पॅसेज

प्राध्यापक वरवंटे यांचा इंग्रजीचा तास म्हणजे विद्यार्थ्यांना कंटाळा यायचा. त्यांचं लांबलचक भाषण केव्हा संपतंय असं व्हायचं. एकदा त्यांचा तास संपल्यावर त्यांनी पु.लं.ना विचारलं - ‘‘कसं काय वाटलं लेक्चर?’’


त्यावर पु.लं.नी एक फिरकी घेतली.


‘‘वा! फारच छान. विशेषतः भाषण चालू असताना एक पॅसेज मला फारच आवडला.’’


‘‘हो का! कोणता पॅसेज?’’


‘‘तो पॅसेज म्हणजे या हॉलमधून बाहेर वरांड्यात जाण्याचा!’’

थापा मारिया

‘माझं लंडन’ फेम मीना प्रभु यांच्याकडे पु.ल. लंडनला उतरले होते. त्यांच्या घरी कामाला जी बाई होती तिचं नाव होतं मारिया. काही कारणांनी ती नियमितपणे कामावर येऊ शकत नव्हती. कधी आज येईल तर उद्या येणार नाही. त्यामुळे मीना प्रभुंची थोडीफार धांदल उडत होती. पु.लं.च्या हे लक्षात आलं होतं.


‘‘आज तरी ही मारिया येते का पाहायचं.’’ मीना प्रभु म्हणाल्या.


‘‘अगं मीना, तुझी ही मारिया, नुसती मारिया नाही तर थापा मारिया आहे!’’

अक्कल कोठे आहे?

व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर पु.लं.च्या घरी गेले होते. तेव्हा तिथे एक गृहस्थ पु.लं.ना भेटायला आले. त्यांनी आपली ओळख करून दिली. ‘‘मी कुलकर्णी, अक्कलकोटहून आलोय.’’

पु.लं.ना जरा खोडी करावीशी वाटली. त्यांनी कुलकर्ण्यांचा कोट-टोपीचा पोशाख पाहिला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही येताना फक्त कोटच आणलात वाटतं?’’

लठ्ठ वासुअण्णा

‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात वासुअण्णा म्हणजे देवासकरांचा दिवाणजी. ही भूमिका शरद तळवलकरांनी केली होती. ते अंगाने लठ्ठ होते. त्या नाटकाच्या एका खेळाला पु.ल. आले होते. प्रयोगानंतर पु.ल. शरद तळवलकरांना भेटले.


‘‘पिल्या, वासुअण्णा कसा झाला?’’ तळवलकरांनी विचारले.


पु.लं.नी शरद तळवलकरांना म्हणजेच त्यांच्या लठ्ठ शरीराला निरखून पाहिलं आणि प्रतिक्रिया व्यक्त केली:


‘‘काम चांगलं झालं. पण देवासकरांचं अन्न देवासकरांपेक्षा वासुअण्णांच्या अंगीच चांगलं लागलेलं दिसतं!’’

शंतनुरावांचा बो

सुप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर हे स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्त याचे भोक्ते होते. ते नेहमी दिमाखदार कपड्यांमध्ये असायचे. नेहमी 'बो' (Bow tie) लावायचे. कोणीतरी खोडकरपणानं म्हटलंय, ‘‘शंतनुरावांना 'बो'शिवाय कोणीही पाहिलेले नाही. कदाचित पाहिलं असेल तर घरी त्यांच्या धर्मपत्नी यमूताईंनीच!’’ शंतनुराव नेहमी 'बो' लावायचे याची कारणमीमांसा करताना पु.ल. म्हणाले, ‘‘शंतनुराव हे नेहमी आईची आज्ञा पाळायचे. त्यांची आई लहानपणापासून शंतनुरावांना उपदेश करायची - कुठंही 'बो' (बोलावल्या) शिवाय जात जाऊ नकोस!’’

कादंबरी आकर्षक करण्याचा मार्ग

एक नवोदित लेखक होता. त्यानं महप्रयासानं एक कादंबरी लिहिली. ती घेऊन तो पु.लं.ना भेटला. त्याने पु.लं.ना विनंती केली की ही कादंबरी वाचून आपण मार्गदर्शन करावं. पु.ल. त्याला टाळत होते. कादंबरीबाबत मी फारसं सांगू शकेनच असं नाही अशा अर्थानं ते त्याला समझावीत होते. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यानं ती कादंबरी पु.लं.च्या घरी ठेवलीच! काही दिवसांनी तो पु.लं.ना भेटला व ‘कादंबरी कशी काय वाटली’ असं विचारू लागला. पु.ल. ‘ठीक आहे’ असं म्हणाले. तरीही त्यानं ‘मनाला पटतं ते सांगा. खरं सांगितलं तरी मी रागावणार नाही’ असं सांगायला सुरुवात केली.


फारच आग्रह झाल्यावर पु.लं.नी कादंबरी त्या नवोदिताच्या हातात परत देत म्हंटलं,

‘‘कादंबरी ठीक आहे पण ही कादंबरी अधिक आकर्षक व वाचनीय करायची असेल तर तिचा शेवट हा जितका अलीकडे घेता येईल तितका घ्यावा!’’

इन्फ्लेमेबल भारत?

 पु.ल. आणि त्यांचे मित्र गाडीतून प्रवास करीत होते. गाडी हायवेवर होती. पुढं एक टँकरक चालला होता. त्यावर लिहलं होतं − Highly Inflammable मेरा भारत महान.

हे पाहताच पु.ल. म्हणाले, ‘‘त्या टँकरवाल्याला आपल्या देशाची खरी परिस्थिती समजली. म्हणून त्यानं सत्य ते वर्णन टँकरवर लिहलंय.’’