रंजक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रंजक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एल पी जी चा अपघाती जन्म

सध्या इराणमध्ये सुरू असणाऱ्या युद्धामुळे एल पी जी च्या तुडवड्याबाबत असंख्य बातम्या, लेख यांनी सोशल मिडिया अगदी तुडुंब भरलेला आहे. खरंच या एल पी जी चे घरांमध्ये किती असाधारण महत्व आहे नई. 


पण तुम्हाला माहितीय का, हा एल पी जी आपल्या स्वयंपाकघराच्या आयुष्यात आला कुठून आणि आणला कोणी? 


तर ही एल पी जी ची कहाणी आहे विसाव्या शतकात घडलेली, अमेरिकेतल्या पिट्सबर्ग शहरातली. एक दिवस एक मोटार चालक अशी एक तक्रार घेऊन गॅरेज मध्ये आला ज्याने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले. त्या मोटारचालकाने त्याच्या गाडीत इंधन भरले, पण त्याचे असे म्हणणे होते की ते खूप लवकर संपून गेले. सर्वांनी तपासले की टाकीला कोठे गळती आहे का? पण नाही, सर्व काही ठीक दिसत होते. मग सर्वांनाच प्रश्न पडला की इंधन नेमके जातेय तरी कुठे? 

शेवटी हे कोडे, कोणतीही समस्या चुटकीसरशी सोडवू शकतात अशी ख्याती असणाऱ्या श्री.  वॉल्टर स्नेलिंग यांच्याकडे आले. कोणत्याही अडचणीचे उत्तर निसर्गालाच विचारावे अश्या धोरणावर चालणारे स्नेलिंग यांना या मोटारचालकाच्या तक्रारीचे कुतूहल वाटले आणि त्यांनी त्यावर प्रायोगिकरीत्या तपास करण्याचे ठरविले. 

त्यांनी एक कॉर्कचे बूच असलेली काचेची बरणी घेतली, पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल खरेदी केले आणि त्यात भरले. मात्र घरी परत येताना ते बूच सारखे बाहेर उडून पडत होते. त्या इंधनात असे काही बाष्पशील घटक होते जे की बंद बरणीतल्या दाबामुळे कॉर्कवर दबाव आणत होते आणि तेथून बाहेर पडून नाहीसे होत होते. हे लक्षात यायला स्नेलिंगना दहा सेकंद देखील लागले नाहीत. 


त्यानंतर त्यांनी त्याचे विश्लेषण वाहनचालकाला समजावून सांगितले. 

नंतर मात्र त्यांनी त्याचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविले. आपल्या लहानशा प्रयोगशाळेत, स्नेलिंगनी पेट्रोलमधील घटक वेगळे करण्यास आणि त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. त्यातील

काही भागाचे पटकन बाष्पीभवन होत होते. तर काही मागे राहिले.

सर्व अभ्यासाअंती त्यांनी असा निष्कर्ष काढला की, इंधनातील पेट्रोल आणि कोल ऑइल वेगळे काढून टाकल्यानंतर त्यात हलके हायड्रोकार्बनचे अंश शिल्लक राहत आहेत. यात प्रोपेन आणि ब्युटेन यांचा समावेश होता. ते अत्यंत ज्वलनशील आणि हवेत लवकर पसरणारे आहेत. बहुतेक तेल शुद्धीकरण कारखाने त्यांना तेल प्रक्रियेतील त्रासदायक कचरा मानत होते. मात्र

स्नेलिंगना त्यात अपव्यय दिसला नाही. त्यांना त्यात शक्यता दिसली.

त्याकाळी जगातला मानवनिर्मित प्रकाश हा बहुतेक ठिकाणी गॅसच्या दिव्यांवर अवलंबून होता आणि बहुतेक लोकांकडे मुख्य वीजपुरवठा नव्हता. स्नेलिंग यांच्या लक्षात आले की, "जर ते या वायूचे द्रवात रूपांतर करू शकले, तर त्यांच्याकडे बाटलीत साठवून ठेवता येण्याजोगा प्रचंड ऊर्जा असणारा पदार्थ तयार होईल, ज्याला पुन्हा वायूमध्ये रूपांतरित करून प्रकाश किंवा उष्णतेसाठी वापरता येईल.”


आणि हीच ती युरेका मोमेंट जेव्हा वॉल्टर स्नेलिंग यांनी हा द्रवीकृत पेट्रोलियम वायू म्हणजेच "एलपीजी" नावाचा द्रव वायू विकसित केला जो की धातूच्या बाटलीत भरता येऊ शकणार होता आणि सामान्य घरासाठी प्रकाश देऊ शकणार होता. 

