जीवनार्पण

जीवनसुमना मदीय देवा! त्वच्चरणी वाहिन
दुसरी आणिक इच्छाच न
मकरंद तू घे तूच गंध घे सुंदरता तू बघ
तव सेवेतचि सुकुंदे शुभ
आहे गंध काय तो परी
आहे सुंदरता का तरी
आहे रस तरि का तिळभरी
असो कसेही तुला आवडो, गोड करुन घेउन
सुखवी प्रभुवर माझे मन।।

जर भिकारी जीवन माझे तरि तुज ते अर्पिन
हृदयी धरिशिल ते तोषुन
रित्या जीवना तव हस्ताचा स्पर्श सुधामय घडे
तरि परिपूर्णतेस ते चढे
त्वस्त्मित-किरण जीवनांबरी
पडतील दोनचार ते जरी
तरि ते होइल रे भरजरी
स्वताच ते मग निजांगावरी बसशिल तू घालुन
जाईन देवा मी लाजुन

धृवपाळाच्या मुक्या कपोला शंख लाविला हरी
वेदोच्चारण मग तो करी
मदीय जीवन अरसिक रिक्त प्रभु तू भरिशिल रसे
जरि तुज देइन ते सौरसे
ये, ये, जीवन घे तू मम
मत्करधर्ता ना त्वत्सम
प्रकाश दे मज घेउनि तम
रिता घडा मी तुला देउनी क्षीरांबुधि मिळविन
मज मौत्किक परि तुज मृत्कण।।

सख्या अनंता मनोवसंता घे मम जीवनवन
आहे निष्फळ हे भीषण
विचारतरु तू फुलवी फळवी लाव भावनालता
स्फूर्ति-समीरे आंदोलिते
सदगानांचे कूजवि पिक
सत्कर्माचे हासवि शुक
येवो भावभक्तिला पुक
जगी न अन्या फुलवाया ये हे हन्नंदनवन
फुलवी तूच जगन्मोहन।।

प्रभु तव चरणी जीवनयमुना माझी ही ओतिन
तव शुभ चरण प्रक्षाळिन
त्वत्पद- धूलि स्पर्शायाला यमुना कशि तडफडे
वरवर धडपडुनी ती चढे
वसुदेवाच्या हातातला
पद लांबवुनि तुवा लाविला
आत्मा यमुनेचा तोषला
तुझ्या पदाच्या स्पर्शासाठी देवा मज्जीवन-
यमुना तडफडते निशिदिन।।

तनमन माझे तुला वाढले जीवनपर्णावरी
यावे प्रभुजि आता लौकरी
पांचाळीच्या पानास्तव त्या अधीर झाला कसे
या ह्या दीनास्तवही तसे
पांचाळीच्या पानी चव
मम तममनाहि ती ना लव
तरि करि बाळाचे गौरव
किति विनवू मी किति आळवु मी कंठ येइ दाटुन
यावे धावुन मनमोहन।।

आला आला कृष्णकन्हैय्या राधाधर- लोलुप
प्रिय ज्या भावभक्तिचे तुप
आला आला शबरीची ती खाणारा बोरके
आला तोषणार गोरसे
जीवनपात्र तयाच्या पुढे
केले तनमन वाढुन मुदे
माझी दृष्टि तत्पती जडे
जीवनयमुना गेली तत्पदगंगेमधि मिसळुन
गेला जीव शिवचि होउन।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मार्च १९३३

जीवनात माझ्या सदा राम गुंफिन

जीवनात माझ्या सदा राम गुंफिन
सकळ इंद्रियांनी माझ्या राम चुंफिन।। जीव....।।

सत्यं शिवं सुंदराचे
पूजन मी कारिन साचे
ह्यास्तव मी या जीवाचे
मोल अर्पिन
राम गुंफिन।। जीव....।।

विमलभाव सरलभाव
मधुरभाव प्रेमभाव
सेवा नि:स्वार्थभाव
त्यात ओतिन
राम गुंफिन।। जीव....।।

ज्ञान, भक्ति, कर्म तीन
पदर असे दृढ धरुन
श्रद्धेने पीळ भरुन
मोक्ष मिळविन
राम गुंफिन।। जीव....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

तुजसाठि जीव हा उरला

कारुण्यवसंता रामा। तुजसाठि जीव हा उरला।।
या जगात तुजविण कोणी। नाहीच खरोखर रामा
तू हृदयी असुनी देवा। का चित्त भुलतसे कामा
तुज सदैव हृदयी धरुनी। तव गोड गाउ दे नामा
तुज सदैव मी आळविन
तुज सदैव मी आठविन
तू जीवन मी तर मीन
तुजविण जीव घाबरला।। तुजसाठि....।।

हृदयात जरी तू नसशी। मी अनंत मोही पडतो
तुजलगी विसरुन रामा। शतवार पडुन मी रडतो
तू नको कधीही जाऊ। हृदयातुन तुज विनवीतो
जरि मूल चुकुन दुर जाई
वापीत पडाया पाही
धरि धावत येउन आई
रघुवीर तेवि धरि मजला।। तुजसाठि....।।

जरि इतर वस्तु हृदयाशी। निशिदिन मी प्रभुवर धरितो
हृदयाच्या आतिल भागी। तुजशीच हितगुज करितो
एकांती बनुनी रामा। तुजला मी स्मरुनी रडतो
तव चरण मनि येवोनी
तव मूर्ति मनी येवोनी
येतात नेत्र हे भरुनी
कितिकदा कंठ गहिवरला।। तुजसाठि....।।

