सकळा आगराचें जें मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥

वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥

कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥

चोखा म्हणे माझ्या ह्रदयीं बिंबला । त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥


  - संत चोखामेळा

 बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥१॥

जात वित गोत न पाहेचि कांहीं । घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥

न मागतां आभारी आपेंआप होती । भाविकासी देतो भुक्ति मुक्ति ॥३॥

चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी । भवभय वारी दरूशने ॥४॥


  - संत चोखामेळा

 उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥

बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥

जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥

चोखा म्हणे सर्व सुखांचे आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥


  - संत चोखामेळा

 निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥

पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥

निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस । तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥

चोखा म्हणे तो तूं जगाचें जीवन । संतांचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥


  - संत चोखामेळा

 श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण । रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥

वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी । इंद्रियाची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥

प्राण जेणें चळे मन तेणें वोळे । शून्यातें वेगळें विठ्ठल माझा ॥३॥

आनंदी आनंद बोधा जेणें बोध । सकळां आत्मा शुद्ध विठ्ठल माझा ॥४॥

मुळाचें निजमूळ अकुळाचें कूळ । चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥


  - संत चोखामेळा

 देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवीनाहो पंढरीचा ॥१॥

पुंडलिकासाठीं युगें अठ्ठावीस । धरोनी बाळवेष भीमातटीं ॥२॥

गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळा । नाचत गोपाळ विठ्ठल छंदें ॥३॥

चोखामेळा तेथें वंदितो चरण । घाली लोटांगण महाद्वारी ॥४॥


  - संत चोखामेळा

 अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥

तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥

अनाथा कैवारी दीना लोभपर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥

चोखा म्हणे माझी दयाळू माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥


  - संत चोखामेळा