संस्कृती उदात्त। अपुली शुभा अनंत
जणु साठवीत एका। ऋषि नागपंचमीत
त्या थोर पूर्वजांची। पाहून थोर दृष्टी
मज येतसे भरुन। ही होइ अश्रुवृष्टि
डोळ्यांमधून आज। वाहोत प्रेमगंगा
सौख्यांबुधीत सारे। या रे विशंक डुंबा
वाणीमधून आज। माधुर्य ते स्त्रवू दे
करणीमधून सर्व। स्नेहामृता झरू दे
वेलीवरील फूल। तेही न आज तोडा
हिरव्या तणांकुराला। त्याही न आज तोडा
काडी न आज मोडा। लावा कुणा ढका न
प्रेमात आज राहो। सृष्टी उभी बुडून
घ्या फावडे न कुदळ। असतील जीवजंतू
दुखवा न त्यांस आज। आणा न त्यांस अंत
भूमाय ही क्षमेची। मूर्ती तिला न दुखवा
न खणा मुळीच आज। गाऊन गीत सुखवा
जगतात आज कोणा। भयभीति ती नसू दे
आजी परस्परांत। विश्वास तो वसू दे
लघु जीव कीड मुंगी। तृणपर्ण मृत्कणाही
दुखवी न आज बंधो। सर्वत्र देव पाहि जीव
सर्वत्र आत्मतत्त्व। समदृष्टि थोर ठेव
सकलांहि त्या सणांत। ह्या नागपंचमीस
आहे महत्त्व फार। वाटे मदंतरास


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

दसरा

आला दसरा, रमणीय सुखाचा हसरा।। आला....।।

माझे मम ही सीमा लंघा
शमवा अंत:कलिचा दंगा
परोपकारामाजी रंगा
दु:खा विसरा।। रमणीय....।।

अज्ञानाची संपो रात्री
लावा ज्ञानाच्या त्या ज्योती
भू-मातेची मंगल किर्ती
भुवनी पसरा।। रमणीय....।।

सदगुण-सोने आज लुटू या
दुर्गुण सारे दुरी घालवु या
निज-चित्तावर मिळवू विजया
हे ना विसरा।। रमणीय....।।

मनावर जरी विजय मिळेल
स्वातंत्र्यादिक सहज येतिल
भाग्यश्री ती धावत येइल
शंका न धरा।। रमणीय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

संक्रांत

मकर-संक्रांत
सुखाच्या सुकाळा
चला हलवा करु
या रे सारी जणे
कलह-मत्सर
शेगडी पेटवा
कळकळ तळमळ
शेगडीच्यावर
स्नेहाचे घ्या तिळ
भक्तीच्या शर्करे
औत्सुक्याच्या हाते
सुंदर हलवा
प्रेमाचे रोमांच
पितळी ती फुले
दयेचा श्रद्धेचा
रंग केशराचा
दिव्य हा हलवा
मने जोडणारा
चला एकमेकां
गोडीने या राहू
आली शुभ वेळा
चला करु
मोढ्या आनंदाने
श्रमावया
कोळसे जमवा
हृदयाची
पितळी सुंदर
द्या ठेवून
निर्मळ साजिरे
पाक करा
हळूच हलवा
होऊ लागे
काटा हाच खुले
हलव्याने
सहानुभूतीचा
हाच शोभे
मने मोहणारा
अभिनव
देऊ घेऊ खाऊ
संसारात


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

लहान मित्राबद्दल!

असे माझा मित्र हो लहान। तदगुणांचे परि सकल करिति गान
ऐकुनीया किति सौख्य होइ माते। असे ठाव ते फक्त मन्मनाते।।

दृष्टी निर्मळ मुखमंडल प्रसन्न। दिसे न कधी तो कुणालाहि खिन्न
दु:ख निज लपवी, अन्य दु:ख जाई। हरायाते तो सदोदीत पाही।।

वीणिमाजी वाहते प्रेमगंगा। करि न कोणाच्या कधी मनोभंगा
हृदय हाळु त्यांचे फुलापरी रम्य। कार्यशक्ति परी तदीया अदम्य।।

शील त्याचे सर्वांशि निष्कलंक। करी जवळ सदा गोरगरिबरंक
गर्व चित्ताला नसेच तो ठावा। जगन्मित्र जणू कुणाशी न दावा।।

अंतरंगी खेळवी सद्विचार। घडे हातुन सर्वदा सदाचार
जरी घडली हातून अल्प चूक। अश्रु आणिल लोचनी करिल शोक।।

निज स्वल्पहि अपराध घोर मनी। परी दुस-याचा चित्ति कधी नाणी
जरी दुस-याचा अल्प गुण दिसेल। स्तवन त्याचे करुनिया मनि सुखेल।।

देशभक्तीचा तदंतरी पूर। देशसेवेचा हृदयि उठे सूर
वस्तु परदेशी सदा ठेवि दूर। तया स्वातंत्र्याचीच हूरहूर।।

स्वता वापरुनी शुद्ध साधि खादी। वळवि परमनही गोड वचें बोधी
कार्य करुनी जो ना कधी वदेल। निज स्तुति ऐकुन लाजुन जाईल।।

कार्य दुस-याचे सतत ये कराया। स्वयंसेवक तो स्रवदा सहाया
असा नाही पाहिला युवा अन्य। बघुनि त्याला वाटते धन्य धन्य।।

मुखी त्याच्या ते हास्य सदा गोड। शब्द अमृतासम नाहि तया जोड
प्रेमपूर्ण किती सरळ मधुर डोळे। दिव्य सुंदर ते तेज भाळि खेळे।।

दंत निर्मळ ते जणू मोतियांचे। अधर पातळ जणू वेल पोवळ्यांचे
नाक सरळ परी जरा बाकदार। दिसे मुद्रा दिलदार ती उदार।।

सदा गाठाया ध्येय उच्च पाही। सदा दिनदिन जो वरति वरति जाई
थोर त्याचे ते जीवन मज वाटे। तया पाहुन गहिवरे हृदय दाटे।।

असे त्याला शुभ नाम नामदेवष करो नामासम वर्तना सदैव
नाम अन्वर्थक देवराय होवो। तुझी त्याच्यावर सर्वदा दया हो।।

प्रभो! तुमच्या मी लागतसे पाया।  तयावर ठेवा सदा दया-छाया
मनोरथ त्याचे पूर्ण करा देवा। तच्छिरावरती वरदहस्त ठेवा।।

मदायुष्यहि हे तयालागि द्यावे। असे जे जे मत्सत् तयास द्यावे
प्रभो! सांभाळी त्यास तू कृपेने। सकल संकट मोहादि लयाते ने।।

दयासिंधो हे दीनबंधु देवा। असे माझी प्रार्थना एकमेवा
मित्र माझा मत्प्राण जणू अन्य। कृतार्थ करा तज्जीवनास धन्य।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७