जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक
माझी किंमत तर चेहऱ्यावरच लिहिलेली आहे
साधे पोस्टकार्डच आहे ना मी?
अशी काही तुझी आठवण पेटून उठली की बस!
जशी आगकाडी पेटवावी कुणी गडद काळोखात
फुंकून टाक ती! नाही तर चटका बसेल बोटाला!
डोळ्यांचे आरसे असे जागजागी तडकले आहेत
की कुठलाच चेहरा आता पूर्णपणे दिसत नाही
लोक तुकड्यातुकड्यातूनच भेटत आहेत तेव्हापासून!
पूर्वी जंगलातून जायचो तर क्वचित माणसांची वस्तीही भेटायची
आता वसतीत एखादे झाड दिसले तर भरुन येते हृदय...
भिंतीवरचे सब्जांचे रोप बघताना आठवते, इथे पूर्वी जंगल होते!
बांगड्यांचे तुकडे रुतले, पावले रक्ताळली
अनवाणी पायांनी खेळत होते पोरगे अंगणात
काल बापाने दारु पिऊन आईचा हात पिरगाळला होता!
इतका प्रदीर्घ आळस दिला तिने, की, हात
निखाऱ्यासारख्या सूर्यापर्यंत थेट जाऊन पोहोचला!
बघा ना, चंद्रासारखा फोड आला आहे बोटावर!
रात्र चंद्राच्या नौकेत आणते आहे चांदण्या भरुन
सकाळ होता होता विकल्या जाताहेत त्या आधीच
हल्ली रात्रीचा व्यापार फारच भरभराटला आहे!