कापनी

आतां लागे मार्गेसर

आली कापनी कापनी

आज करे खालेवर्‍हे

डाव्या डोयाची पापनी

पडले जमीनीले तढे

आली कापनी कापनी

तशी माझ्या डोयापुढें

उभी दान्याची मापनी

शेत पिवये धम्मक

आली कापनी कापनी

आतां धरा रे हिंमत

इय्ये ठेवा पाजवुनी

पिकं पिवये पिवये

आली कापनी कापनी

हातामधी धरा इय्ये

खाले ठेवा रे गोफनी

काप काप माझ्या इय्या,

आली कापनी कापनी

थाप लागली पीकाची

आली डोयाले झांपनी

आली पुढें रगडनी

आतां कापनी कापनी

खये करा रे तय्यार

हातीं घीसन चोपनी

माझी कापनी कापनी

देवा तुझी रे मापनी

माझ्या दैवाची करनी

माझ्या जीवाची भरनी


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

काही कळेना, काही वळेना

काही कळेना, काही वळेना।।
निरभ्रशा अकाशात
कुठूनशी अभ्रे येत
झणी सूर्य झाकोळीत
तेज ते पडेना।। काही....।।

जरा वरी येई मोड
कुठूनशी तो ये कीड
खाइ अंकुराला गोड
वाढ ती घडेना।। काही....।।

पतंग जो वरती जाई
तोच उलट वारा येई
क्षणामध्ये गोता खाई
तो वरी चढेना।। काही....।।

मला गमे तोची आला
उठे मिठी मारायला
परी भास सारा ठरला
तो कधी मिळेना।। काही....।।

अशी निराशा ही फार
जीव होइ हा बेजार
लोचनीचि अश्रूधार
ही कधी सुकेना।। काही....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, एप्रिल १९३४

आईचा मार

आई! आई! तू मज मार मार।।

मारुन मारुन मजला रडवी
चाबुक उडवुन रक्ता उडवी
लावी मन्नयनांस धार।। आई....।।

लाल तुझ्या परि दृष्टीखाली
प्रेमसुधेची गंगा भरली
दिसते गे अपरंपार।। आई....।।

मारुन मारुन तूची रडशिल
जवळी ओढुन मजला घेशिल
तुज दु:ख होईल फार।। आई....।।

माडीवरती मज बसवशिल
हनुवट धरुनी मज हसवशिल
घेशिल मुके वारंवार।। आई....।।

प्रेमे तुजला मी बिलगेन
तव अश्रूंचे मजला स्नान
हरपेल मम दु:खभार।। आई....।।

आई! तुझा मज रुचतो मार
त्याहुन नाहि दुजे मज प्यार
मारुन मारुन तार
मारुन करि उद्धार।। आई....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

दिव्य आनंद

दिव्य आनंद
मन्मना एक गोविंद।।

विषयवासना मम मावळली
सकल अहंता माझी गळली
वृत्ती प्रभोरूपोन्मुख वळली
न दुजा छंद।। मन्मना....।।

ख-या सुखाचा झरा मिळाला
भेदभाव तो सकल निमाला
आज तपस्या येइ फळाला
तुटले बंध।। मन्मना....।।

भावभक्तिची गंगा भरली
ज्ञानपंकजे सुंदर फुलली
अपार शांती हृदयी जमली
सुटला गंध।। मन्मना....।।

सम मम आता डोळे उभय
सम मम आता प्रेमळ हृदय
परम सुखाया झाला उदय
मी निष्पंद।। मन्मना....।।

शांत समीरण, शांत अंबर
शांत धरित्री, शांत मदंतर
रहावया येतसे निरंतर
गोड मुकुंद।। मन्मना....।।

अता जगाची सेवा करित
दीनदु:खितां हृदयी धरित
नेइन जीवन हे उर्वरित
मी स्वच्छंद।। मन्मना....।।

अशांत अस्थिर लोकां पाहुन
तळमळती हे माझे प्राण
त्यांना आता नेउन देइन
सच्चित्कंद।। मन्मना....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

कैसे लावियले मी दार

पडला हा अंधार
कैसे लावियले मी दार
सौंदर्साने सृष्टी सजली
संगीताने सृष्टी भरली
दृष्टी परी मी माझी मिटिली
दिसले मजला ना सार।। कैसे....।।

तरु डोलती वेल नाचती
उत्साहाच्या अखंड मूर्ती
आनंदाची जगी निर्मिती
सतत हो करणार।। कैसे....।।

निर्मल सुंदर पुष्पे फुलती
परिमल देती लघु जरि दिसती
प्रकाश धरणीवरी उधळिती
सदैव ती हसणार।। कैसे....।।

पहा पाखरे मूर्तानंद
किती त्यांचे ते सुंदर रंग
किलबिल ऐकुन किती तरंग
सहृदय-मनि उठणार।। कैसे....।।

नभी तारका सदा चमकती
सागरावरी लहरी हसती
डोळे अमुचे जरि हे बघती
वृत्ति उचंबळणार।। कैसे....।।

सुंदर साधे चिमणे गवत
वसुंधरेला ते नटवीत
दृष्टी जगाची ते निववीत
हिरवे हिरवे गार।। कैसे....।।

विश्वामधला प्रत्येक कण
जगात फेकी प्रकाशकिरण
प्रकाशमोदे कोंदे त्रिभुवन
घेइ न तोचि भिकार।। कैसे....।।

कृतज्ञतेचा सद्भावाचा
स्नेहाचा नि:स्वार्थ प्रीतिचा
भक्तीचा निष्पाप अश्रुचा
प्रकाश अपरंपार।। कैसे....।।

