दोन याचक


 मलीन खाकी गणवेषातिल, सैनिक तरणाताठा कोणी
नाव? कशाचे नाममात्र ते बाहुवरची बघा निशाणी

शरीर विकुनी पोटासाठी एक थेंब हा सरितेसंगे
प्रवाह नेई तिकडे जाई धावत वाहत मरणामागे

मैदानावर पुढे छावणी फुगीर डेरे अवतीभवती
कबुतरांचा जणू थवा हा थकून बैसे जमिनीवरती

त्या गर्दीच्या सीमेवर हा तरूतळी बसला एकाकी
गर्द सावली, गाढ शांतता, वाराही पद हळुच टाकी

दुर्लभ वेळा असते असली ऐकत होता संथ पडोनी
खाकीखाली धडधडणाऱ्या व्यक्तित्वाची करूण कहाणी

कुणी भिकारीण आली तेथे, नाव? कशाचे नाममात्र ते
होते नवथर त्या नवतीला झाकाया नच वस्त्रही पुरते

कळकट चोळीच्या चिंधीतून स्तन डोकावत उंच सावळे
तलम अनावृत दिसे कातडी लाचारीचे विशाल डोळे

उभी राहिली समोर त्याच्या उपसत कंठामधुनि ताना
बोलपटातील परिचित गीते, म्हणे अखेरीस काही द्या ना

काही द्या ना जीभ न केवळ शरीर अवघे होते मागत
ते डोळे, ते स्तन, ती मांडी, सारे उदरास्तव आक्रोशत

शूर शिपाई किंचित बुजला संकोचाची छटा मुखावर
खिशात गेले हात परंतु, नजरेतुन ओसंडे काहुर

त्यासही होते हवे काहीसे, कसे तरी ते कळवे; कळले
दुनियेपासून तुटलेले ते, दोन अनामिक जवळी आले

दूर जरा दरडीच्या खाली मच्छरदाणी करिती पर्णे
नीरवतेवर मुद्रित झाले विविध भुकांचे एकच गाणे, एकच नाणे!


कवी :- कुसुमाग्रज 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा