राघोजीराव आंग्रे सरखेल

धन्य सवाई सरखेल राघोजीराव मुख्य अधिपती । कीतीक त्या तेजापुढे लोपती ॥ध्रु०॥

पूर्वी कोण्या पूर्वजाने समयी शत्रु सैन्य पळवुनी । सर्व साकल्य हुजुर कळवुना ॥

महाराजांचे प्रसन्न मन ते आपल्याकडे वळवुना । आले संकट सारे टळवुनी ।

श्रम साध्य सरखेलपणाचे अक्षय पद मिळवुनी । टाकिले दरिद्र दुर खिळवुनी ॥

चा० त्या वंशामध्ये जन्मले ॥ राघोजीराव चांगले ॥ भले मर्दुमिने शोभले ॥ चा०

जळात आणि प्रांतात ज्याला रिपु थर थर कापती । येउन अपराधी पाई लागती ॥१॥

नूतन विसा बाविसात उंबर स्वरूप शाम सुंदर । चढाइत घोड्यावर बहादर ॥

स्वता करवली करून मागे मारितात चादर ।

शूर कर जोडिता एकंदर ॥ कलगि तुरा शिरपेच झळाळित कडी कंठी नादर ।

हजारो जन करिती आदर ॥चा० गर गर भाला फिरविती ॥

राव पहिलवान हरविता ॥ गवयांचे गर्व निरविती ॥ चा० प्रवीण गाण्यामधे टाकिती साजावर थाप ती ।

सूर स्गीन विणे वाजती ॥२॥

स्वारी निघे कडकडीत भयंकर आरब किंकाळती । वारुमधे कोतल चौताळती ।

स्वार पिच्छाडिस मांड बरोबर दाटित संभाळती ।

हात हलतंच हुकूम पाळती ॥ दोहो बाजूस मोरचले मिजाजित रायावर ढाळती ।

पाहून मुखचंद स्त्रिया भाळती ॥चा० पुढे बल्ल बाण चालती ॥ भालदार मधुर बोलती ॥

खावंद मोठे मसलती ॥चा० धनि दिवाण साहेबास शंकरे दिली संतत संपती । ठेंगणी भुय आटीव आकृती ॥३॥

उदार गजराबाई सदोदित हास्यानन मावली । असले पुत्र सती प्रसवली ॥ उभय लौकिक रक्षुन जगात ध्वज लावली ।

हीच महायात्रा घरी पावली ॥ अशा कल्प वृक्षाची पडावी किंचित तरी सावली । जडो हे मन त्यांचे पावली ॥ चा०

मर्जिनरूप जे वागती ॥ झाले वर्तमान सांगती ॥ नंतर निरोप मागती ॥चा०

जलदी किती कामाची हुशारित चक्रापरि तळपती । जेव्हा तेव्हा हत्यार चमके हाती ॥४॥

ताईसाहेब भाग्याची पुत्र आणि पौत्रादिक साजती । श्रीमंतिणी स्त्रियात सुविराजती ॥ अनेक राजद्वारी अखंडित जय वाद्ये वाजती ।

विप्र मंगल घोष गर्जती ॥ राज्य असुन तर लहान मुल्खो मुलुखी कीर्त गाजती । नाव ऐकुन धनाढ्य लाजती । चा०

किती छत्रामधे जेवती ॥ किती घरीच अन्न सेविती ॥ किती कामावर ठेविती ॥ चा०

किती कारकुन लिहिणार किती कर जोडितात दंपती । दया येई मग मातुश्री प्रती ॥५॥

नित्य दान काही पुराण समई गान होतसे । सदा सत्काळ यात जातसे ॥ काय कोठे कमी जास्त सती ते सर्व स्वता पहातसे ।

खबर पर राज्यातिल येतसे ॥ चा० नाही राज्यामधे तस्कर ॥ हे जनास श्रेयस्कर ॥ भोगिती सुख सोयस्कर ॥ चा०

घरोघर गाती गीत जास्त नाही रयतेवर बाबती । शिरस्ते कदीम तेच चालती ॥६॥

सदैव मुक्तद्वार कुलाबा गरिबांचे माहेर । जसे तप साधनास बेहर ॥ श्रीमंत गेल्या पसुन मिळेना अन्न कोठे बाहेर ।

