बाप

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी…

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो…

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो…

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो…

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा