कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥ १ ॥

मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें । अनुभवाचें हें सुखें हेलावलें ॥ २ ॥

दृष्टीचें पहाणें परतले मागुती । राहिली निवांत नेत्रपाती ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावें । जीवें ओवाळावें नामयासी ॥ ४ ॥


 - संत गोरा कुंभार

 कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥ १ ॥

जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥ २ ॥

म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे । आम्हांतें राशी राहाणें असे नामा ॥ ३ ॥


 - संत गोरा कुंभार

 रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी ॥ १ ॥

पुंडलिका झाला अनुताप । धन्य सत्य गुरु माय बाप ॥ २ ॥

जन्मा येऊनियां काय केली करणी । व्यर्थ शिणविली जननी ॥ ३ ॥

नऊ महिने ओझें वागऊन । नाहीं गेला तिचा शीण ॥ ४ ॥

ऐसा झालो अपराधी । क्षमा करा कृपानिधी ॥ ५ ॥

ऐसा पुंडलिका भाव । उभा केला पंढरीराव ॥ ६ ॥

भक्त पुंडलिकासाठी । उभा भिंवरेच्या तटी ॥ ७ ॥

कटावरी ठेवूनी कर । उभा विटेवरी नीट ॥ ८ ॥

ऐसा भाव धीर म्हणे गोरा । तीर्था जा फजितखोरा ॥ ९ ॥


 - संत गोरा कुंभार

 नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥ १ ॥

तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण । रहित कारण स्वयंप्रकाश ॥ २ ॥

याही शब्दामाजी वाचा न लागे । मार्ग पैं गा लागे निर्धारिता ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा । चिद्रूप अवघा दिससी साच ॥ ४ ॥


- संत गोरा कुंभार

 काया वाचा मन एकविध करी । एक देह धरी नित्य सुख ॥ १ ॥

अनेकत्व सांडीं अनेकत्व सांडीं । आहे तें ब्रह्मांडीं रूप तुझें ॥ २ ॥

निर्वासना बुद्धि असतां एकपणें । सहज भोगणें ऐक्य राज्य ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार नाहीं रूप रेख । तेंचि तुझें सुख नामदेवा ॥ ४ ॥


- संत गोरा कुंभार

केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥

विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ । नेत्रीं वाहे जळ सद्‍गदीत ॥ २ ॥

कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त ॥ ३ ॥


- संत गोरा कुंभार

सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥ १ ॥

कवणाचे सांगातें पुसावया कवणातें । सांगतों ऐक तें तेथें कैचें ॥ २ ॥

नाहीं दिवस राती नाहीं कुळ याती । नाहीं माया भ्रांति अवघेची ॥ ३ ॥

म्हणे गोराकुंभार परियेसी नामदेवा सांपडला ठेवा विश्रांतीचा ॥ ४ ॥


   - संत गोरा कुंभार