दुर्मुखलेला

माझें शुष्क खरेंच हें मुख गुरो ! आहे, तया पाहुती
जाती प्रेक्षक सर्वही विरस ते चित्तामधीं हौउनी;--
हें सर्वां उघडें  असूनि वदुनी कां तें तुम्हीं दाविलें ?
तेणें भूषण कोणतें मग तुम्हां संप्राप्त तें जाहलें ?

याचें तोंड कुरुप हें विधिवशात्‍ गाईल काव्यें नदीं,
तेणें सर्वहि डोलतील जन हे हषें कदाचित भुवि !”
विद्यासंस्कृत त्या तुझ्या, क्षणभरी, मस्तिष्कतन्तूंवरी
येता नम्र विचार हा तुज भला होता किती तो तरी !

जे मुंग्या म्हणुनी मनीं समजशी या मंडळीभीतरीं,
ते पक्षी उडतील होउनि गुरो ! योमीं न जाणों न जाणों वरी !
राखेचीं ढिपळें म्हणोनि दिसतीं जीं तीं उद्यां या जना
भस्मीसात्‍ करणार नाहींत, अशी तुम्ही हमी द्याल का ?

माझ्या दुर्मुखल्या मुखामधुनि या, चालावयाचा पुढें
आहे सुन्दर तो सदा सरसवाङनिष्यन्व चोहींकडे !
तुम्हीं नाहिं तरी सुतादि तुमचे धातील तो प्राशुनी !
कोणीही पुसणार नाहिं, ’ कवि तो होता कसा आननीं ?’


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित

कविता आणि कवि

( श्लोक )

अशी असावी कविता, फिरून
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
अहांत मोठे ? पुसतों तुम्हांला

युवा जसा तो युवतीस मोहें
तसा कवी हा कवितेस पाहे ;
तिला जसा तो करितो विनंती
तसा हिला हा करितो सुवृत्तीं.

लाडीगुडी चालव लाडकीशीं
अशा तर्‍हेनें, जरि हें युव्याशीं
कोणी नसे सांगत, थोर गौरवें
कां तें तुम्ही सांगतसां कवीसवें ?

करूनियां काव्य जनांत आणणें,
न मुख्य हा हेतु तदीय मी म्हणे;
करूनि तें ते दंग मनांत गुंगणें,
तदीय हा सुन्दर हेतु मी म्हणें,

सभारुची पाहुनि, अल्प फार,
रंगीं नटी नाचवि सूत्रधार;
त्याचें तयाला सुख काय होय ?
तें लोकनिन्दाभयही शिवाय !

नटीपरी त्या कविता तयाची
जनस्तुती जो ह्रदयांत याची;
पढीक तीचे परिसूनि बोल
तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल.

स्वभावभूयिष्ठ जिच्यांत माधुरी,
अशी तुम्हांला कविता रुचे जरी;
कवीस थोडा कवितेबरोबरी,--
न जाच वाटेस तयाचिया तरी,

तयाचिया हो खिडकीचिया, उगे,
खालीं, तुम्ही जाउनि हो रहा उभे,--
तिच्या तयाच्या मग गोड लीला
ऐकूनि, पावाल तुम्ही मुदाला !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- ३० डिसेंबर १८८६.

कवितेचें प्रयोजन

” शान्तीचें घर सोडुनी प्रखर त्या हाटीं प्रयत्नाचिया,
प्रीतीचाहि निकुंज सोडुनि रणीं जीवित्व नांवाचिया,
सर्वांहीं सरमावणें झटुनियां हें प्राप्त झालें असे;
या वेळे न कळे कवे ? तुज सुचे गाणें अहा रे कसें !

” माता ही सुजला स्वभूमि सुफला, तीच्या परी लेंकरीं
खायाला पुरतें पहा नच मिळे कीं हाल आहे पुरा;
झांकायास तनूस वस्त्रहि न तें आतां पुरेसें मिळे;
या वेळेस कसें कवे ! तुज सुचे गाणें न मातें कळे !’

हें कोणी म्हणतां जवें कविमनीं खेदोर्मि हेलावल्या,
नेत्रांतून सवेंचि बाष्पसरिता वाहावया लागल्या;
त्याचा स्त्रैणपणा असा प्रकटला वाटेल कोणा, परी
धीरोदात्त असेचि तो श्रुत असे हें दूरही भूवरी !

