न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥
पहातां भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं । तयां सुखासरी दुजी नाहीं ॥३॥
पाहातां श्रीमुख हरे ताहान भूक । चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥

  - संत चोखामेळा
विठ्ठल विठ्ठल गजरीं । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर । दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरीकीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

  - संत चोखामेळा
बहुत हिंडलो देश देशांतर । परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों । मनासवें झालों वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भूवैकुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥

  - संत चोखामेळा
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥

पंढरीची हाट कऊलांची पेठ ।
मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥

पताकांचे भार मिळाले अपार ।
होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥

हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता ।
ऐसे बोले गीता भागवत ॥४॥

खट नट यावें शुद्ध होऊनी जावें |
दवंडी पीटी भावे चोखामेळा || ५ ||

  - संत चोखामेळा
पंढरीचें सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणि देखा । पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकासी अखंडित ॥४॥

  - संत चोखामेळा
वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रूप हें सांवळें गोड तें गोजिरें । धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥

  - संत चोखामेळा
जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥
कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो । न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥
तो हरी समर्थ पंढरीये उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥
चोखा म्हणे आमुचें दिनाचे माहेर । तें पंढरपूर भीमातटीं ॥४॥

  - संत चोखामेळा