बसुनिया रघुवरा दोघे। करु गोष्टी एको ठायी
ठेवीन भाळ मम देवा। रमणीय तुझ्या रे पायी
प्रेमांबुधि गंभिर तेव्हा। हेलावुन येइल हृदयी
मन तुझ्याच पायी जडु दे
तनु तुझ्याच पायी पडु दे
मति तुझ्याच ठायी बुडु दे
तुजवीण गति दुजी न मला।। तुजसाठि....।।

एकची आस मम रामा। तू ठेव शिरी मम हात
होईन पावनांतर मी। मंगल तूच मम तात
त्वत्पर्श सुधामय होता। संपेल मोहमय रात्र
कधि मोह न मग शिवतील
पापादि दूर पळतील
भेदादि भाव गळतील
सेवीन सदा पदकमला।। तुजसाठि....।।

जे आवडते तुज देवा। ते करोत माझे हात
जे आवडती तुज देवा। ते शब्द ओठ बोलोत
जे आवडती तुज देवा। ते विचार मनि नांदोत
तनमनमती तुज अर्पीन
सेवेत सतत राबेन
जाईन त्वत्पदी मिळुन
ही इच्छा पुरवी विमला।। तुजसाठि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, एप्रिल १९३३

करुणाष्टक

अहा चित्त जाई सदा हे जळून। मला दु:ख भारी, श्रमे मी रडून
पुशी कोण नेत्रांतली अश्रुधार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

वनी निर्जनी दीप जेवी दिसावा। दिसोनी झणि तोहि वाते विझावा
तसा येउनी जातसे सद्विचार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

मला षड्रिपू भाजिती गांजिताती। मला वासना सर्वदा नागवीती
तुझ्या भक्तिची वाजू दे एकतार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

मदीयांतरी दिव्य पावित्र्य साजो। तया पाहुनी सर्वही पाप लाजो
असो मन्मती सन्मतीचे अगार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

असज्जीवने मी अहोरात्र खिन्न। न ये नीज माते, रुचे ते न अन्न
मदीयांतरंगावरी घोर भार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझा एक आधार ना अन्य माते। तुझा बाळ सांभाळ हे विश्वमाते
मला कष्टवीतात नाना विकार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझा एक विश्वास विश्वा समस्त। असत्कल्पनांचा करी शीघ्र अस्त
कृपेने मनाचा हरी अंधकार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

दिसो प्रेमळा निर्मळा वृत्ती नेत्री। वसो पुण्यता माझिया नित्य वक्त्रीं
मनी नित्य नांदोत ते सद्विचार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझे फूल मी होउ दे सद्विकास। तुझे मूल माते तुझी एक आस
किती प्रार्थु मी सांगु मी काय फार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, १९३०

जीवनबाग

(नाचत म्हणावयाचे गाणे)

प्रभु माझी जीवनबाग सजव।।

कुशल तू माळी
बाग सांभाळी
स्वर्गीय सौंदर्ये ती रे खुलव।। प्रभु....।।

गत काळातिल
सगळा खळमळ
भरपूर येथे खताला सडव।। प्रभु....।।

द्वेष मत्सर
हेची फत्तर
फोडुन, प्रेमाचे वृक्ष फुलव।। प्रभु....।।

मोह विकार
बाग खाणार
वैराग्य-दंडाने त्यांना घालव।। प्रभु....।।

तव करुणेचा
मंगलतेचा
शिवतम वसंतवारा वाहव।। प्रभु....।।

दृढ श्रद्धेचे
सद्भक्तीचे
सुंदर मांदार येथे डुलव।। प्रभु....।।

उत्साहाची
आनंदाची
थुइथुई कारंजी येथे उडव।। प्रभु....।।

धृताचे अभिनव
घालुन मांडव
त्यावर शांतीचे वेल चढव।। प्रभु....।।

चारित्र्याचे
पावित्र्याचे
शीतल शांतसे कुंज घडव।। प्रभु....।।

सत्प्रतिभेचे
सतज्ञानाचे
गुंगूगुंगू मिलिंद गुंगव।। प्रभु....।।

सहजपणाचे
सतस्फूर्तीचे
करु देत विहंगम गोड रव।। प्रभु....।।

परमैक्याचा
झोला साचा
बांधुन त्यावर जीव झुलव।। प्रभु....।।

फुलवुन जीवन
तेथे निवसुन
मग गोड गोड तू वेणू वाजव।। प्रभु....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

भाग्याचे अश्रु

अनुताप- आसवांनी। कासार मानसाचे
भरते तुडुंब तेव्हा। ती भक्तिवेल नाचे
त्या भक्तिवेलावरती। चित्पद्म ते फुलेल
येऊनिया मुकुंद। मग त्यात तो बसेल
रड तू सदैव बाळा। भरु दे तुडुंब हृदय
येईल भक्ति मग ती। होईल सच्चिदुदय
ते भाग्यवंत अश्रु। जवळी तुझ्या विपूल
हसशील लौकरीच। जरि आज तू मलूल


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मार्च १९३२

तळमळतो रे तुझा तान्हा

तळमळतो रे तुझा तान्हा।।
कामधेनु तू माझी देवा
चोरु नको रे अता पान्हा। तळमळतो....।।

धन कृपणाला जल मीनाला
तेवि मला तू सख्या कान्ह्या। तळमळतो....।।

गोकुळि गोरस सकळां दिधला
प्रभुजि अजी ते मनी आणा। तळमळतो....।।

अजुन दया जरि तू ना करिशिल
ठेवु कशाला तरि प्राणा। तळमळतो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२