पडु आजारी, मौज हीच वाटे भारी

पडु आजारी, मौज हीच वाटे भारी

नकोच जाणे मग शाळेला
काम कुणी सांगेल न मजला
मउ मउ गादी निजावयाला
चैनच सारी, मौज हीच वाटे भारी

मिळेल सांजा, साबूदाणा
खडिसाखर, मनुका, बेदाणा
संत्री, साखर, लींबू आणा
जा बाजारी, मौज हीच वाटे भारी

भवती भावंडांचा मेळा
दंगा थोडा जरि कुणि केला
मी कावुनि सांगेन तयाला
‘जा बाहेरी’, मौज हीच वाटे भारी

कामे करतिल सारे माझी
झटतिल ठेवाया मज राजी
बसेल गोष्टी सांगत आजी
मज शेजारी, मौज हीच वाटे भारी

असले आजारीपण गोड
असून कण्हती का जन मूढ ?
हे मजला उकलेना गूढ-
म्हणुन विचारी, मौज हीच वाटे भारी


गीत - भानुदास
संगीत - श्रीधर फडके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा