प्रीति

प्रीति मिळेल का हो बाजारीं ?
प्रीति मिळेल का हो शेजारीं ?
प्रीति मेळेल का हो बागांत ?
प्रीति मिळेल का हो शेतांत ?

प्रीतिची नसे अशि ग मात;
पहा शोधुनी ह्रदयांत !

नंदनवनामघीं आला
कल्पलतेला बहर भला;
तिचीं ह्रदयीं बीजें पडलीं,
प्रीति त्यांतूनी अवतरली !

प्रीतिची असे अशि ग मात;
पहा आपुल्या ह्रदयांत !

प्रेमळ कृत्यांची माळ
प्रियजनकण्ठीं तूं घाल;
द्विगुणित मग तो प्रीति तुला
देइल, न धरी शंकेला.

प्रीतिचा असा असे न सौदा ---
प्रीतिनें प्रीति सम्पादा !

ह्रदयीं आलिंगन पहिलें,
चुम्बन मुखकमलीं वहिलें
आणिक रुचतिल ते चार
प्रीतिला होती उपचार !

प्रीति वाढली, गडें ग, सतत
पहा तूं प्रियजनहृदयांत !

प्रीति असेल का ग बाजारीं ?
वेडे ! प्रीति मिळेल का ग शेजारीं ? 


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
१८८८

प्रयाणगीत

( चाल---पांडुकुमारा पार्थ नरवरा )

तुजविण मजला कांहि असेना प्रिय या गे जगतीं;
तूं मम जीवित, तूं मम आत्मा, तूं माझी शक्ति !
तुजला सोडुनि जाणें येई, सखे ! जिवावरती,
परी ओढुनी दूर नेति या, निर्दय दैवगति !

प्रीति जगाचें वसन विणितसे, वामांगीं ढकली ---
धागा, परि तो परतुनि उजविस भेटतसे कुशलीं !
मेघ विजेला नभी सोडुनी खालीं ये, परि तो
रविदीप्तीच्या दिव्यरथीं तिज भेटाया वळतो !

रवि, पूवेंला रडत सोडुनी, कष्टें मार्ग धरी.
प्रहरामागें प्रहर लोटतां तिजला घे स्वकरीं !
धरेस सोडुनि गिरि जरि वरि ते उंच नभीं चढले
तरीं खालते कालगतीनें येती प्रेमकले !

प्रीतीचा पथ वर्तुळ आहे, नर त्यानें जातां
मागें असल्या प्रियेचिया तो सहजचि ये हाता !
धीर धरोनी आटप, म्हणुनी बाष्पें मजसाठीं,
ठसा प्रीतिचा ठेवूं शेवटीं ये ग गडे ! स्वोष्ठीं !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- ११ जानेवारी १८८९

माझा अन्त

मीं पाहिली एक सुरम्य बाला;
वर्णू कसा त्या स्मरसंपदेला ?
वृक्षावरी वीज जघीं पडावी,
त्याच्या स्थितींतचि तिची महती पहावी.

माझी अवस्था बघुनीच तीचें
सौंदर्य सोपें अजमावयाचें;
वस्ताद जी चीज जगीं असावी,
तिचें स्वरूप सगळें परिणाम दावीं.

सौंदर्य पुष्पासम वर्णितात,
झालें मला कंटकसें प्रतीत;
सौंदर्य मानोत सुधानिधान,
तें जाहलें मज परंतु विषासमान !

नेत्रें क्षणीं तारवटून गेलीं,
अंगें ज्वरीं त्या परतंत्र झालीं,
झालों तिला मी बघतां भ्रमिष्ट,
शुद्धि सवेंचि मग होय अहा ! विनष्ट.

माझा असा अन्त अहो जहाला !
‘ कोठूनियां हा मग येथ आला !---’
ऐसा तुम्हां संशय येतसे का ?
मी भूत हें मम असें, नच यांत शंका !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- वृत्तधैचित्र्य
- मुंबई, ४ जानेवारी १८९०

फार दिवसांनीं भेट

( चाल --- इस तनधनकी कोन बढाई )

बहुतां दिवशीं भेट जाहली,
प्रणयसिंधूला भरती आली ! ॥ध्रु०॥

आलिंगन दृढ देतां आला
उभयीं ह्रदयीं त्वरित उमाळा;
नावरून तो रमणीनयनीं
बाष्पें आलीं ऊन होउनी;

