क्षणांत नाहीसे होणारे दिव्य भास

( कवि, चित्रकार आणि तानसेन यांस जीं अलौकिक स्वप्नें, ज्या दिव्याकृति आणि जे गंधर्वालाप भासमान होतात, अहह---त्यांपैकीं किती थोडे मात्र त्यांस आपल्या करामतींत गोंवून ठेवितां येतात बरें ! आत्माराम आणि आका कोण हें सांगावयास नकोच. )

आत्माराम सुखें वनामधुनि तो होता जरा हिंडत,
तों झाला बघता दुरूनि सहसा कोण्या सुमुर्तिप्रत;
तीच्यामागुनि मोहुनी हळुहळु जायास तो लागला,
“ आहे ही पण कोण ? ” या क्षणभरी प्रश्नावरी थांबला.

“ रम्भे १ ” “ उर्वशि गे ” तशींच दुसरीं जीं त्यास होतीं प्रियें
नामें, त्यांतिल घेउनि फिरूनि तॊ बाही त्वरेनें तिये;
ती कांहीं तरिही वळे न, बघुनी तो विस्मया पावला;
जातां सन्निध, “ हो नवीनचि अहा ! कोणी दिसे ” बोलला !

कांहीं नांव नवीन देउनि तिला जेव्हां तयें बाहिलें.
तों तीनें वळनी प्रसन्न वदनें त्याच्याकडे पाहिलें;
त्या रूपद्युतिनें दिपूनि नयनें निर्वाण तो पावला,
तों अन्तर्हित, दृष्टीचा विषय तो, एका क्षणीं जाहला !

आकाची इतुक्यांत हांक परिसे आत्मा, घराला वळे;
आकाच्या हुकुमांत, साक्ष अवघी ती विस्मरूनी, रूळे;
कोणेका दिवशीं तिथें फिरतां तो गोष्ट त्याला स्मरे,
तच्चितीं, पण रूप नाम अथवा तीचें मुळींही नुरे !

आत्माराम सखेद होउनि वदे तो आपणाशीं असें ---
“ कांही सुन्दर देखिलें खचित मीं, यामाजि शंका नसे !
हा ! हा ! -हे जर सर्व भास धरतां येतील मातें, तर
पृथ्वीचा सुरलोक कीं बनवुनी टाकीन मी सत्वर !”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- मुंबई २७ मार्च १८९३

दिवा आणि तारा

तार्‍याला जमिनीवरूनि वदला गर्वें दिवा हें असेंप :---
“ अस्पष्ट द्युति ही कीती तव ! तुझा रात्रौ कितीसा असे ----
लोकाला उपयोग ? मी बघ कसा तेजा निजा पाडितों
अंधारीं ब्यवहार सर्वहि जगीं माझ्यामुळें चालतो ! ”

तारा तो वरुनी दिव्यास वदला गम्भीर शान्त स्वरें ----
“ दीपा ! तूं म्हणतोस तें कवण तो लेखील खोटें बरें ?
जी वस्तुस्थिति ती परंतु बघता आहे जरा वेगळी,
अंधारावर तूझिया मम नसे बा ! योजना जाहली.

“ भांडीं, तों मडकीं, डबे ढकलिसी अंधार यांपासुनी,
बह्मांडास परन्तु मी उजळीतों, गेलीं युगें होउनी;
तेजानें वरुनी दिव्या ! खुलविसी तूं मानवी चेहरे,
आत्मे उज्ज्वल आंतले पण गडया ! होतात माझे करें !

“ ज्ञाते, आणि भविष्यवादीहि, कवी, ते चित्रकतें तसे,
मत्तेजें फिरतात, अन्य जन हे तूझ्या प्रकाशें जसे;
तूझ्यासन्निध जो कवी लिहितसे त्यालाच तूं पूस रे ---
“ दीपाच्या लिहितास तूं द्युतिबलें कीं तारकांच्या बरें ?”


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित 
- सष्टेंबर १८९२

प्रीतीची भाषा

होतों मी बसलों समीप रमणी एके दिनीं घेउनी;
‘ कोणाचा सखि ! तूं ? ’ म्हणोनि पुसलें लाडें तियेलागुनी.
तों माझ्या ह्रदयावरी निज शिरा प्रेमें तिनें ठेविलें;
‘ कोणाचा सखि ! मी ? ’ म्हणोनि म्हणतां मातें तिनें चुंबिलें.
‘ माझें कोण ? ’ पुसे, तिनें चढविला स्कन्धीं निजीं मत्कर;
‘ तुझें कोण ? ’ म्हणें तधीं मज तिनें आलिंगिलें सत्वर;
‘ माझ्याशीं नच बोलशी, तर तुझा मी नाहीं जा ! ‘ बोललों,
तों अश्रू गळती तिचे टपटपां !--- मी फार पस्तावलों !


कवी - केशवसुत
- शार्दूलविक्रीडित
२२-११-१८९०

पुष्पमाला

प्रियेला सादर केलेली पुष्पमाला किंवा कर्तव्य आणि प्रीति
नदीच्या तीरानें सहल करितां मी, जिवलगे,
पहाली ती शोभा कुसुमित वनाची जवळ गे;
तधीं तेथें गेलीं उचलूनि पदे मी झरझरा,
जसा बाळया शाळेमधुनि अपुला ये निज धरा !

तृणाची गे खालीं रुचिर हिरवी चादर बरी,
लतांची वृक्षांची निविड फुगडी शोभत वरी;
फुलें तीं वल्लीं नव किसलयीं शोभत किती !---
तुझ्या ओंच्यामध्यें जशिं निज अपत्यें विलसती !

स्वप्नांहीं तें होतें विपिन मधुरे ! फार गढलें,
मुलांच्या शब्दांहीं स्वसदन असे जेंवि भरलें;
सुगन्धें तें होतें स्थल भरुनि गेलें अतिशय
तुझ्या प्रेमानें हें भरुनि असतें जेंवि निलय !

तरी सुद्धां तेथें, मज गमतसे, लौकिक नव्हे,---
असें कांहीं होतें, कथन करण्या जें मज न ये; ---
वसे तो विश्वात्मा वरुनि कवितादेविस तिथें,
वसे जैसा मी हा मनुज तुजला घेउनि इथें .

मनीं माझ्या व्हावी चलित कविताशक्ति, म्हणुनि
कशाला एकाकी फिरत असतों नित्य निपिनी ,---
तुला तूं त्या ठायीं असतिस तरी हें समजतें;
कदाचित्‍ तूं गाणें मधुर रचिलें तेथ असतें !

तधीं मालें तेथें सहज कवनस्फूर्ति चढली,---
तुझी वर्णायाला अकपट अशी प्रीति सुचली;
फुलांच्या मीं भाषेंमधिं रुचिर हें काव्य रचिलें,
मिषानें माल्याच्या;--- ग्रहण कर तूं तें तर भलें.

शिरीं तूं या माल्या तर जिवलगे ! धारण करीं,
छबी तूझे काळया कुरळ अलकीं येइल बरी;
फुलांच्या गे भाषेमधिंच कवनें नित्य करणें.
मला व्हावें तेणें प्रिय. तुज शिरीं त्यांत धरणें.

सुवर्णाच्या भूषा जरि तव शिरीं या विलसती,
तरी या माल्याचें अणुभर न त्या काम करिती,---
करी हें सोनें गे प्रकट मम कर्तव्यपरते,
मदीय प्रेमाला प्रकट पण हें माल्य करितें

सुवर्णाचे केले तुज जरि अलंकार रमणी,
करावें तूं प्रेमा अधिक मजशीं काय म्हणुनी ?---
स्थितीला शोभावे, तुजवरि अलंकार असले
न मीं केलें. मातें म्हणतिल तरी काय सगळे ?

जरी तूझी माझी प्रबल नसती प्रीति, तरि ते
जनांसाठीं केले तुजवरि अलंकार असते;---
परी तूझे तेथें स्मरण करुनी, प्रेमळपणें,
करें माझ्या झालें खचित नसतें माळ करणें.

( वसंततिलका )

कर्तव्या जोंवरि चुकूं न करावयास,
सम्बन्ध तों सुखद होय परस्परांस;
कर्तव्य तें परि जगीं न कधीं उदात्त
प्रीतिस जागृत करील परस्यरांत.

( शार्दूलविक्रीडित )

अन्यानें न अपेक्षिलें प्रियतमे ! जें आपणापासुनी,
तें सद्वर्तन दावितां सहज तो जातो मनीं मोहुनी,
त्याच्या गे ह्रदयांत नंतर उठे उद्वेग तो प्रीतिचा;
ऐसा आपण पाहतों नियम हा कान्ते ! सदा सुष्टिचा.

( शिखरिणी )

कधीं मी कर्तव्यीं चुकुनि तव गे चित्त दुखलें,
तरी चित्तामध्यें स्मरण कर हीं सुन्दर फुलें;
जधीं या हाताचें सकल बल जाईल सरुनी,
दिलेलें हें त्यानें स्मर सखि ! तधीं माल्य फिरुनी !


कवी - केशवसुत
१५-११-१८९०

कविता आणि प्रीति

( भुजंगप्रयात )

फिरावयास मी मित्र घेवोनि गेलों;
बघोनी सुरम्य स्थळा एक ठेलों;
किती हारिनें वृक्ष ते दाट होते,
जलाचे तळीं पाट होते वहाते;

तृणाच्या मधीं, राखिल्या गार जागा
कडेनें तयांच्या, लतांच्याहि रांगा---
फुलांच्या बहारांत त्या शोभताती;
अलींचे थवे त्यांवरी धांव घेती;

मधूनी किती पक्षि ते गोड गाती.
मृगेंही मघें स्वैर तीं क्रीडताती;
मयूरें अहा ! दाखवीती पिसारे;
बघूनी मना तोष होई अहा रे !

मधें अंगना स्पृष्ट ज्या यौवनानें
नजाऽव्याजरूपास साध्या मदानें
इथूनी तिथें चंचला नाचवीती,
पदालंकृति झंकृति तैं करीती;

मुलें खेळती नाचतीही मजेनें,
तयांचा अहो कोण उल्हास वाने ?
फुलें, तारका, ते दंवाचे तुषार,
तशीं मुग्ध हीं बालकें दिव्य फार !

अशी तेथली पाहुनी रम्य लीला,
मुखीं घालूनी ठाकलों अंगुलीला;
वदे मित्र मातें---“ पुढें चालणें ना ? ”
परी पाय तेथूनियां काढवेना !

( वसंततिलका )

बोले सखा “ गढुनि कां इतुका मनीं तूं ? ”
मी बोललों “ बघ मनांत विचारुनी तूं ”
तेव्हां पुसे “ अडविते कतिता ? ”---“ नव्हे रे,
प्रीती मला भूलविते-नच हालवे रे ! ”


कवी - केशवसुत
- मुंबई, ७ जानेवारी १८९०

प्रत

सिद्ध झालों मी दूर जावयाला,
कण्ठ तेव्हां तो फार भरुनि आला;
मला म्हटलें तूं गद‍गद स्वरानें
” खुशालीचें तें वृत्त लिहित जाणें ! ”

” लिहिन ” म्हटलें मी तुला आश्वसाया
पुढिल केला मीं मुळी नच विचार
करीं घेतां परि पत्र हें लिहाया
खुशालीचें क्षीणत्व दिसे फार !

लोचनांला या होसि तुं प्रकाश
मदीयात्म्याचा तूंच गे विकास
नाडि माझी तव करीं वाहताहे
ह्रदय माझें तव उरीं हालताहे !

करा अपुल्या तूं पहा चाचपून
उरा आपुलिया पहा तपासून.
प्रकृति माझीही तिथें तुज कळेल
विकृति माझी तुज तिथें आढळेल !


कवी - केशवसुत
- दिंडी
- १८८९

विकसन

( वसंततिलका )

कंपायमान कलिका सुकुमार झाली,
स्वेदें तदीय तनु चिंब भिजोनि गेली,
भेणें तिनें मुरकुनी शिर नम्र केलें,
बाष्पीय बिंदुहि अहा ! सहसा गळाले !

( शार्दूलविक्रीडित )

“ हा वेडे ! फुलण्यास लाज इतुकी कां अंतरीं पावसी ?
हास्या दावुनि, सिद्ध ही रसिक तो जिंकावया हो कशी ! ”
ऐसें पालक देव एक तिजला आश्वासुनी बोलला;
तेव्हां ती फुलली; रसज्ञ जनही सौख्यांत हा पोहला !


कवी - केशवसुत
- २८ जानेवारी १८८९