कशी तुज समजावू सांग

कशी तुज समजावू सांग
का भामिनी उगिच राग ?

हास्याहुन मधु रुसवा
हेमंती उष्ण हवा
संध्येचा साज नवा
हा का प्रणयानुराग ?

चाफेकळी केवी फुले
ओष्ठ-कमल जेवी उले
भोवती मधुगंध पळे
का प्रसन्न वदन राग ?

वृत्तींचा होम अमुप
त्यात जाळू गे विकल्प
होवुनिया निर्विकल्प
अक्षय करु यज्ञ-याग

ओठांचे फेड बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंध
हृदयांचे मधु प्रयाग


 - बा.भ.बोरकर

दीपका ! मांडिले तुला

दीपका ! मांडिले तुला, सोनियाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्यांची करू सोपी पायवाट

घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात कालविला हा जिरेसाळ भात

गा रे राघू, गा ग मैने बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
कुतु काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे

गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याते थोर करी माये ! कुलदेवी !


  - बा.भ.बोरकर

दिव्यत्वाची जेथ प्रचिती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती


 - बा.भ.बोरकर

नाही पुण्याची मोजणी

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग

आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप

पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा

  - बा.भ.बोरकर

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुगुटमणी देखा ।
पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥


  - संत चोखामेळा

ऊंस डोंगा परी

  ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
  काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥

  कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
  काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

  नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।
  काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥

  चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।
  काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

  -  संत चोखामेळा

विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी

विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥

हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥


 - संत चोखामेळा