दिवस रात्र असे विखुरले आहेत
जसा तुटला आहे मोत्यांचा हार
जो घातला होतास तूच एकदा माझ्या गळ्यात
काय सांगू? कशी आठवण मरुन गेली?
पाण्यात बुडून प्रतिबिंबेही मृत झाली...
स्थिर पाणी सुद्धा किती खोल असते?
चला ना, बसू या गोंगाटातच, जिथे काही ऐकायला येत नाही,
या शांततेत तर विचारही कानात सारखे आवाज करतात
हे कंटाळवाणे पुरातन एकाकीपण सतत बडबडत असते!
तुझ्या गावात कधीच येऊन पोहोचलो असतो –
पण वाटेत किती नद्या आडव्या पडल्या आहेत!
मधले पूल तूच जाळून टाकले आहेत!
झाडे तोडल्यामुळे नाराज झाली आहेत पाखर
आता तर दाणे टिपण्यासाठीही येत नाहीत घरात
कोणी बुलबुलसुद्धा वळचणीला बसत नाहीत येऊन!
मी आपले सारे सामान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे
माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच –
माझ्यापासून अलग होणे रुचले नसावे तिला कदाचित!
खिडक्या बंद आहेत, दारांनाही कुलपे लागली आहेत
तर मग ही स्वप्ने पुन्हा पुन्हा घरात कुठून येतात?
झोपेतही एखादा झरोका खुलाच असतो वाटते?