कोणी कदाचित येईल, ऐकेल या कवीचे गीत 

तर तो कवितेच्या दु:खानेच मरुन जाईल! 

चांदणे रात्रभर झगमगत राहिले! 

 रात्रीने माझ्या घरावर डाका घालण्यापूर्वीच 

मी माझे एकाकीपण आत कुलुपबंद करुन येतो

 आणि सैरावैरा धावणाऱ्या रस्त्यांवर ‘गरबा’ नाचत राहातो!

 जिच्याबरोबर श्वासाचे नाते जोडले होते मी

 ते नातेच, दातांनी धागा तोडावा तसे, तोडले तिने! आणि...

 आता कटलेल्या पतंगाचा तुटका मांजा लुटला जातो आहे मोहल्ल्यात!

 किती तरी आणखी सूर्य उडाले आसमंतात... 

मी आकाशाचे गूढ उकलत होतो 

ती टॉवेलने ओले केस झटकत होती!

 तांबडे फुटले, कोवळ्या किरणात काचेची तावदाने झगमगली

 घरी जाण्याची वेळ झाली, पाहा ना, सकाळचे पाच वाजले

 घड्याळाने इमानेइतबारे रात्रभर चौकीवर पहारा केला!

 असे डोळ्यात भरुन राहिले आहे तुझे रुप

 की अनोळखी लोकही ओळखीचेच वाटत आहेत

 तुझ्याशी नाते जोडले आणि साऱ्या जगाशी जवळीक झाली!

 जाता जाता तुझ्या गाडीचे दिवे लाल झाले अचानक

 वाटले असेल तुला, थांबावे की परत मागे यावे?

 पण तू ‘सिग्नल’ तोडून भलत्याच रस्त्याला वळलीस!