आजचा पेपर इतका भिजलेला कसा? 

उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका 

‘या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली!’

 कोण खाणार? कुणाचा हा वाटा? 

दाण्यादाण्यावर लिहिले आहे नाव 

शेठ सूदचंद मूलचंद जेठा!

 साऱ्यांनाच येणार आहे मरण प्रत्येकाच्या वेळेनुसार 

मृत्यू हाच न्यायाधीश, चालत नाही तिथे कमीअधिक 

असे आयुष्य का नाही साऱ्यांना नेमके लाभत?

 काय ठाऊक कसा कुठून घाव घालील अचानक 

मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त! 

मरणाचे काय? ते तर एकदाच मारून टाकते!

 उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले 

किती तरी वेळ फांदी हात हालवत होती 

निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?

 १६व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी आणि नंतर युरोपमधल्या इतर ‘सुसंस्कृत’ देशांनी गुलामांचा व्यापार सुरू केला. आफ्रिकेमधून निग्रो माणसांना बेसावधपणे प्राण्यांप्रमाणे पकडून जबरदस्तीनं ‘न्यू वर्ल्ड’मध्ये नेऊन प्लँटेशन्समध्ये मरेपर्यंत गुरासारखं राबवून घेतलं; तर खूपच पैसा मिळेल, अशी कल्पना प्रथमत: जॉन हॉकिन्स या इंग्रजी माणसाला सुचली. या खुनशी माणसानं गुलामांवर एवढे अत्याचार केले, की मळ्यांवर राबराब राबून ते लौकरच मरत. तो आपण पकडून आणलेल्या निग्रो गुलामांबद्दल बढाया मारत अत्यंत प्रौढीनं बोले. अशा झकास कामगिरीबद्दल खूष होऊन त्यानं गुलामांना पकडून आणण्याच्या दोन सफरी केल्याबरोबरच त्याला एलिझाबेथ राणीनं ‘सर’ की बहाल केली. एवढंच काय; पण त्याच्या पुढच्या सफरीसाठी राणीनंच हॉकिन्सला एक बोट देऊ केली होती. आणि गंमत बघा! त्या बोटीचं नाव होतं ‘जीझस’! अशाच तऱ्हेनं लूटमार, दडपशाही, पिळवणूक यांच्याच जोरावर उद्योगांसाठीचं ‘भांडवल’ उभं राहत होतं!

या वेळी गुलामांना कसं पकडत, त्यांचा व्यापार कसा होई, मग त्यांना जंगलातून शेकडो मैल चालत-चालत किनाऱ्यापर्यंत मारत मारत कसं नेण्यात येई, त्यांना मग बोटीनं जखडून कसं नेण्यात येई, त्यात अनेक जण (३०-४०%) कसे मरत, कित्येक आत्महत्या कसे करत, ती बोट रक्‍त, उलट्या, मलमूत्र, पू वगैरेंनी कशी भरलेली असे, किनाऱ्यावरही त्यांचे सौदे कसे होत, जे कामासाठी अपात्र ठरत त्यांना परत समुद्रात कसं फेकलं जाई वगैरे वर्णनं वाचून अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो! १७व्या शतकात आफ्रिकेतून २५ डॉलर्सना घेतलेला गुलाम अमेरिकेत १५० डॉलर्सला विकला जात होता. १५४० ते १८५१०च्या दरम्यान १.५ कोटी गुलाम विकले गेले! या व्यापारात व्यापाऱ्यांना भरपूर पैसा आणि भांडवलशाहीसाठी स्वस्तात कष्टकरीही मिळाले! सुदान, आना घाना, माली, सोंधाई वगैरे ठिकाणी लोकसंख्येच्या एक तृतीयांश तर कित्येक ठिकाणी लोकसंख्येच्या निम्मे गुलाम केले गेले होते! एरिक विल्यम्सनं आणि इतरांनी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश अर्थव्यवस्थेचा ५% भाग हा गुलामांच्या व्यापाऱ्यातल्या नफ्यामुळे आला होता आणि त्यामुळे औद्योगिक क्रांतीला मोठाच हातभार लागला.

गोष्ट तीन आण्यांची - गिरिजा कीर

 आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती. म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत पोहोचला. बाय एस्‌.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्‌.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा?' माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं बारक्यासाठी शेवंतूसाठि खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. पण दाढीचे केस पांढरे फेक झालेला मुल्ला तिला `म्हातारे' म्हणाला होता. बायला भारीच राग आला. कुणी `म्हातारे' म्हटलेलं तिच्या मुळीच कामी यायचं नाही. म्हातारी काय म्हणून? अजून डोक्यावर पाटी घेऊन ४-४ मैल चालत होत अन्‌ डोळ्याला दिसत होतं. ती स्वभावाप्रमानं काहीतरी फटकून बोलणार होती, पण समोरुन मोटार येताना दिसली. बायनं चकटनं विचार केला, एस्‌.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू! बायनं आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदारगडी वाटला. तो बायकडं बघून हसला. `काय पायजे आजी?' त्यानं विचारलं. बायला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, `माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!' ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकलि आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. बाय हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली,`ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?' `आजे' `बाय म्हणतत माका' ती टेचात उत्तरली. ड्रॉयव्हर हसत म्हणाला,`बाय, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी~' बायचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली. बांगडीवाला मुल्ला तोंडवासून आश्चर्यानं पाहत होत. गाडी हलली तसा तो ओरडलाच, `अगे म्हातारे -' पण बायला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती? मऊ गादीवर बायला फार सुख वाटलं, एस्‌.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. बायनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले. दिवसभराच्या उन्हान, धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. `बाय, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना? `बाय खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, `खा माझ्या पुता! ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोखं भरुन पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, `कुणाच्या गाडीतून इलंय?' `टुरिंग गाडीतनं.' बायच बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला. तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाली `तीन आणे मोजून दिलंय त्येका,' `त्यांनी ते घेतलं? अग म्हातारेम तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. याआपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू!' दुसऱ्यानं माहिती पुरवली. `अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा' म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय' म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या, त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं.