प्रेमाचा गुलकंद

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित 'तिज'ला नियमाने!

कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!

गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!

प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!

कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!

या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगत करी मग मनातले बोल!

अशा तर्‍हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!

अखेर थकला! ढळली त्याचि प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!

धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, 'देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)

'बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तांचे काज?

गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?'

तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी'

असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!

म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!

कशास डोळे असे फिरविता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!'

क्षणैक दिसले तारांगण त्या,-परि शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!

'प्रेमापायी भरला' बोले, 'भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?'

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रदय थांबुनी कधीच नातरि तो असता 'खपला'!

तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
'प्रेमाचा गुलकंद' तयांनी चाटुनि हा बघणे!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

मोडीसाठी धाव

दे रे हरि, दोन आण्याची मोड!
मोडीसाठी भटकुन आले तळपायाला फोड ॥ध्रु०॥

काडि मिळेना, विडी मिळेना, इतर गोष्ट तर सोड!
मीठही नाही, पीठहि नाही, मिळे न काही गोड!

पै पैशाचे धंदे बसले, झाली कुतरेओढ!
'मोड नाही,' चे जेथे तेथे दुकानावरी बोर्ड!

ट्रँम गाडितहि मोड न म्हणुनी, करितो तंगडतोड!
कुणी 'कूपने' घेउनि काढी नोटांवरती तोड!

मोडीवाचुनि 'धर्म' थांबला, भिकार झाले रोड!
दिडकि कशी तुज देऊ देवा, प्रश्न पडे बिनतोड!

श्रीमंतांचे कोड पुरवुनी मोडिशि अमुची खोड!
पाड दयाळा, खुर्द्याची रे आता पाऊसझोड!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

बायको सासरी आल्यानंतर

बायको आली आज परतून! ॥ध्रु०॥

बारा महिने तब्बल बसली माहेरी जाऊन!
वाटू लागले नवर्‍याला कि गेलि काय विसरून!

झोपुनि झोपुनि रोज एकटा गेलो कंटाळून,
थकुनी गेलो सक्तीचे हे ब्रह्मचर्य पाळून!

आंघोळीला रोज यापुढे मिळेल पाणी ऊन,
गरम चहाचा प्याला हासत येइल ती घेऊन!

लोकरिचा गळपट्टा रंगित देइल सुबक विणून,
आणि फाटक्या कपड्यांनाही ठिगळे छान शिवून!

टाकिन आता सर्व घराचा रंगमहाल करून,
तात्यामाई घेतिल दिवसा मग डोळे झाकून!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

एका पावासाठी

धाव पाव देवा आता । देई एक पाव!
मारु चहावरति कसा मी । कोरडाच ताव?
पाव नाहि म्हणुनी पत्‍नी । करित काव काव!
पावरोटिसाठी आलो । धुंडुनि मी गाव!
माजलेत बेकरिवाले । म्हणति 'चले जाव!'
बोलतो हसून इराणी । 'जा चपाती खाव!'
वाढवी गव्हाचे वाणी । चौपटीने भाव!
नफेबाज व्यापार्‍यांचा । हाणुन पाड डाव!
पाहिजे तरी सरकारा । तूच लोणि लाव!
नरम पाव देऊन देवा, राख तुझे नाव!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

वधूवरांना काव्यमय अहेर

अहा, उगवली आनंदाची शुभमंगल वेला,
आज तुम्हा अस्मान ठेंगणे वाटे ना? बोला?

रोमांचातुनि हर्षाच्या ना उसळतात लाटा
गांभीर्याचा मुग्धपणा मग का वदनी खोटा!

उत्सुकतेने तुम्ही पाहिली आजवरी वाट
प्रसंग आला तोच! शांत का मग मिटवुनि ओठ?

लग्नाचे काढिता तुम्ही कुणि आजवरी नाव
'छे-भलते!' दाविलात लटका असाच ना भाव?

'नव्हते कारण लग्नच!' तर मग का बसला आता
सस्मित वदने 'अन्याया'चा प्रतिकार न करता?

तरुण मंडळी 'नको' बोलती अर्थ परी त्याचा
काय असे तो नीट उमगतो थोरांते साचा!

असो' कसे पण वाँरंटाविण आज तुम्ही झाला,
खरे चतुर्भुज! ('जन्मठेप' कुणि म्हणति बरे याला!)

अरे, कुणी हे लांबलचक विधि लग्नाचे केले?
हाच चालला विचार मनि ना! (ते मजला कळले!)

वाङ्‌निश्चय, श्रीमंतपूजने आणि रुखवते ती,
आनंदाच्या समयि कशाला ही भारुडभरती!

पक्वान्ने रुचिमधुर कशाला भोजनास भरती
'त्या घासा'विण विचार असतो का दुसरा चित्ती!

मुंडावळि या डोळ्यांवरती पुन्हा पुन्हा येती
नीट न दिसते 'मुख ते' ! अगदी कटकट ही नसती!

किती यातना वधुवरांच्या ह्रदयाला होती!
वृद्धांना कळणार तरि कधी या नाजुक गोष्टी?

लग्नकालिचा अनुभव अपुला विसरतात सारे
म्हणुनि वधुवरा निष्कारण ते छळती म्हातारे

घास घालणे, विड्या तोडणे नाव आणि घेणे
हाताला अन हात लावणे! पदरगाठ देणे!

एवढेच विधि विवाहात जरि ठेवतील मोठे
उरेल तर मग पृथ्वीला या स्वर्ग दोन बोटे!

निष्कारण भटभिक्षुक म्हणती लग्नाचे मंत्र
तरुणांच्या ह्रदयातिल त्यांना नच कळणे तंत्र

किती मंगलाष्टके लांब ही अजुनि न का सरती?
घसा खरडुनी कानाजवळी किंकाळ्या देती!

लाल अक्षता मारित सुटती डोक्यावर सारे
खराब होतिल केस! तेवढे नच कळते का रे?

चला संपले दिव्य! 'वाजवा' असा ध्वनी उठला
अरे, अजुनि हा अंतःपट तरि कुणी उंच धरिला!

मंडपात का लोक रिकामे रेंगाळत बसती,
हस्तांदोलन वा अभिनंदन का करण्या येती?

उगाच घ्यावा किती कुणाचा मौल्यवान वेळ!
लोकांना आमुच्या कधी हे रहस्य उमगेल!

स्पष्ट बोललो वधुवरांनो, क्षमा करा मात्र!
असेच तुमच्या ह्रदयाचे ना असे खरे चित्र?

चला बैसला जिवाजिवाचा आज खरा मेळ!
संसाराचा सुरू जाहला सुखद आज खेळ!

तुम्हा सांगतिल कुणी 'भवार्णव दुस्तर हा फार!
जीवन नुसति माया! नसते संसारी सार!'

नका घाबरू! अशा ऐकुनी भूलथापा खोट्या,
अजीर्ण ज्याते श्रीखंडाची रुचि येइल का त्या?

आनंदाची सर्व सुखाची जीवित ही खाण
हसेल आणि जगेल त्याते नच कसली वाण!

नका त्रासुनी बघू! समजले! आवरतो सारे!
म्हणाल ना तरि 'बोलुनि चालुनि कवि बेटे न्यारे!'

आनंदाचा मधुर मनोहर वसंतकाल सदा,
तुम्हास लाभो! हीच शेवटी विनंति ईशपदा!

आणि सांगतो अखेर एकच की भांडणतंटा
जरि झाला कधि तरि तो घ्यावा प्रेमाने मिटता!

आरंभी येतील अडथळे! जोवरी न हलला-
सदनि पाळणा-क्षमा करा, हा चुकुनि शब्द गेला!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

मनाचे श्लोक

मना, नीट पंथे कधीही न जावे,
नशापाणि केल्याप्रमाणे चलावे,
जरी वाहने मागुनी कैक येती
कधि ना तरी सोडिजे शांतवृत्ती!

दुकानांवरी लाविल्या लांब पाट्या
मना, थांबुनी वाच रे वाच बा त्या!
अकस्मात् दिसे जाहली जेथ गर्दी
तिथे चौकशी जा करायास आधी!

तिर्‍हाईत कोणी जरी जाय पंथे
तरी रोखुनी पाहणे त्याकडे ते!
अहा, अंगना त्यांतुनी ती असेल
वळोनी तरी पाहि मागे खुशाल!

