हिमगंध

नको मोजू माझ्या
मुक्तीची अंतरे ;
ब्रह्मांडांची दारे
               बंद झाली.
माझ्या आसवांना
फुटे हिमगंध,
मागे-पुढे बंध
              पापण्यांचे.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

बहार

पान पान सोडती सहिष्णु वृक्ष येथले
चक्र ओंजळीतले वर्तुळांत नादलें
ऐकतो कुठेतरी तमांत झांकली घरें
दिशादिशांत गात हा फकीर एकटा फिरे !
पहाड शब्द वेढती तसा सतंद्र गारवा
नि रक्तवाहिन्यांतुनी उडे सुसाट पारवा …

तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी...
वेदनेतली फुले नि चांदण्यातल्या सरी…
तुझेच अंग चंदनात अंतराळ ओढते
पुरात आणखी असे सजून ओल मागते…
दुक्ख लागता मला सभोवती जसेंजसें
दयार्द्र होउनी तसें क्षितीज दृष्टिला दिसे …


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

लाटांचे देऊळ

लाटांचे देऊळ असावे
जिथे नसाव्या लाटा
समुद्र सोडुन दूर निघाल्या
जळवंतीच्या वाटा

माडांनाही वाट नसावी
फक्त असावे डोळे
या देहाच्या दिप्तीमधला
चंद्र जिथे मावळे …

सागरतंद्रीतून नसावे
कुठे चुळाभर पाणी
तुझ्या कृपेच्या दुक्खामागे
येइन मी अनवाणी …


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

हळवी

जळात भिजले
वळण उन्हाचे ,
मावळतीच्या सरणावरती
निजून आले
उरलेसुरले दुक्ख मनाचे.

धुक्यात गढल्या
भित्र्या अगतिक कौलारांच्या तांबूस ओळी ,
मी फिरले
दारावर झोकून शिणली मोळी

झाले हलके
तमांत पैंजण.
तंग जरासा उसवून वारा ,
भावूक हळवी
धावत सुटले मृदबंधातून.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

प्रारंभ

इंद्रियांच्या प्रारंभात क्षितिज,
संवादीपणाने.
नाद माझे हळुवार, पैंजणी रात्रींना
दुःख अभिजात, स्पर्शमय वर्तुळांत
क्षणाक्षणानें.
अवकाश- रेषा निसरड्या, सप्तरंगी
आकाशगामी डोळियांच्या गुंफात .......
जाऊ नकोस, हांकेवर थांब, ते अमृताचे
भयाण डोह आहेत
अमर होशील......


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

उखाणा

शुभ्र अस्थींच्या धुक्यात
खोल दिठीतली वेणा
निळ्या आकाशरेषेत
जळे भगवी वासना.

पुढे मिटला काळोख
झाली देऊळ पापणी;
आता हळूच टाकीन
मऊ सशाचा उखाणा.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

निर्मळा

प्रतिबिंब गळे कीं पाणी
अपुल्याच दिठीशी हंसले
ओसाड प्राण देवांचे
सनईत धुक्याच्या भिजले .

स्वररेघ निर्मळा पसरे
रडतात तमाशी झाडे
की श्रावण घेउनी हृदयी
ओवीत उतरले खेडे …

हिमभारी अपुले डोळे
पृथ्वीच्या थोर मुळाशी
पायांवर येउन पडती
मरणाच्या हिरव्या राशी ….

वासांत विराणी कसली ?
पाण्याचे तंतू तुटती
लोचने जशी स्पर्शाने
खाचेतुन गळुनी पडती ….

ही अशी निर्मळे रात
अज्ञात आठवे चेहरा …
अन हात तुझा क्षितिजाशी
ती वाट उभी धरणारा ….


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता