बोलणी

आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
"ही कृपा ईश्वरी"- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
"छान धन्वंतरी बोलती !"

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - एल्गार

रोज

गात्रागात्राला फुटल्या
तुझ्या लावण्याच्या कळ्या
जन्म वेढून बांधिती
तुझ्या भासांच्या साखळ्या!

रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षत्रे खुडती;
रोज तुझ्या भेटीसाठी
बाहू आसवांचे होती!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

ते

त्या वेळी
तू आलास
आणि म्हणालास
” एक्मेकांवर प्रेम करा ! “

त्यांनी तुला क्रुसावर खिळले !

मग
शतकांचा अंधार ओलांडुन
पुन्हा आलास सूर्यकिरणांतून
आणि म्हणालास
” सबको सन्मति दे भगवान ! “

त्यांनी तुझ्यावर गोळ्या झाडल्या !


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - झंझावात

ओठ

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?

आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?

बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?

कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - एल्गार

पोरवयात

पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्र्याइतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्या पोरवयासह पळणाय्रा झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
नाकारला स्पर्श वत्सल, हळवा,
अहंकार जागवणारा....
तिने फक्त ओठ घट्ट मिटले,
डोळे स्थिर समोर....
आणि समजूतदारपणे
मेमसाबची बॅग सांभाळली.त्या वेळी
मी हादरलो माझ्या वयासकट....
प्रिय आत्मन,
इतक्या कोवळ्या वयात,
तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस....

सांगाडा

तारेत अडकलेल्या,
मुळारंभाशी संबंध तुटलेल्या
पतंगाचे काय होते?
प्रथम, संपूर्ण निरागस नेणीव
अडकल्याची;
वारा आल्यावर उडतोही मनमोर
पूर्विसारखाच
अद्न्यात हाती लीलसूत्र असल्यासारखा..
नंतर,तार वर्याशी संगनमत करुन
त्याचे ऊडण्याचे सुत्रच गायब करते तिथे
प्रस्थान त्याचा धडपडीचे;
सर्वांग फाटेपर्यंत त्याचे
हल्ले चहुबाजूंनी तारेवर
तारेची बेलाग ताकद उमगेपर्यंत...
मग, गहीरे मस्तवाल रंग फिकट होऊ लागतात,
वार गिधाडासारखा
फिकट झालेले रंगही तोडून नेतो दिगंती...
आणि एके दिवशी संध्यासमयी पहावे तो तर-
नुसता सांगाडा काड्यांचा
सांगाडा नुसत्या काड्यांचा
सांगाडा देखण्या रंगीत रुपाचा
सांगाडा हवेत झेप घेणार्याचा
सांगाडा आकाशात गर्वाने डोलणार्याचा
सांगाडा सुतावर स्वर्गाचा भरवसा ठेवणार्याचा
सांगाडा खुप अनंत खूप अनादी
"नियती भोगल्यावर
एवढेच शिल्लक रहाते" हे सांगणारा


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