मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥ १ ॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥
आनंदी आनंद गिळूनि राहणें । अखंडित होणें न होतिया ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें । जग हें करणें शहाणें बापा ॥ ४ ॥
- संत गोरा कुंभार
निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे ॥ १ ॥
एक पुंडलिक जाणे तेथील पंथ । तुझा आम्हां चित्त भाग्य योगें ॥ २ ॥
सभाग्य विरळे नामा पाठीं गेले । अभागी ते ठेले मौन्यजप ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार नामया भोगितां उरल्या उचिता सेवूं सुखें ॥ ४ ॥
अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य ॥ १ ॥
जयजय झनकूट जयजय झनकूट । अनुहात जंगट नाद गर्जे ॥ २ ॥
परतल्या श्रुति म्हणती नेती । त्याही नादा अंतीं स्थिर राहे ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार सत्रावीचें नीर । सेवी निरंतर नामदेवा ॥ ४ ॥
कायसास बहु घालिसील माळ । तुज येणेविण काय काज ॥ १ ॥
एकपणें एक एकपणें एक । एकाचें अनेक विस्तारिलें ॥ २ ॥
एकत्व पाहतां शिणलें धरणीधर । न चुके येरझारा संसाराची ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार कोणी नाहीं दुजें । विश्वरूप तुझें नामदेवा ॥ ४ ॥
वरती करा कर दोन्ही । पताकाचे अनुसंधानीं ॥ १ ॥
सर्व हस्त करिती वरी । गोरा लाजला अंतरीं ॥ २ ॥
नामा म्हणे गोरोबासी । वरती करावें हस्तासी ॥ ३ ॥
गोरा थोटा वरती करी । हस्त फुटले वरचेवरी ॥ ४ ॥
कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥ १ ॥
मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें । अनुभवाचें हें सुखें हेलावलें ॥ २ ॥
दृष्टीचें पहाणें परतले मागुती । राहिली निवांत नेत्रपाती ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावें । जीवें ओवाळावें नामयासी ॥ ४ ॥
कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥ १ ॥
जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥ २ ॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे । आम्हांतें राशी राहाणें असे नामा ॥ ३ ॥