मात्र ही पायरी अत्यंत महत्त्वाची होती. विश्वासार्ह कंटेनरशिवाय, वायू त्यातून सहजपणे निसटून गेला असता. तेव्हा या एलपीजीचा वापर अधिक व्यापक करण्यात 'फिलिप्स पेट्रोलियम कंपनीचा' खूप मोठा वाटा होता. जिने सुरुवातीच्या काळात या इंधनाच्या उत्पादनात आणि विपणनात मोठी भूमिका बजावली.

त्यांनी अश्या प्रकारचे धातूचे दंडगोलाकृती कंटेनर बनवले ज्यामुळे रिफायनरींपासून दूर असलेल्या ठिकाणी इंधन पोहोचवणे अत्यंत सुलभ झाले.


गायब होणाऱ्या पेट्रोलच्या तपासाने सुरू झालेल्या या प्रकरणामुळे एक अतिशय अद्भुत अशी नवनिर्मिती होऊन इंधनाच्या क्षेत्रात एक कमालीचा मार्ग खुला झाला.

पण असं असलं तरी कोणतीही नवनिर्मिती लोकांच्या गळी उतरवणं तितकसं सोप्पं काम नसतं. पण स्नेलिंग हे जरी शास्त्रज्ञ असले तरी त्यांत एक उद्योजक सुद्धा दडलेला होता. अखेर १९१२ साली, पेनसिल्व्हेनिया येथील शेतकरी जॉन गॅहरिंग हे त्यांचे पहिले ग्राहक ठरले ज्यांनी हा आविष्कार वापरून पहायची तयारी दर्शवली. 


आणि गंमत म्हणजे गॅहरिंग हे या नवनिर्मितीच्या कामगिरीवर इतके खुश झाले की, १९१९ मध्ये त्यांनी आपल्या १८ वर्षीय मुलीचा मार्जोरीचा हात स्नेलिंग यांच्या हाती दिला. 


कालांतराने प्रकाश आणि उष्णतेनंतर स्वयंपाकघरासाठीही याची उपयुक्तता लक्षात येऊ लागली. 


शहरांचा जसा जसा विकास होऊ लागला, तसे लोक कोळसा किंवा लाकडापेक्षा स्वच्छ इंधनाचा पर्याय शोधू लागली. एलपीजी सिलिंडरने त्यांकरिता एक व्यावहारिक उपाय उपलब्ध करून दिला. हा धातूचा सिलिंडर, जो आकाराने लहान आणि सहज वाहून नेण्याजोगा होता, जगभरात रोजच्या वापरातील एक वस्तू बनला.


स्नेलिंग हे एक विलक्षण चिकाटी, निरीक्षणशक्ती व अंतर्दृष्टी असलेली व्यक्ती होते. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा आणि कुतूहल, त्यासाठी वेळ आणि  संयम याला ते वैयक्तिक महत्त्व देत असत. इतकं असून

प्रयोगशाळेबाहेर मात्र ते आपल्या कुटुंबासोबत एक शांत वैयक्तिक आयुष्य जगत होते. त्यांचे कुटुंब हेच त्यांच्या आयुष्याचे खरे समर्पण असावे, असा त्यांचा हेतू होता.”

इतरांच्या नजरेतून सुटलेल्या समस्या समजून त्या सोडवण्यात त्यांना खरे समाधान मिळत असे.

प्रसिद्धीमध्ये त्यांना क्वचितच रस होता. 

अगदी जगभरातील स्वयंपाकघरांमध्ये, कारखान्यांमध्ये किंवा रस्त्यावरील स्टॉल्समध्ये एलपीजी सिलेंडर जसा कुठल्यातरी कोपऱ्यात शांतपणे पडून असतो, तो क्वचितच कोणाचे लक्ष वेधून घेतो, अगदी तसेच. 

लोक सहजपणे नॉब फिरवतात, ज्योत पेटवतात आणि स्वयंपाक करायला सुरुवात करतात. त्यातून जो चवदार स्वयंपाक तयार होतो, त्याचे श्रेय त्या बनवणाऱ्या व्यक्तीला, त्यातील घटकांना, भांड्याकुंड्यांना, उपकरणांना अगदी कधीकधी शेगडीलाही दिले जाते पण सिलेंडर कोणाच्या खिस गणतीतही नसतो. 


तर मंडळी हा आपला स्वयंपाकघरातील दंडगोलाकृती धातूचा मित्र दिसायला साधा वाटत असला तरी पण त्याच्यामागे जिज्ञासा, संयम आणि अशा एका शास्त्रज्ञाची कहाणी दडलेली आहे, ज्याने एका अशा रहस्याचा पाठलाग करण्याचे ठरवले, ज्याकडे बहुतेक लोकांनी दुर्लक्ष केले असते. आजपर्यंत स्वयंपाकघरात शेगडी पेटवताना, हे शक्य करणाऱ्या रसायनशास्त्रज्ञाबद्दल फार कमी लोकांनी विचार केला असेल. पण आज मात्र आपण त्या थोर शास्त्रज्ञाला वंदन करूया. 


