सखे, बोल-बोल-

का सुंदरि, धरिसि आज असा अबोला?
मी काय सांग तव गे, अपराध केला?
का कोपर्‍यात बससी सखये, रुसून
माझ्याकडे न मुळि पाहसि गे हसुन?

का गाल आज दिसती अगदी मलुल,
की माझियाच पडली नयनास भूल!
तोंडावरी टवटवी लवलेश नाही,
ओठावरी दिसत लालपणा न काही!

का केश हे विखुरले सखये, कपाळी,
केलि न काय अजि वेणीफणी सकाळी?
भाळी न कुंकु विलसे, नथणी न नाकी,
हातातही न मुळि वाजति गोठवाकी!

कोठे तुझा वद असे शिणगारसाज,
का नेससी मलिन हे पटकूर आज?
ठेवुनिया हनुवटी गुडघ्यावरी ही
का एकटीच बसलीस विषण्ण बाई?

व्हावा तुला जरि असेल पदार्थ काही,
घे नाव-तो मग कुठे असु दे कसाही,
द्रोणगिरीसह जसा हनुमन्त येई,
बाजार आणिन इथे उचलून तेवी!

की आणसी उसनवार सदा म्हणून
शेजारणी तुजवरी पडल्या तुटून;
वाटून घेइ परि खंति मना न काही,
शेजारधर्म मुळि त्या लवलेश नाही !

भाडे थके म्हणुनि मालक देइ काय
गे आज 'नोटिस'? परी न तया उपाय !
घेऊन काय बसलीस भिकार खोली,
बांधीन सातमजली तुजला हवेली!

वाटेल ते करिन मी सखये, त्वदर्थ,
संतोषवीन तुज सर्व करून शर्थ!
टाकी परी झडकरी रुसवा निगोड!
दे सुंदरी मजसि एकच गोड-गोड

गेलो पुढे हसत जो पसरून हात,
तो ओरडून उठली रमणी क्षणात-
"व्हा-दूर चावटपणा भलताच काय?
स्पर्शू नका' कडकडे शिरि वीज हाय!!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें
वृत्त - वसंततिलका

पाहुणे

[कै. केशवसुतांची 'दवांचे थेंब' ही कविता वाचल्यानंतर पुढील विनोदी कवितेचे रहस्य लक्ष्यात येईल]

"कोठुनि हे आले येथें?
      काल संध्याकाळी नव्हते !!--"

पाहुणे पसरले ओटी-
     वरि बघुनी आज प्रभाती

आईला बाळ्या वदला
     कुतुकाने उत्सुकलेला.

"दिसती हे कोणी आले
     आपुल्याच नात्यामधले !

आई ग! तर वद माते
    कोठुनि हे आले येथे?

तंबाखू पाने खात
     कसे पहा बडबडतात !

उघडुनी डबा ग अपुला
       राजरोस करिती हल्ला!

बाबांच्या पेटीतुन गे
        पळविती विड्यांचे जुडगे!

मौज मला यांची वाटे
        होते हे तर वद कोठे?"

"हं हळू बोल-" तनयाते
         वर करुनी बोट वदे ते-

"कावळे, गिधाडे, घारी,
         येती ही जेथुनि सारी'

डोंगळे, डास, घुंगुरटी
          बाळा रे, जेथुनि येती;

खोकला, ताप ही दुखणी
        आपणास येती जिथुनी;

तेथुनीच आले येथे
         हे छळावया आम्हांते!"

"राहतील येथे का ते?
        अडवितील का ओटीते?

करतिल का भिंतीवरती
        ही अशी लाल रंगोटी

जातील कधी हे आई?
           घरदार न यांना काही?"

'नाही रे! ते इतुक्यात
          जाणार गड्या नाहीत!

जोवरी भीड आम्हांते
           जोवरी लाज न याते,

तोवरी असा बाजार
       सारखा इथे टिकणार !

चडफडने बघुई त्यांते
          असती ते जोवरि येथे!

टोळधाड कधि ही इथुनी
         जाणार न लौकर सदनी!"

'जाणार न लौकर सदनी!'
          वदता गहिवरली जननी;

पाहुणे मागले स्मरले,
          डोळ्यांतुन पाणी आले.

बहुतेक तयातिल आता
          जाहले कुठे बेपत्ता!

निगरगट्ट परि त्यामधला
         एक मात्र अजुनी उरला!

सरले जरि बारा महिने
         तरि बसे देउनी ठाणे!

"देवा रे" मग ती स्फुंदे
           "एवढा तरी जाऊ दे!"

म्हणुनि तिने त्या बाळाला
          तो महापुरुष दाखविला!

एकेक बघुनि त्या मूर्ती
          गोठली कवीची स्फूर्ती!

वेडावुनि तयाच नादे
          "खरेच," तो पुसतो खेदे,

"येती हे रोज सकाळी
          परि जाती कवण्या काळी?"


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

फूल, कवि, बाला आणि मासिक

[एक शोकपर्यवसायी कथा]

कुठे रस्त्यावर कुणी टाकलेले
कुणा कविच्या नजरेस फूल आले;
तडक घेई उचलून करी त्याते
(ब्रीद कविचे वेचणे जे दिसे ते!)
तोच दिसली मार्गात एक बाला,
(कवि प्रेमाचा नेहमी भुकेला!)
फुल अर्थात्‍ तिज द्यावयास गेला-
जीभ काढुनि ती फक्त दावि त्याला !
खूप रडला कवि (नेहमीप्रमाणे)
प्रेम-कविता लिहि (तरी चार पाने!)
मासिकाला पाठवी त्याच वेळी
हाय ! तीही साभार परत आली !!

                          -स-

प्रेमे ज्या कविता दिल्या परत त्वां संपादका, धाडुनी,
देतों ताबडतोब पाठवुनि त्या आता 'मनोरंजनी'
नाही वाटत खेदलेश उलटा आनंद वाटे मनी,
की त्या फाडुनि टोपलीत न दिल्या रद्दीत तू फेकुनी


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें
वृत्त - दिंडी

आम्ही कोण?

'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कवीची 'विरामचिन्हे'

('विरामचिन्हे' चे विडंबन)

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

त्याचें काव्यलेखन

शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे
(काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला!
स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला-
"काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला!" वदे!

टाकी बंद करून सर्व खिडक्या-जाळ्या, झरोके तसे
दारालाही तशीच लावित कडी आतूनबाहेरुनी!
दोस्ताला कुठल्यातरी बसविले दारावरी राखणी;
"काव्याची बघतो मिजास!" वदला अस्पष्ट काही असे!

आता कंबर बांधुनीच कवने 'पाडावया' तो बसे
वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लीत चोहीकडे!
आले धावुनि लोक सर्व! दुसरे कोणा सुचावे कसे?
चिंताक्रान्त मुखे करूनि बसले निःस्तब्ध दारापुढे!

झाला तब्बल तास! चाहुल परी काही न ये आतुनी,
सर्वांचा अगदीच धीर सुटला! कोमेजले चेहरे!
भाळी लावुनि हात कोणी वदती "मजी प्रभूची बऽऽरे!"
दृष्टी खिन्नपणे नभी वळवुनी निःश्वास टाकी कुणी!

गंभीर ध्वनि तोच आतुनि निघे! उंचावली मस्तके!
श्वासोच्छ्वास क्षणैक थांबत! मुखे रुंदावली कौतुके!
डोकावूनि बघे फटींतुनि कुणी-तो त्या दिसे अद्‌भुत!
होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत!!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कुणाच्या खांद्यावर

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे


कवी /गीतकार    -    आरती प्रभू
संगीत    -    भास्कर चंदावरकर
स्वर    -    रवींद्र साठे
चित्रपट    -    सामना