इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥
उच्छिष्ट धणिवरी पोटभरी घाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळु देवा ॥४॥
- संत चोखामेळा
आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥
सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥
कामक्रोधांचे सांपडलों हातीं । बहुत फजीति होय तेणें ॥३॥
नेणों कैसें दु:ख पर्वतायेवढें । सुख राई पाडें झालें मज ॥४॥
चोखा म्हणे तुमचें नाम न ये वाचे । बहु संकल्पाचें वोझें माथा ॥५॥
- संत चोखामेळा
किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥
जे जे करितों तें तें फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥
निवांत बैसोनी नामाचें चिंतन । करूं जातां मन स्थिर नाहीं ॥३॥
दान धर्म करूं तो नाहीं धन पदरीं । जन्माचा भिकारी होउनी ठेलों ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करंटा मी देवा । काय तुझी सेवा करूं आतां ॥५॥
- संत चोखामेळा