सोन्याचे सरले अहा ! दिवस ते, आली निशा ही कशी !
सौख्याचा नद तो सुकून पडलों या दुःखपंकीं फशीं !
कालक्रीडीत हें बघूनि रडला, हें व्यस्त कांहीं नसे;
प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवींचा असे,

बाष्पान्तीं तरलस्वरें मग कवी निश्वासुनी बोलिला ---
जो पूर्वीं गुण पुण्यभूमिवरि या अत्यन्त वाखाणिला,
तें हें दिव्य कवित्य दुर्विधिवशें हीनत्व कीं पावलें,
त्याची बूज करावया न अगदीं कोणी कसें राहिलें !

” गाणें जें परिसावया कविपुढें राजेशही वांकले,
यन्नादेंच लहान थोर सगळें गुंगून वेडावले,
त्याला मान नसे, नसो पण, अतां त्याची अपेक्षा नसे ---
हें कोणी म्हणतां विषाद अहिसा मन्मानसाला डसे !

” आलेल्या दुरवस्थितींतुनि तुम्ही उत्तीर्ण व्हाया जरी,
जद्योगीं रत व्हावया धरितसां सौत्सुक्य चित्तीं तरी,
गाण्यानें कविच्या प्रभाव तुमचा वर्धिष्णुता घेइल,
स्फुर्तिचा तुमच्या पिढयांस पुढल्या साक्षी कवी होइल !

” हातीं घेउनियां निशाण कवि तो पाचारितो बान्धवां ---
‘ या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा !’
प्रेतेंही उठवील जी निजरवें, ती तो तुतारी करी,
आतां नादवती, निरर्थ तर ती त्याची कशी चाकरी ?

” आशा, प्रेम तसेंच वीर्य कवनीं तो आपल्या गाइल;
गेलें वैभव गाउनि स्फुरण तो युष्मन्मना देइल,
द्या उत्तेजन हो कवीस, न करा गाणें तयाचें मुकें;
गाण्यानें श्रम वाटतात हलके, हेंही नसे थोडकें;

“ आतां जात असे दुरी शिथिलता अस्मत्समाजांतुनी,
याची खूणच गान जें निघतसें तें साच जाणा मनीं;
तारा ताणिलियावरी पिळुनियां खुंटयास वाद्याचिया,
त्याच्यांतून अहा ! ध्वनी उमटती जे गोड ऐकावया !”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १८९३

काव्य कोणाचें ?

“ कवे ! कोणीं हें काव्य लिहीयेलें ?”
“ मींच ---” कविनें प्रतिवचन बोलिजेलें,

“ बरें तर ! हें वाचून अतां पाहूं,
श्लोक सुन्दर यांतील सदा गाऊं.”

मनीं वाचक तों दंग फार झाला,
क्लृप्ति आढळली सरस एक त्याला;

म्हणे कविता “ ही रम्य फार आहे ?”
वदे कवि “ ती मम पंक्ति कीं नव्हे ते.”

पुढें वर्णन पाहून रेखलेलें,
वाचकाचें रममाण चित्त झालें;

कविस शंसी तो “ धन्य ! ” अशा बोलें
त्यास “ वर्णन मम न तें ” कवी बोले.

“ काव्य लिहिलें हें सत्य तूं असून,
“ नव्हे माझें हें --- नव्हे तें ” म्हणुन

सांगसी, तर परकीय कल्पनांतें
तुवां घेउनि योजिलें, गमे मातें,”

‘ नव्हे ऐसेंही ?’ कवी वदे त्यातें,
“ काव्य लिहिले मीं खरें, परी मातें

शारदेनें जो मंत्र दिला कानीं,
तसें लिहिलें मीं;--- काव्य तिचें मानीं !”

“ दिव्य शक्तीनें स्फुरें गंध पुष्पीं,
रंग खुलतीही तिनें इंद्रचापीं;

सृष्टिमाजीं जें रम्य असे कांहीं
तीच कारण त्या शक्ति असे पाहीं ”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी
- भडगांव, ७ ऑगस्ट १८९७

सृष्टि आणि कवि

वयस्या, गाते ही मदुधनरवें सृष्टि मधुर,
कसा गाऊं तीच्यापुढति वद मी पामर नर ?
तशी ती गातांना श्रुतिसुभग तीं पक्षिकवनें
कशासाठीं गावीं अरस कवनें मीं स्ववदनें ?

मिषानें वृष्टीच्या खळखळ अशी सृष्टि रडतां
कुणाची ढाळाया धजल तसले अश्रु कविता ?
निशीथीं ती तैशी हळु मृदुमरुच्छ्‍वास करितां
कवीची गा कोण्या त्यजिल तसले श्वास दुहिता ?


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शिखरिणी

दूर कोठें एकला जाउनीयां

दूर कोठें एकला जाउनीयां,
एकतारी आपली घेउनीयां,
स्वेच्छें होतों छेडीत ती, मनाला
दुःखिताला आराम व्यावयाला,

आजवेरी बहु मनोभंग झाले
बहुत आशांचे प्राण निघुनि गेले
तयां शोचाया निर्जनांत जावें,
एकतारी छेडीत मीं बसावें

आजदेखिल मी तसा अस्तमानीं
वाद्य वेडें वांकुडें वाजवूनी
दंग झालों स्वच्छन्द गायनानें;
खरें संगीतज्ञान कोण जाणे !

ह्रदय आत्म्याला जधीं खेळवीतें,
ह्रदय आत्म्याला जधीं आळवीतें;
तधीं तुमचें तें नको कलाज्ञान,
तधीं ह्र्दयासन नसे तानसेन !

असो; असतां मन गायनांत लीन,
रात्र झाल्याचें भान राहिलें न;
असें कलहंसा वाहतां प्रवाहीं
प्राप्त मरणाचें ज्ञान नसे कांहीं !

अहा ! अद्‍भुत तों काय एक झालें ---
‘ धन्य बन्धो ! ’ हे शब्द वरुनि आले !
बरी बघतां, तारका उंच आहे,
सदय सस्मित मजकडे वरुनि पाहे !

प्रसादें त्या वांकतां, काजव्याचें
स्फुरण खालीं बघुनि मी म्हणें---” याचें
साम्य कांहींतरि असे तुशीं तारे !
माझिया तर जीवितीं तिमिर सारे !”

“ नको ऐसें रे वदूं बन्धुराया !”
म्हणुनि लागे ती मला आश्वसाया ---
“ तुझ्या दिव्यत्वापुढें जग भिकारी !
कासया ही खिन्नता---दूर सारीं !”

अशा भगिनीचा लाभ मला झाला;
तिचा आभारी दुवा देत तीतें,
समाधानी मी पातलों घरातें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी
- २७ ऑगस्ट १९०३

शब्दांनो ! मागुते या !

तेजाचे पंख वार्‍यावरि हलवित ती चालली शब्दपंक्ति,
देव्हांहीं चित्तभूमी विकसित हिरवी तों मदीया बघूनी,
देव्हारा माझिया तो उतरुनि ह्र्दयीं स्थापिला गौरवूनी.

शब्दांसंगें तदा मीं निजह्रदयवनामाजीं संचार केला,
तेथें मी कल्पपुष्पें खुडुनि नमुनि तीं वाहिलीं शारदेला,
शब्दांच्या कूजितानें सहजचि मम ह्रत्प्रान्त गुंगूनि गेला;
मीं त्या स्वप्नांत गद्यग्रथित जग मुळीं लोटिलें तुच्छतेला !

रागानें या जगानें अहह ! म्हणुनियां शापिलें या जनाला,
तेणें चित्ताग्नि माझी ह्रदय हरितता नाशिता फार झाला;
गाणारे शब्द सारे झडकरि उडुनी दूर देशास गेले,
वाग्देवीपीठ येथें परि मम ह्रदयीं दिव्य तें राहियेलें.

वाग्देवी शारदे गे ! फिरवुनि अपुले शब्द पाचार येथें !
साहाय्यावीण त्यांच्या भजन तव कसें सांग साधेल मातें ?
आशामेघालि चिन्तानल अजि विझवूं जाहलीसे तपार,
शब्दांनो ! मागृते या ! बहर मम मनीं नूत्न येईल फार !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- स्त्रग्धरा
- १५ सप्टेंबर १८९२