सारे डोंगरांचे उतार, पर्वत उदास झाले आहेत
बहरणाऱ्या वसंतऋतूने जणू आत्महत्त्या केली आहे
बारुद पेरलेल्या सीमेवरच पाऊल ठेवले होते त्याने...
आळसावलेले ऊन खाली उतरले नाही अजून
थंडीने गारठलेले ते छपरावर झोपून राहिले आहे
आणि उत्साहाच्या पांघरुणाच्या तर कधीच फाटून चिंध्या झाल्या आहेत!
हा अर्धा चंद्र गडद काळ्या आभाळावरचा
जणू काळ्या हबशिणीची काळोख चाटणारी जीभ
सकाळपर्यंत कढई चाटून साफ करुन निघून जाईल!
वस्तीला आग लावून पुरेसा आनंद झाला नाही...
तो आता आभाळावर हल्ला करायला निघाला आहे!
धुराच्या अंगरख्यावर रक्ताच्या वासाचे डागही पडले आहेत!
झोपडीतले चिमुकले बाळ रडता रडता
आईवर रुसून आपले आपणच झोपी गेले आहे
तात्पुरता ‘युद्धविराम’ झालेला दिसतो आहे!
मी राहातो दोस्तांच्या घरभिंतीच्या अलीकडे, पण
माझी सावली मात्र भिंतीच्या पलीकडे पडते
किती भंगूर आहे ही देहाची आणि प्राणांची सीमा?
लहानपणीच्या जखमेचा डाग दिसतो आहे चंद्राच्या कपाळावर
दिवसभर दगड, धोंडे, गलोल घेऊन खेळत होता
कितीदा सांगितले, बरी नाही संगत त्या उनाड उल्कांची!