अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥
सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥
निर्वाणी तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपें दिननिशी । येणें सदां सुखीं होसी जना ॥४॥

  - संत चोखामेळा
देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठाई ॥१॥
निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेच ठाई ॥२॥
चोखा म्हणे पाहतां पाहणें लपावे । ह्रदयीं बिंबले ह्रदयचि ॥३॥

  - संत चोखामेळा
कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें । सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळीलें । शास्त्रातें वाळीलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देहीच भेटला एव आम्हां ॥४॥

  - संत चोखामेळा
आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें ऊडालें पाहणें लपालें । देवे नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें । ह्रदयीं भेटें देहीं देवो ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी । उभा भीमातीरीं विटेवरी ॥४॥

  - संत चोखामेळा

बालक्रीडा

नेणते तयासी नेणता लहान । थोरा थोरपणें दिसे बरा ॥१॥
पावा वाहे वेणु खांदिया कांबळा । रूळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचें । उष्टें गोपाळांचे खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठींचा हरी । गोपाळा गजरीं काला वांटी ॥४॥

  - संत चोखामेळा
सपेम निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं ॥१॥
सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥
कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णव जन ॥३॥
चोखा तया पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥

  - संत चोखामेळा
माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥
अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । विठ्ठलनाम गजरीं आनंदानें ॥३॥
दिंडया गरुड टके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥
तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥

  - संत चोखामेळा