जगात भरले रमणीयत्व
जगात भरले असे शिवत्व
जगात भरलेसे सत्यत्व
कोण परी बघणार।। कैसे....।।

मनुज-मानसी डोकावून
खोल असे जो सदंश बघुन
झालो केव्हाहि न तल्लीन
केला मी धिक्कार।। कैसे....।।

वृत्ति करोनी निज अनुदार
रागावोनी सकळ जगावर
काय साधले अहा खरोखर
झालो मी भूभार।। कैसे....।।

पायांपाशी माणिकमोती
प्रकाशसिंधू सदा सभोती
भिकार तिमिरी केली वस्ती
आणि अता रडणार।। कैसे....।।

अश्रूंचे बांधिले बंगले
तिमिराचे गालिचे पसरिले
नैराश्याचे गाणे रचिले
केला हाहा:कार।। कैसे....।।

जगापासुनी गेलो दूर
मोदा सोडुन गेलो दूर
प्रकाश सोडुन गेलो दूर
आणि पुन्हा झुरणार।। कैसे....।।

शोके आता भरतो ऊर
जिवास आता सदैव हुरहुर
कशांस आता करु मी कुरकुर
झाले जे होणार।। कैसे....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टों. १९३०

हस रे माझ्या मुला!

वारा वदे
कानामधे
गीत गाइन तुला
ताप हरिन
शाति देइन
हस रे माझ्या मुला।।

चिमणी येउन
नाचून बागडून
काय म्हणे मला
चिवचिव करिन
चिंता हरिन
हस रे माझ्या मुला।।

हिरवे हिरवे
डोले बरवे
झाड बोले मला
छाया देइन
फळफूल येइन
हस रे माझ्या मुला।।

सुमन वदे
मोठ्या मोदे
प्रेम देइन तुला
गंध देइन रंग दाविन
हस रे माझ्या मुला।।

रवी शशी
ताराराशी
दिव्य दाविन तुला
देईन प्रकाश
बोले आकाश
हस रे माझ्या मुला।।

पाऊस पडेल
पृथ्वि फुलेल
मेघ म्हणे मला
नद्यानाले
बघशील भरले
हस रे माझ्या मुला।।

हिरवे हिरवे
कोमल रवे
तृण म्हणे मला
माझ्यावरी
शयन करी
हस रे माझ्या मुला।।

जेथे जाइन
जेथे पाहिन
ऐकू ये मला
रडू नको
रुसू नको
हस रे माझ्या मुला।।

पदोपदी
अश्रु काढी
कुणि न बोलला
सृष्टी सारी
मंत्र उच्चरी
हस रे माझ्या मुला।।

माझ्या अश्रुंनो
माझ्या मित्रांनो
खोलिमध्ये चला
दार घेऊ लावुन
या तुम्हि धावून
तुम्हिच हसवाल मला।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

झुरतो मी रात्रंदिवस

होतो मी कासावीस। झुरतो मी रात्रंदिवस।।
श्रद्धेच्या दुबळ्या हाती। त्वत्प्रकाश धरण्या बघतो
बाळ जसा भूमीवरुनी। चंद्राला धरण्या धजतो
अंधारामधुनी देवा। त्वन्निकट यावया झटतो
मूल मी कळेना काही
कावराबावरा होई
डोळ्यांना पाणी येई
अंतरी तुझा मज ध्यास।। झुरतो....।।

त्वत्प्रसाद मज लाभेल। होती मम हृदयी आशा
तू प्रेम मला देशील। होती मम हृदयी आशा
तू पोटाशी धरशील। होती मम हृदयी आशा
परि माय माउली रुसली
या बाळावर रागवली
ती येईना मुळि जवळी
ये माझ्याजवळी बैस।। झुरतो....।।

रात्रीच्या समयी शांत। सळसळती तरुची पाने
मी खिडकीपाशी जात। सोत्कंठ बघे नयनाने
प्रभु माझा बहुधा येतो। घेतली धाव का त्याने
बाहेर खिडकीच्या हात
धरण्याला त्याचा हात
मी काढितसे सोत्कंठ
ठरला परि केवळ भास।। झुरतो....।।

आकाशी बघुनी तारे। गहिवरते माझे हृदय
हे थोर थोर पुण्यात्मे। का करिति प्रभुस न सदय
दिसती न तयांना काय। अश्रू मन्नेत्रि जे उभय
हे मंगल निर्मळ तारे
कथितिल प्रभुला सारे
हृदयातिल माझे वारे
बाळगितो ही मनि आस।। झुरतो....।।

प्रभु आला ऐसे वाटे। तो दिसे निबिड अंधार
हृदयात जरा आनंद। तोच येइ शोका पूर
सुमनांचा वाटे हार। तो करित भुजंग फुत्कार
रडकुंडिस येई जीव
कोमेजे हृद्राजीव
करितो न प्रभुजी कींव
प्राशावे वाटे वीष।। झुरतो....।।

पंकांतुन यावे वरती। रमणीय सुगंधी कमळे
भूमीतुन यावे वरती। अंकुरे मृदुल तेजाळे
दु:खनिराशेतुन तेवी। उघडी मम आशा डोळे
परि हिमे कमळ नासावे
अंकुरा किडीने खावे
आशेने अस्ता जावे
दु:खाची देउन रास।। झुरतो....।।

आसनिराशेचा खेळ। खेळुनी खेळुनी दमलो
वंचना पाहुनी माझी। सतत मी प्रभुजी श्रमलो
हुंदके देउन देवा! ढसाढसा कितिकदा रडलो
तुज पाझर देवा फुटु दे
त्वन्मूर्ति मजसि भेटू दे
त्वच्चरण मजसि भिजवू दे
हसवी हा रडका दास।। झुरतो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०