सौ. अवनी दाते - पोलंडकर

 १६व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी आणि नंतर युरोपमधल्या इतर ‘सुसंस्कृत’ देशांनी गुलामांचा व्यापार सुरू केला. आफ्रिकेमधून निग्रो माणसांना बेसावधपणे प्राण्यांप्रमाणे पकडून जबरदस्तीनं ‘न्यू वर्ल्ड’मध्ये नेऊन प्लँटेशन्समध्ये मरेपर्यंत गुरासारखं राबवून घेतलं; तर खूपच पैसा मिळेल, अशी कल्पना प्रथमत: जॉन हॉकिन्स या इंग्रजी माणसाला सुचली. या खुनशी माणसानं गुलामांवर एवढे अत्याचार केले, की मळ्यांवर राबराब राबून ते लौकरच मरत. तो आपण पकडून आणलेल्या निग्रो गुलामांबद्दल बढाया मारत अत्यंत प्रौढीनं बोले. अशा झकास कामगिरीबद्दल खूष होऊन त्यानं गुलामांना पकडून आणण्याच्या दोन सफरी केल्याबरोबरच त्याला एलिझाबेथ राणीनं ‘सर’ की बहाल केली. एवढंच काय; पण त्याच्या पुढच्या सफरीसाठी राणीनंच हॉकिन्सला एक बोट देऊ केली होती. आणि गंमत बघा! त्या बोटीचं नाव होतं ‘जीझस’! अशाच तऱ्हेनं लूटमार, दडपशाही, पिळवणूक यांच्याच जोरावर उद्योगांसाठीचं ‘भांडवल’ उभं राहत होतं!

या वेळी गुलामांना कसं पकडत, त्यांचा व्यापार कसा होई, मग त्यांना जंगलातून शेकडो मैल चालत-चालत किनाऱ्यापर्यंत मारत मारत कसं नेण्यात येई, त्यांना मग बोटीनं जखडून कसं नेण्यात येई, त्यात अनेक जण (३०-४०%) कसे मरत, कित्येक आत्महत्या कसे करत, ती बोट रक्‍त, उलट्या, मलमूत्र, पू वगैरेंनी कशी भरलेली असे, किनाऱ्यावरही त्यांचे सौदे कसे होत, जे कामासाठी अपात्र ठरत त्यांना परत समुद्रात कसं फेकलं जाई वगैरे वर्णनं वाचून अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो! १७व्या शतकात आफ्रिकेतून २५ डॉलर्सना घेतलेला गुलाम अमेरिकेत १५० डॉलर्सला विकला जात होता. १५४० ते १८५१०च्या दरम्यान १.५ कोटी गुलाम विकले गेले! या व्यापारात व्यापाऱ्यांना भरपूर पैसा आणि भांडवलशाहीसाठी स्वस्तात कष्टकरीही मिळाले! सुदान, आना घाना, माली, सोंधाई वगैरे ठिकाणी लोकसंख्येच्या एक तृतीयांश तर कित्येक ठिकाणी लोकसंख्येच्या निम्मे गुलाम केले गेले होते! एरिक विल्यम्सनं आणि इतरांनी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश अर्थव्यवस्थेचा ५% भाग हा गुलामांच्या व्यापाऱ्यातल्या नफ्यामुळे आला होता आणि त्यामुळे औद्योगिक क्रांतीला मोठाच हातभार लागला.

