चुड़ा

तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं 
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथें दाट छायांतुनी रंग गळतात 
या वृक्षमाळेंतले सावळे

तुझीं पावलें गे धुक्याच्या महालांत 
ना वाजलीं ना कधीं नादलीं 
निळागर्द भासे नभाचा किनारा 
न माझी मला अन् तुला सावली....

धराया विनाशास संदर्भ माझे 
जशा संगीतानें दिशा पेटल्या
तुझ्या सांद्र ओढाळ देहांत तुजला 
नदीच्या कळा कोणत्या भेटल्या.

मनावेगळी लाट व्यापे मनाला 
जसा डोंगरी चंद्र हा मावळे 
पुढें कां उभी तूं तुझें दुःख झरतें 
जसे संचिताचे ऋतू कोवळे...

अशी ओल जातां तुझ्या स्पंदनांतून 
आकांत माझ्या उरीं केवढा ! 
तमांतूनही मंद ताऱ्याप्रमाणें
दिसे कीं तुझ्या बिल्वरांचा चुडा....

संग

अंगोअंगीं पाजळले 
केशरांचे दिवे 
अंधारांत दिसे गांव 
तृष्णेकाठीं नवें.

पाय- मेंदीपाशीं गेले 
चांदण्यांचें बळ 
कुठें कुठें दुखूं लागे 
कस्तुरीची कळ.

देह ओवूं जाता जडे 
अंबराचा मणी
अजाणाचा संग माझा 
पांडुरंग धनी.

अर्थ

वाळूचीं घरकुलें मोडलेल्या शापांचें शैशव ; 
विस्मयाच्या उत्कंठेचें वरदान घेऊन
उभें असतें तुझ्या डोळ्यांच्या 
किनाऱ्यावर.
दुथडी भरून वाहत असतें तुझें मातीचें घर 
कसल्याशा आवेंशाच्या उन्मेषपूर्ण 
उल्हासांत.
काठाकाठानें चालावें तरीही पाय भिजतात.... 
विखुरलेल्या शब्दांचे अर्थ मी गोळा करून 
आणले असतात....

इराणी संगीताच्या प्रतिमा

आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी 
संगीताच्या प्रतिमा....
मला आलिंगनांत मरण तसा रात्रीचा शृंगार, 
तुझें चांदरातीचें अर्थनिळें मन....
कुठें याच्याही पलीकडे, कुठे त्याच्याही पलीकडे संपूर्ण अवकाशाला टाळून फक्त वाऱ्यालाच ऐकू येईल 
अशी सारंगीची पिपासा
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा....
वाळू पसरली देहापार, कुणाच्या नादांत ? 
कुणाच्या शोधांत ?
स्वरसिद्ध तिचे अनंत कण; रेषाबद्ध उंटांच्या 
मानेंत जसें चंद्रबन....
कुणी दिसत नाही ; नाही दिसत एवढ्या प्रचंड 
टापूतं मला, कुण्या युगांत येथें झाडें उगवलीं 
असतील त्या डोळ्यांचा निरंगी नश्वर सुरमा 
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा.... 
मज्जेच्याखालीं तळमळणारे फुलांचे दैवी घोस.... 
कीं कुण्या वैदेहीची पंथविराम गुणगुण ? 
शिशिराच्या मागें वाजवी सूत्रधाराची धून .... 
नभ एवढें विराट, माझें नाही तसें तुझेंही नाही या 
वाळूच्या सप्तरंगी कणांचें अज्ञातपण 
फक्त दुःखाच्या देखाव्यांना दिशाबद्ध 
करणारे पिरॅमिडांचें अधांतर ;
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा....

वैरी

वाऱ्याने हलतें रान
तुझें सुनसान
हृदय गहिवरलें
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले....

डोळ्यांत शीण 
हातांत वीण
देहांत फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणुन 
निघे वैरागी......

चाळूत पाय 
सजतेस काय ? 
लाटांध समुद्राकाठी
चरणांत हरवला गंध
तुझ्या की ओठीं....

शून्यांत गर्गरे झाड 
तशी ओढाळ 
दिव्यांची नगरी
वक्षांत तिथीचा चांद 
तुझा कीं वैरी ?

वर्षाव

उन्हें उतरली 
एक सावली
पुढें दिठीवर थेंब नवा 
या वळणाशीं
दुःख उराशीं 
सूर वितळतो जणुं भगवा.

स्वप्ने अपुलीं 
कुणी सजविलीं ?
रंग तिरावर व्याकुळसा
नाद उगाळुन 
सांज-बनांतुन 
कळप गुरांचा निघे जसा.

माझ्या वक्षी
निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा
देह अनावर 
निज मातीवर
हिम वर्षावत ये वारा....

जन्म

ऊन वेचतां मनांत
स्पर्श लाघवी जळे,
सांज-रंग पांघरून
गगन जन्मलें निळें.

स्तब्ध मी उभी तुझ्यांत
ढळत गहनता अशी ;
वळत वळत पावलांत 
वाट गुंतली पिशी.

वृक्ष-ओळ दूर....दूर ; 
तरल बावरे जिणें ;
चांदण्यांत लोचनें नि
लोचनांत चांदणें.

चांदणी उबेंत पंख, 
झोपलींत पांखरें ;
शब्द... शब्द जळत देह, 
मुक्त गान मोहरे.

रिक्त या कवेंत मी नि
शून्य ध्यान एकलें ;
रात्र घेउनी उशास 
क्षितिज गाढ झोपलें