कधी आगगाडीतुनी हिंडताना,
सिनेमा-तमाशे तसे पाहताना,
विचारी मना, त्वां न खर्चीत जावे,
सदा श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे!

कधी 'मंदिरी' जासि वाचावयाला
तरी इंग्रजी मासिकी ठेव डोळा!
कुठे छान चित्रे कुठे 'कूपने' ही
दिसे सर्व ते नीट कापून घेई!

कुणाचेविशी अंतरी होय तेढ,
निनावी तया धाडि रे 'नाँटपेड'!
तयाचेनि नावावरी लठ्ठ व्ही.पी.
मना, मागवी-त्याहुनी रीत सोपी!

सदा खाद्यपेयावरी हात मारी
बिले देइ सारुन मित्रासमोरी;
'अरेरे, घरी राहिले आज पैसे-'
खिसे चाचपोनी मना बोल ऐसे!

कुणाच्या घरी जा करायास दाढी,
कुणाची फणी घेउनी भांग काढी?
कुणाचा 'स्वयंटाक' टाकी खिशात,
घड्याळेहि बांधी तशी मनगटात!

कुणाच्या विड्य नित्य ओढीत जाव्या,
तशा आगपेट्याहि लंबे कराव्या!
चहा होतसे केधवा पै कुणाचा
अरे मन्न, घेई सुगावा तयाचा!

इथे पायगाडी तिथे वाद्यपेटी
इथे पुस्तके वा तिथे हातकाठी;
अशी सारखी भीक मागीत जावे,
स्वताचे न काही जगी बाळगावे!

कुणाचे असे मगले काहि देणे
कपर्दीकही त्यातली त्या न देणे
कधी भेटला तो तरी त्या हंसोनी
म्हणावे 'असे सर्व ते नीट ध्यानी!'

कुणाचे कधी लागले पत्र हाती
कुणाची तशी चिठ्ठी किंवा चपाटी;
तरी त्यातल्या वाचणे चार ओळी,
न ठावे कळे कोणते काय वेळी!

जिथे चालल्या खाजगी कानगोष्टी
उभी आणि धेंदे जिथे चार मोठी,
मना, कान दे तोंड वासून तेथे,
पहा लागतो काय संबंध कोठे!

कडी लागलेली दिसे आत जेथे,
मना सदगृहस्था, त्वरे जाय तेथे!
जरी पाहसी आत ना काक-अक्षे,
कशाला तरी त्या फटी अन् गवाक्षे?

नसे ज्याविशी ठाउके आपणाते,
मना, बोलणे 'दाबुनी' त्यावरी ते!
दुजांची जरी जाणशी गुप्त बिंगे
तरी धाव घे वृत्तपत्रात वेगे!

मना सज्जना, चार आण्यात फक्त
तुला व्हावयाचे असे 'देशभक्त'!
तरी सांगतो शेवटी युक्ति सोपी,
खिशामाजि ठेवी सदा गांधिटोपी!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

पत्रे लिहिली पण...?

तू आलीस बघावया सहज 'त्या' देवालयी 'गालिचे'
होतो चोरुनि अंग मीहि घुसलो त्या गोड गर्दीमधे!
तूझे दिव्य अहा, न म्यां निरखिले लावण्य जो गालिचे-
तो डोळ्यांपुढुनी पसार कधि तू झालीस विद्युल्लते?

तू गेलीस!! मनात अन् कसकसे वाटू मला लागले!
यावे अंगि भरून हीवच जसे पित्तप्रकोपामुळे!
माघारी फिरलो तसाच धरुनी मी गच्च डोके तदा,
(कोणी बांधिति काही तर्क!) पडता वाटेत मी चारदा!

तेव्हापासुनि मी तुझी करितसे टेहेळणी सारखी
बागा, पाणवठे फिरून दमलो-देवालये धुंडिली!
उद्देशून तुला कितीक रचिली काव्ये तशी मासिकी,
'व्यक्ति-स्तंभि' हि जाहिरात कितिदा पत्रांतुनि म्या दिली!

पत्रे आजवरी तुला खरडली त्यांची पहा बंडले-
येथे बांधुनि ठेविलीत! पण ती धाडू कुठे प्रेमले?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें