मजूर

आम्ही देवाचे मजूर
आम्ही देशाचे मजूर
कष्ट करू भरपूर।। आम्ही....।।

बाहेरिल ही शेती करुन
धनधान्याने तिला नटवुन
फुलाफळांनी तिला हसवुन
दुष्काळा करु दूर।। आम्ही....।।

हृदयातिलही शेती करुन
स्नेहदयेचे मळे पिकवुन
समानता स्नेहाला निर्मुन
सौख्य आण पूर।। आम्ही....।।

रोगराइला करुनी दूर
घाण सकळही करुनी दूर
स्वर्ग निर्मु तो या पृथ्वीवर
बदलू सारा नूर।। आम्ही....।।

दिवसभर असे कष्ट करून
जाउ घामाघूम होउन
रात्री भजनी जाऊ रमुन
भक्तीचा धरु सूर।। आम्ही....।।

कर्मामध्ये दिव्यानंद
सेवेमध्ये दिव्यानंद
नाही अन्य फळांचा छंद
नाही काहि जरूर।। आम्ही....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

श्रमाची महती

जरि वाटे भेटावे
प्रभुला डोळ्यांनी देखावे।। जरि....।।

श्रम निशिदिन तरि बापा!
सत्कर्मी अनलस रंगावे।। जरि....।।

प्रभु रात्रंदिन श्रमतो
विश्रांतीसुख त्या नच ठावे।। जरि....।।

प्रभुला श्रम आवडतो
जरि तू श्रमशिल तरि तो पावे।। जरि....।।

पळहि न दवडी व्यर्थ
क्षण सोन्याचा कण समजावे।। जरि....।।

सत्कर्मांची सुमने
जमवुन प्रभुपद तू पुजावे।। जरि....।।

रवि, शशि, तारे, वारे
सागर, सरिता, श्रमति बघावे।। जरि....।।

सेवेची महती जाणी
कष्टांची महती जाणी
कष्टुनिया प्रभुपद गाठावे।। जरि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मन माझे सुंदर होवो

मन माझे सुंदर होवो
वरी जावो
हरी गावो
प्रभुपदकमली रत राहो।। मन....।।

द्वेषमत्सरा न मिळो अवसर
कामक्रोधा न मिळो अवसर
निष्पाप होउनी जावो।। मन....।।

प्रेमपूर हृदयात भरू दे
भूतदया हृदयात भरू दे
शम, समता, सरिता वाहो।। मन....।।

पावित्र्याचे वातावरण
चित्ताभोवति राहो भरून
कुविचार-धूलि ना येवो।। मन....।।

आपपर असा न उरो भाव
रंक असो अथवा तो राव
परमात्मा सकळी पाहो।। मन....।।

धैर्य धरू दे, त्यागा वरु दे
कष्टसंकटां मिठी मारु दे
आलस्य लयाला जावो।। मन....।।

अशेचा शुभ दीप जळू दे
नैराश्याचे घन तम पळू दे
मनि श्रद्धा अविचल राहो।। मन....।।

सत्याची मज सेवा करु दे
सत्यास्तव मज केवळ जगु दे
सत्यात स्वर्ग मम राहो।। मन....।।

करुनी अहर्निश आटाआटी
ध्येयदेव गाठायासाठी
हे प्राण धावुनी जावो।। मन....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३२

मी केवळ मरुनी जावे

काय करावे?
मी केवळ मरुनी जावे
सदैव चाले ओढाताण
हृदयावरती पडतो ताण
उरले अल्पही न मला त्राण
कुणा सांगावे।। मी....।।

क्षणभर निर्मळ गगनी उडतो
दुस-याच क्षणी दरीत पडतो
खालीवर करुनी मी रडतो
कितिक रडावे?।। मी....।।

सदभाव मनी क्षण डोकावति
धरू जावे तो अदृश्य होती
केवळ हाती येते माती।। मी....।।
मृण्मय व्हावे

कोणावरती विश्वासावे
कोणाला मी शरण रिघावे
कोणा हाती जीवन द्यावे
कुणाला ध्यावे।। मी....।।

देवाचा न मज आधार
देवाचा न मज आधार
कोण पुशिल मल्लोचन-धार
तिने वाळावे।। मी....।।

मम जीवनि मज न दिसे राम
जगुनि न आता काही काम
अविलंबे मी मदीय नाम
पुसुन टाकावे।। मी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३२

असो तुला देवा! माझा सदा नमस्कार

असो तुला देवा! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार।। असो....।।

तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।

तुझ्या कृपेने रे होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होइल पंगु सिधुपार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल
तरि प्रभो! शतजन्मांची मत्तृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया! बघत बघत दार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी

प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी।।धृ।।

तुझी गोड येता स्मृती, आसवानी
पहा नेत्र येतात दोन्ही भरोनी।। प्रभो....।।

कृपेची तुझ्या कल्पना चित्ति येताच
पाषाण जातील रे पाझरोनी।। प्रभो....।।

अनंता! तुझ्या वैभवाला विलोकून
जाई अहंभाव सारा गळोनी।। प्रभो....।।

उदारा! दयाळा! तुझ्या देणग्यांचा
सदा दिव्य वर्षाव होई वरुनी।। प्रभो....।।

कृपेचा तुझ्या गोड मेवा मिळाया
सुखे जन्म घेईन मी फिरफिरोनी।। प्रभो....।।

जसे नीर मीनास तेवी तुझी रे
स्मृति जीवनाधार राहो बनोनी।। प्रभो....।।

जसा श्वास प्राणास तेवी तुझी रे
स्मृति जीवनाधार राहो बनोनी।। प्रभो....।।

तुझे प्रेम राया! तुझी भक्ति राया!
सदा रोमारोमांत राहो भरोनी।। प्रभो....।।

तुझे गीत ओठी तुझे प्रेम पोटी
तुला एक जोडीन जगि या जगोनी।। प्रभो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

वेणु

हृदयंगम वाजत वेणू
स्वैर न विचरति इंद्रियधेनू।। हृदयं....।।

जीवन-गोकुळि ये वनमाळी
अमित सुखाची सृष्टी भरली
शिरि धरिन तदीय पदांबुज-रेणू।। हृदयं....।।

प्रेमळ गोपी या मम वृत्ती
वेडावुन प्रभुरूपी जाती
प्रभुविण वदति की काहिच नेणू।। हृदयं....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग (गोकुळाष्टमी), ऑगस्ट १९३२