अमेरिकन प्रेसिडेंट रुझवेल्टच्या बापाबद्दल बोलताना एका लेखकाने लिहिले आहे- ‘‘हा रुझवेल्टचा बाप मोठेपणासाठी फार हापापलेला होता. प्रत्येक ठिकाणी आपण महत्त्वाच्या ठिकाणी असावं, केंद्रस्थानी असावं असं त्याला वाटायचं. उद्या एखादी प्रेतयात्रा निघाली तरी त्यातलं प्रेत आपणच असावं, असं याला वाटलं."
एका थापाड्याने कडी केली. एकदा तो लोकांना म्हणाला, ‘‘अरे, कुत्री-मांजरं काय पाळता? माणसानं काहीतरी निराळं करण्यात गंमत.’’ एकाने विचारले ‘‘असं? तुम्ही काय पाळलं आहे?’’
‘‘मी एक मासा पाळला होता-’’ तो फुशारकीने बोलला, ‘‘त्या माशाला मी चांगला मोठा केला. पाण्याशिवाय राहायला त्याला शिकवलं. मी कुठंही निघालो की तो मासा टुणटुण उड्या मारीत माझ्या पाठीमागून चालत यायचा!’’
‘‘असं?’’ सर्वांना आश्चर्य वाटलं. कुणीतरी पृच्छा केली.
‘‘मग तो मासा अलीकडं दिसला नाही तुमच्या मागून येताना?’’
अत्यंत दु:खी चेहरा करून ते सद्गृहस्थ बोलले, ‘‘दुर्दैव माझं. दुसरं काय?’’
‘‘काय झालं?’’
‘‘परवा मी एका नदीच्या पुलावरून चाललो होतो. तो मासाही टुणटुण करीत माझ्या मागून उड्या मारीत येत होता. पावसाळ्याचे दिवस. एकदम त्याचा पाय घसरला अन् तो खाली नदीत पडला आणि बुडून मेला!...’
आयरिश आणि स्कॉटिश माणसं अत्यंत चिक्कू आणि बिनडोक म्हणून प्रसिद्ध आहेत. एकदा एक स्कॉटिश तरुण एका ओळखीच्या माणसाला अचानक स्वित्झर्लंडमध्ये भेटला. ते गृहस्थ आश्चर्याने त्या तरुणाला म्हणाले, ‘‘अरे, तू इकडं स्वित्झर्लंडमध्ये कसा?’’
‘‘म्हणजे काय?’’ तो तरुण त्यांच्या अज्ञानाची कीव करीत म्हणाला, ‘‘माझे परवाच लग्न नाही का झालं? हनीमूनसाठी म्हणून स्वित्झर्लंडमध्ये आलोय.’’
‘‘हनीमूनसाठी?’’ त्या ओळखीच्या गृहस्थाने इकडेतिकडे शोधक दृष्टीने पाहिले-‘‘पण तुझी बायको तर कुठं दिसत नाही मला!’’
‘‘तिनं स्वित्झर्लंड पूर्वी पाहिलंय-’’ तो स्कॉटिश तरुण म्हणाला, ‘‘मग पुन्हा खर्च कशाला? म्हणून मी एकटाच हनीमूनसाठी इथं आलो!’’