म्हणुन झड घालितात लाहेर ॥ वस्त्र पात्र येई शिधा हेच ह्या सरखेलांचे हेर । उचीच नव्हे शब्दांचा आहेर ॥ चा०

पहा पहा राजांचे मुख ॥ उभे रहा क्षणभर सन्मुख ॥ होइल दरिद्र विन्मुख ॥ चा०

प्रपंच कल्याणार्थ कराया प्रभूस विज्ञापती । सौख्य पावाल सर्व निश्चिती ॥७॥

मंत्री विनायक परशराम ते बुद्धिचे सागर । सर्व गुणी विद्येचे आगर । भुजंग राजे भुलती सुवासिक दिवाण मैलागर ।

राजकारणी एक नट नागर ॥ येती किती दर्शनास ब्राह्मण आणि सौदागर । रात्री हरहमेश होई जागर ॥ चा०

मुळी पुण्यवान ते धनी ॥ कारभारी तसे साधनी ॥ गंगु हैबती कवी शोधनी ॥ चा०

महादेव गुणी म्हणे प्रभाकर क्षेम असो भूपती । न्यहाल कधी करतिल सहजोगती ॥८॥


कवी - अनंत फंदी

नाना शंकर शेट

दैववान नाना शंकर शेट विजाति । केली केवढी उभय वंशात उभयता ख्याती ॥ध्रु०॥

ना कळे कोणाला विचित्र हरिची माया । क्षणमात्रे दीनावर लावील छत्र धराया ॥ बाबुल शेटिवर पडली कृपेची छाया ।

ते पुण्यवान ती धन्य पवित्र जाया ॥ शंकर शेट आले पोती किर्त कराया । झाली प्राप्त अचल लक्ष्मी आरोग्य काया ॥चाल॥

वाढली मान-मान्यता जगामध्ये मोठी ॥ पाहिल्या पडे श्रम केवळ धनाची कोटी ॥

नावडे गोष्ट कल्पांती कोणाची ओती ॥चाल॥

कडकडीत कठीण मर्जी । जसा फर्जी निर्भय गर्जुन बोले ॥ संतत संपत अनुकुळ । नाही प्रतिकुल । या भरपणांत डोले ॥

बाच्छाय आपल्या घरचे । लाल हरीचे । त्या योग्य तसे तोले ॥चाल॥

बहु बळे संपदा मिळवली ॥ मुळापासून औदसा पळवली ॥ विष्णु सहित लक्ष्मी वळवली ॥चाल॥

अहा रे ! शंकर शेट धनाज ॥ भाग्यवान भोळे महाराज ॥ कुटुंबसंरक्षणाचे जहाज ॥

डामडौल नाही काही मिजाज ॥ दीन दुबळ्याचे गरीब नवाज ॥ शरण आल्याची राखुन लाज ॥ आगोदर त्याचे करावे काज ॥

मोठ्या मोठ्याचा जिरवुन माज ॥ हरीस आणिले शेट बजाज ॥ पैलापूर मुंबईत आज ॥चाल॥

जेव्हा टिपूवर इंग्रज गेले ॥ तेव्हा शेट सवे नव्हत नेले ॥ परंतु भर्णै येथुन केले ॥ समय रक्षिले ज्यांनी अशेले ॥चाल॥

म्हणून साहेब बहुत चाहाती ॥ करून गौरव धरावे हाती ॥ काढुन टोपी उभे की राहती ॥चाल॥

देशावर चालता हुंड्या ॥ इतर गाई तर गरीब भुंड्या ॥ अपराधावर धरून पुंड्या ॥ घरी चढवाव्या ॥चाल॥

भलत्याचे पडेना तेज फिटेना भ्रांती । यासाठी लोक भरदिसास हिसके खाती ॥१॥


कवी - अनंत फंदी

लंडे गुंडे हिरसे तट्टु

लंडे गुंडे हिरसे तट्टु ह्यांचीं संगत धरु नको । नरदेहासी येऊन प्राण्या दुष्‍ट वासना धरुं नको ॥ध्रु० ॥

भंगी चंगी बटकी सठकी ह्यांच्या मेळ्यांत बसुं नको । बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मागी सोडुं नको ॥

संसारामधिं ऐस आपला उगाच भटकत फिरुं नको । चल सालसपण धरुनि निखालस बोला खोटया बोलुं नको ॥

पर धन पर नार पाहुनि चित्त भ्रमुं हें देऊं नको । अंगीं नम्रता सदां असावी राग कुणावर धरुं नको ॥

नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणा घेऊं नको । भली भलाई कर कांहीं पण अधर्म मार्गीं शिरुं नको ॥चाल॥

मायबापावर रुसूं नको । दूर एकला बसूं नको । व्यवहारामधिं फसूं नको ॥चा० प० ॥

परी उलाढाली भलभलत्या पोटासाठीं करुं नको ॥ लंडे गुंडे० ॥१॥

बर्म काढुनि शरमायाला उणें कुणाला बोलुं नको । बुडवाया दुसर्‍याचा ठेवा करुनिया हेवा झटुं नको ।

मी मोठा शाहाणा धनाढयही गर्व भार हा वाहुं नको । एकाहुन एक चढी जगामधिं थोरपणाला मिरवुं नको ॥

हिमायतीच्या बळें गरिबागुरिबाला तूं गुरकावुं नको । दो दिवसांची जाइल सत्ता अपेश माथां घेऊं नको ।

बहुत कर्जबाजारी होऊनि बोज आपला दवडुं नको । स्नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन होऊं नको ॥चाल॥

विडा पैजेचा उचलुं नको । उणी तराजू तोलुं नको ॥ गहाण कुणाचें डूलवुं नको ॥ असल्यावर भीक मागूं नको ॥ चा० प० ॥

नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरुं नको ॥ लंडे गुंडे० ॥२॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठीं करुं नको ॥ बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको ॥

कष्‍टाची बरी भाजि भाकरी तूप साखरेची चोरि नको ॥ आल्या अतिथा मुठभर द्याया मागें पुढती पाहूं नको ॥

दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको ॥


कवी - अनंत फंदी

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥ध्रु०॥

ब्राम्‍हणाशीं बिगारी धरतात । अविचार मनस्वी करतात । अशा आधारें कसे तरतात । मुलेंमाणसें घेऊन मरतात ।

वाणी बकाल घाबरतात । लोक गाईसारखे हुंबरतात । पंढरीनाथ स्मरतात । महार पोरगे घरांत शिरतात ।

घरधनीच होऊन बसतात । वस्तभाव अवधी भरतात । माल बापाचा बांधिती मोटारे मोटा । सत्कर्माचा । सम० ॥१॥

धामधूम चहुंकडे गर्दी । पठाण कंपु आरब गार्दी । ज्याला न मिळे भाकर अर्धी ।

त्याला बसाया घोडे जर्दी । लागून वारा नका घेऊं होईल सदीं ।

त्याची बडेजाव आठचारदी । दिवाण दरबारांत गर्दी । दिवस लागू नये फारदी । जेव्हां तिजवर व्हावी गर्दीं ।

तशामधीं होते वरदी । ते पार पडले मरदा मरदी । आवताराच्या दैवी उपद्रव मोठारे मोठा ।

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥२॥

जो येतो तो हातीं भाला । म्हणे आपणाला जेऊं घाला । कोणी कोणाचा गुरु ना चेला । भलताच धमकावी भलत्याला ।

चोरदंड तो कोतवालाला । जसा रावणाचा साला तो हलकाला एकची झाला । पतिव्रता मुकली प्राथाला । शिंदळ चढली लौकिकाला ।

सांगत फिरती ज्याला त्याला । एक जातबाई टोपीवाला । मी नाहीं दमलें पंचविसाला ।

फंदी अनंताची कविता सवाई सोटारे सोटा । सत्कर्माचा तोटा ॥ समय० ॥३॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

शोध करीरे मना हरि भजनाविण अवघें वृथा ॥धृ० ॥

हरीभजनीं ठरला । तो यमाजीकडे न घरला । भवसिंधु त्यालाच वसरला । विठाईचीच मिठाई चाला ।

ह्रदयांतरी हरी संचरला । त्याच्या मग तो सेवेंचि तरला । यमदुतापासून विसरला । जो पंढरिनाथापायिं न विसरला ।

उत्तम जन्म जरा न घसरला । यमाजीचजा प्रयत्‍न हरला । ज्यांनीं विष्णु ह्रदयीं धरिला ।

तो नभीई अजका सर्वथा । शोध करीरे मना हरि भजानाविण अवघें वृथा ॥शो० ॥१॥

शाश्वत नाहीं करुं आजकाल । हरिभजनाविरहित जें शिकाल । तें कामी सर्वस्वें टिकाल । मोक्षाधिकारी व्हालच मुकाल ।

जितके हरीभजनाला चुकाल । तितके यमाजीकडे धकाल । ते समयीं मग अवघे थकाल । बळकट काढील यमाजी खाल ।

मग त्यापुढें तुम्ही काय बकाल । हरीच्या भजनीं मन हें विकाल । अनंत जन्म सुजन्य पिकाल । यापरता कैचा निकाल ।

तुम्ही जाणा गबाजी हाकाल । सांगितलें नाहीं मग चकाल । मग यमाजी बुकाल । कुंदी करील तेव्हां कसें टिकाल ।

केलें पातक तितकें वकाल । नामामृत घ्या धनवल छकाल । द्या सोडून या भाकडकथा ॥ शोध० ॥२॥

नामस्मरणीं होई चाटुकार । कर भगवज्जनाचा देकार । या कामास न व्हावें चुकार । परंतु सत्य याचा स्विकार ।

दुर होतील हे नाम विकाल । या गोष्‍टीचा नसावा नकार । कांहीं नलगे चकारपकार । फुकटामध्यें नामामृत स्विकार ।

सांपडल्यास न कीजे धिःकार । हातीं आला येवढा अधिकार । हरिहरी फोडित जा तूं वर । भगवान करील अंगीकार ।

सांगितलें तर याचा अंतर । नाहीं तरी माझे जाईल यकार । सत्कर्माची हुंडी स्विकार ।

फंदी अनंत करि हे प्रकार । तुज अर्पण दुर करि भवव्यथा ॥ शोध० ॥३॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

नरदेहामधिं येऊन नर हो साधन ऐसें करा जेणें भवसगर तरुनि सुखें व्हावें पैलतिरा ॥ध्रु०॥

संतारार्णवीं भिजा गडयांनो संसारार्णवीं भिजा । परंतु परमार्थ साधनातें साधा यांतच मजा ।

परनारीधन त्यजा गडयांनो परनारी० ।

मदमत्सर मीपणा सहित द्या तमोगुणाला रजा । भाव न ठेवुनि दुजा । गडयांनो० ॥

अकपट होऊनि थोर लहाना समदृष्‍टीनें पूजा । अन्यायपथें न जा ॥ गडयांनो० ॥

सदसद्विचार करुनी लोकीं सत्कीर्तींनें सजा । कोणा नच द्या इजा ॥ गडयांनो० ॥

परि आश्रय दुःखितांस द्याया तन मन धनें झिजा । संकटसमयीं धजा ॥ गडयांनो० ॥

सत्यवचन राखण्यास न ढळा कथितो ह्या हितगुजा । व्हा सावध नचि निजा ॥ गडयांनो० ॥

पळ घटका प्रहर दिवस, यांहीं होतें आयुष्य होतें वजा । जगदिशाला भजा ॥ गडयांनो० ॥

अनंतफंदी म्हणे तोचि मग तारिल देऊनी करा ॥१॥नरदेहामधि० ॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

येउंदे वाचें नाम देवाचें अष्टौ प्रहरा शिव हर हर हर ॥धृ०॥

दे टाकुनि हे छंद वावुगे फंद विषयाची काय मजा ॥ हरिनामाची लावी ध्वजा ॥

असार हा संसार त्यजा ॥ तमोगुणाला देच रजा ॥ रजसत्वाची करी पुजा ॥

क्षमा शांति मनिं धरीत जा । भगवीं वस्त्रें करी पोटभर भिक्षा मागें घर घर घर ॥येउंदे० ॥१॥

परोपकारा शरीर झिजवावें जैसा मैलागिरी चंदन ॥ कर सज्जन चरणीं वंदन ॥

सा शत्रूंचें करि कंदन ॥ गृहवैभव वाजी स्यंदन ॥ अशाश्वती ह्या हो धुंदन ॥

आठवी मनीं दशरथनंदन ॥ अनंतफंदी ह्मणे घालीं विठ्‌ठला गरके गर गर गर ॥ येउंदे० ॥२॥


कवी - अनंत फंदी