माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥
नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥
आवडी बैसली विठूचे चरणीं । आतां दुजेपणीं नाहीं गोष्टी ॥३॥
चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥

  - संत चोखामेळा
भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठी जप हा सर्वंदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वांधिकार । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥

  - संत चोखामेळा
कोणासी सांकडें गातां रामनाम वाचें । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशि वसे नामापाशी । ऐसी साक्ष देती वेदशास्त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार । राम हा निर्धार जप करीं ॥४॥

  - संत चोखामेळा
 आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥
जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥
असारा साराचे नक पडूं भरी । सार तेंचि धरी हरिनाम ॥३॥
चोखा म्हणे नाम हाचि मंत्र सुगम । नको आन श्रम जाय वांया ॥४॥

  - संत चोखामेळा
नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥
भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥
एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेहीं थारा तईच लाभे ॥३॥
चोखा म्हणे येथें एकचि साधन । संतासी शरण जाईं सुखें ॥४॥

  - संत चोखामेळा
सूखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥
तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥
न लगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोंबाचे ॥३॥
बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥

  - संत चोखामेळा
अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥
क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥

  - संत चोखामेळा