गलितशीर्ष निज पतिच्या ह्रदयीं
ठेवुनि रडली ती त्या समयीं;
तोहि उसासे टाकित, तिजला
चुम्बित, गाळूं टिपें लागला;

उभयाश्रुजलें मिसळुनि गेलीं !
बहुतां दिवशीं भेट जाहली !
वियोगसमयीं झालें त्यांचें
म्लान रूप तें परस्परांचें ---

ध्यानीं येतां, प्रेमग्रंथी
त्यांची झाली अधिकच दृढ ती;
कालें आणिक कष्टदशेनें
क्षीणत्वाला होतें जाणें

सगळयांचेंहि, परी प्रीतिचा
जोम वाढतो उलटा साचा !---
कुरवाळित अन्योन्यां ठेलीं !
बहुतां दिवशीं भेट जाहली !

किती वेळपर्यंत तयांना
कांहीं केल्याही वदवेना;
‘ प्रिय लाडके !’--‘ जिवलग नाथा !’
हे रव वदली मग उत्सुकता;

फुटकळ वाक्यें मग दोघांहीं
परस्परां जीं म्हटलीं कांहीं,
भाव त्यांतला कीं---नच व्हावा
वियोग फिरुनी, किंवा यावा

मृत्यूच दोघां त्याच सुवेळीं !
जधीं बहु दिनीं भेट जाहली !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- २६ जानेवारी १८९८

प्रणय - कथन

म्हणे मला आपला ‘ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !
वद असे मजवरी प्रेम तुझें गे तारे ! जिवलगे ! ॥ध्रु०॥

जें वाटे तें वदण्याहुनि तदनु रूप बरवें करणें,
सुज्ञ सांगती व्यवहारी हा नियम निज मनीं धरणें;
शहाणपण हें लौकिक सखये गुंडाळूनि तूं ठेवी,
क्षणभर त्याच्या विरुद्ध मजला निजवर्तन तूं दावीं.
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !

हारतुरे हे मजकरितां तूं असती सुंदर केले,
अगरूची ही उटी सुवासिक सिद्ध असे या वेळे;
यावरुनि जरी शंका न उरे मला तुझ्या प्रणयाची ---
तरीहि वेडयापरि मी तुजला तसें वदाया याचीं !

म्हण मला आपला ’ प्रिय--- जिवलग ; हे मधुरे !
व्यवहाराची काय कसोटी प्रीतीला लावावी ?
विसर विसर तूं व्यवहाराला विसरहि सुज्ञपणाला,
आणिक वेडी होउनि वद जें व्हावें या वेडयाला !
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ गे मधुरे !

जलाशयाला झरी मिळाया असतां जात, तयाला
निज मंजु रवें न काय वितरी ती अपुल्या प्रणयाला ?
नदी निधीला भेटायाला जातां ती वेगानें,
काय बरें स्वप्रिया कथाया गाते खळखळ गाणें ?
म्हण मला आपला ’ प्रि---जिवलग ’ हे मधुरे !

सागरलहरी किनार्‍यास घे वळघे आलिंगाया,
किति निस्सीस प्रेमघोष ते करिते वद समयीं त्या ?
हवा गिरीशीं रमावयाला त्वरित गतीनें धावे
प्रणयकथन तें तीचें तुझिया श्रवणां काय न ठावें ?
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !

सांगितल्या या प्रणयवतींचें वळण तुवांही ध्यावें,
मौन असे हें काय म्हणुनि तूं वद गे स्वीकारावें ?
ताम्बूल असो, मधुपर्क असो, असो पुष्पशय्याही,
येइल तुझिया आशयास का पुरी व्यक्तता यांहीं ?
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !

जड हस्तांच्या मर्यादित या कृतींमधें पर्थाप्ति
जडातीत त्या मनोगताची कशी बरें व्हावी ती ?
शुक्तिपुटीं जर समाविष्ट तो रत्नाकर होईल,
उपचारीं निस्सीम प्रीतिही पुरती समजावेल !
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !

स्वाभिप्राया विदित कराया एकच साधन मोठें---
जिव्हाग्रीं तें; पहा विचारुनि मनीं खरें कीं खोटें ?
दों ह्रदयांच्या संगमसमयीं कसल्या लौकिकरीति---
घेउनि बससी ! सोड लाडके मर्यादेवी स्फीति !

विसर तर झणीं व्यवहाराला विसर शहाणपणाला,
आणिक वेडी होउनि वद जें व्हावें या वेडयाला !
म्हण मला आपला ’ प्रिय---जिवलग ’ हे मधुरे !
वद असे मजवरि प्रेम तुझें गे तारे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १८९८

मनोहारिणी

( चाल---भक्ति ग वेणी० )

तीच मनोहारिणी !--- जी ठसलीसे मन्मनीं ! ॥ध्रु०॥

सृष्टिलतेची कलिका फुलली
अनुपम, माधूर्यानें भरली;
जिच्या दर्शनीं तटस्थ वृत्ती
भान सर्वही विसरुनी जाती;

ती युवती पद्मिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

निज गौरत्वें शशिकान्तीला
लज्जा आणीलच ती बाला,
तल्लावण्यप्रभा चमकते !
विजेहूनिही नेत्र दिपविते !

रूपाची ती खनी---जी टसलीसे मन्मनीं.

“ इच्या कुन्तलावरणाखालीं
तारका कुणी काय पहुडली ?
उज्ज्वलता ही तरीच विलसे
भाळीं ! ” हा उद‍गार निघतसे,

ती तरुणी पाहूनी---जी ठसलीसे मन्मनीं !

“ शीर्षीं निजल्या त्या तारेचे
किरण आगळे या रमणीचे
नेत्रांवाटें काय फांकती !”
उद्‍गारविते प्रेक्षकास ती

निज दृष्टिप्रेषणीं--- जी ठसलीसें मन्मनीं !

गुलाब गालीं अहा ! विकसले
आणि तेथ जे खुलुनि राहिले,
विलक्षणचि---ते कंटक त्यांचे
सलती ह्र्दयीं कामिजनांचे !

ऐशी ती कामिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

मृदु हंसतां ती मधुर बोलतां,
प्रगट होय जी ह्र्दयंगमता,
तीच्या ग्रहणा नयनें श्रवणें
सुरांचींहि वळतिल लुब्धपणें

ऐशी ती भामिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

वक्षःस्थल पीनत्व पावलें,
गुरुत्वहि नितंबीं तें आलें;
तेणें सिंहकटित्व तियेचें
अधिकचि चित्ताकर्षक साचें !

विकल करी मोहिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

बहाराला नवयौवन आलें,
ओथंबुनि तें देहीं गेलें !
म्हणुनि पळाली बाल्यचपलता,
गतिनें धरिली रुचिर मंदता

गजगमनें शोभिनी --- जी ठसलीसे मन्मनीं !

सौंदर्यें शालिन्यें पुतळी
ती रामायणमूर्तिच गमली,
उदात्त मुद्रा, गंभीर चर्या,
यांहीं भारत खचिता वर्या,

तीं रमणी सद्‍गुणी--- जी ठसलीसे मन्मनीं !

तिच्या दर्शनें मन उल्हासे,
तिजविण सगळें शून्यचि भासे,
म्हणुनी करुनी ध्यानधारणा
अन्तर्यामीं बघतों ललना
तीच मनोहारिणी---जी ठसलीसे मन्मनीं !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १९०४

मयूरासन आणि ताजमहाल

कामें दोन सुरेख त्या नृपवरें केलीं :--- मयूरासनीं,
ज्या तो बैसुनि शोभला; प्रथम तें सा कोटि ज्या लागले,
राजे ज्यापुढते जुळूनि अपुल्या हस्तद्वया वांकले,
झाले कम्पित, तत्कारीं शिर असे, येऊनियां हें मनीं;

प्रेमें मन्दिरही तसें निजसखीसाठीं तयें लादुनी ---
कोटि तीनच त्या गभीर यमुनातीरावरी बांधिलें !
चोरें आसन तें दुरी पळविलें ! स्मर्तव्य कीं जाहलें !
आहे अद‍भुत तो महाल अजुनी तेथें उभा राहूनो !

विल्हेवाट अशीच रे तव कृती त्या सर्वदा पावती;
मत्त भ्रान्त नरा ! सदैव कितिही तूं धूप रे जाळिला

स्वार्थाच्या प्रकृतीपुढें---निजमनीं ही याद तूं जागती
राहू दे---तरि धूर होइल जगीं केव्हांच तो लोपला !

काडी एकच गंधयुक्त, नमुनी प्रीतीस तूं लाव ती,
तीचा वास सदा जगीं पसरुनी देई तो तुष्टिला !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १३ नोव्हेंबर १८९२