आतां कोठवरी । भीड तुमची धरूं हरि ॥१॥
दार राखीत बैंसलों । तुम्ही दिसे मोकलिलों ॥२॥
ही नीत नव्हे बरी । तुमची साजे तुम्हा थोरी ॥३॥
चोखा म्हणे काय बोलों । आमुचे आम्ही वायां गेलों ॥४॥
- संत चोखामेळा
आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा ।
होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा ॥१॥
तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनीं ।
देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाकणें यासाठीं ॥२॥
केला माझा अंगिकार । आतां कां करितां अव्हेर ।
तुमचा तुम्ही साचार । करा विचार मायबापा ॥३॥
जन्मोजन्मींचा पोसणा । तुमचाचि नारायणा ।
भाकितों करुणा । आना मना चोखा म्हणे ॥४॥
- संत चोखामेळा
कांहो केशिराजा दूजे पैं धरितां । हें तों आश्रर्यता वाटे मज ॥१॥
एकासी आसन एकासी वसन । एक तेचि नग्न फिरताती ॥२॥
एकासी कदान्न एकासी मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न मागतांचि ॥३॥
एकासीं वैभव राज्याची पदवी । एक गांवोगांवीं भीक मागे ॥४॥
हाचि न्याय तुमचें दिसतो कीं घरीं । चोखा म्हणे हरी कर्म माझें ॥५॥
- संत चोखामेळा