ट्यूलिपमॅनिया

 ‘सिलसिला’तलं अमिताभ-रेखा यांचं ‘देखा एक ख्वाब तो…’ हे गाणं नेदरलँडमधल्या कुकेनहॉफच्या प्रसिद्ध ट्यूलिप गार्डनमध्ये शूट केलं होतं. पण त्या गाण्यात बहरलेल्या बागा तिथे प्रत्यक्षात बघताना मला नेहमी एके काळी इतिहासात याच ‘ट्यूलिप्सनी’ घातलेला प्रचंड गोंधळ आठवून अंगावर ‘काटा’ यायचा! १६३६-३७च्या काळात ‘ट्यूलिपमॅनिया’नं नेदरलँडमधे अक्षरश: धुमाकूळ घातला. १८४३ साली चार्लस्‌ मॅकेनं त्याच्या ‘एक्स्ट्रॉऑर्डिनरी पॉप्युलर डिल्युजन्स अँड द मॅडनेस ऑफ क्राऊड्ज’ या पुस्तकात याविषयी बरंच लिहिलंय. १५९३ साली कार्लोस क्लासियस या वनस्पतिशास्त्रज्ञानं ट्यूलिप्स प्रथम हॉलंडला संशोधनासाठी आणले. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची फुलं बघितली. त्यांना ती आवडल्यानं त्यांनी ती चोरून विकायला सुरुवात केली. यातूनच हे खूळ चालू झालं. १६०० सालापासून कॉन्स्टॅन्टिनोपोलहूनच व्हिएन्नामार्गे युरोपमधे या फुलांचे कंद यायला सुरुवात झाली आणि मग भराभर ते वादळासारखे पसरले. याच काळात नेदरलँडमध्ये व्यापाराच्या जोरावर श्रीमंत झालेल्या मंडळींना ट्यूलिपची फुलं बाळगणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटू लागलं. ट्यूलिपची फुलं वेगवेगळ्या रंगांची असत. ज्याच्याकडे ही फुलं नसत, त्याला अरसिक समजलं जायचं. यामुळे आणि मागणीच्या मानानं ट्यूलिपच्या फुलांचा पुरवठा कमी असल्यानंही त्यांच्या किमती भरमसाठ वाढायला लागल्या. आणि मग स्वस्त भावानं ट्यूलिप्सचे कंद विकत घेऊन जास्त भावानं ती विकण्याची सट्टेबाजी सुरू झाली! याच काळात या फुलांना कसल्यातरी व्हायरसनं ग्रासलं. पण त्यामुळे त्यांच्यावर रंगांचे जे पट्टे उमटले ते आणखीनच छान दिसत. त्यामुळे ती फुलं आणखीनच दुर्मिळ झाली आणि त्यांचे भाव जास्तच कडाडले! या किमती इतक्या वाढल्या को सामान्य डच लोकांचं वार्षिक सरासरी उत्पन्न दरडोई १५० डच गिल्डर्स किंवा १५० फ्लोरिन्स असताना ट्यूलिपच्या ‘सेम्पर ऑगस्टस’ या प्रसिद्ध जातीच्या एका कंदाची किंमत त्याच्या ४० पट किंवा ६००० फ्लोरिन्स झाली होती! त्या वेळच्या किमती लक्षात घेता त्या वेळचा १ फ्लॉरिन म्हणजे २००२ सालचे १०.२८ युरोज किंवा साधारणपणे ५०० रु. होतात. म्हणजे त्या वेळच्या एका कंदाची किंमत आजच्या रुपयात ६००० x ५०० म्हणजे ३० लाख रु. होत होती! १६३६ सालच्या सुरुवातीला हॉलंडमधे सेम्पर ऑगस्टसचे फक्त दोनच कंद उपलब्ध होते. त्यातल्या हार्लेममधल्या एका कंदासाठी १२ एकर जमीन; तर अॅमस्टरडॅममध्ये त्याचसाठी ४६०० फ्लोरिन्स, २ घोडे आणि नवीन घोडागाडी एका सट्टेबाजानं दिली!! ही कित्येकांची आयुष्याची कमाई होती! कित्येक व्यापारी या व्यापारातून दरमहा ६००० फ्लॉरिन्स कमावत. १६३६ साली ट्यूलिप्सचे कंद चक्क स्टॉक एक्स्चेंजवर जाऊन थडकले. समाजातले तथाकथित प्रतिष्ठित, सर्वसामान्य लोक, मोलकरणी, कामगार, छोटे व्यापारी आणि अगदी सफाई कामगारसुद्धा या ट्यूलिपच्या व्यापाराकडे आपलाही काही फायदा होईल म्हणून आपले उद्योग सोडून वळत होते! यातल्या सट्टेबाजीमुळे काही अतिश्रीमंत झाले तर काही कंगाल! १६३६-३७च्या हिवाळ्यात तर एका दिवसात किमान दहावेळा एकाच कंदाची खरेदी-विक्री प्रत्येक वेळी आधीच्यापेक्षा जास्त दरानं होत होती! स्टॉक एक्स्चेंजेस नसलेल्या गावात चक्क दारूच्या गुत्त्यात नाचगाणी आणि जेवणासमवेत ट्यूलिपचे लिलाव होत. तिथे फुलदाण्यांमधून या फुलांचं प्रदर्शन करत.

नंतर मग कंदाचे भाव एवढे वाढले की ते कंद नगाऐवजी वजनावर विकले जाऊ लागले. पूर्वी खूप कमी वजनाच्या वस्तूंना ग्रेन हे माप असे. ४८० ग्रेन्स म्हणजे १ औंस होई. पण आता पेरिट्स हे ग्रेन्सपेक्षाही कमी वजनाचं माप वापरलं जाऊ लागलं. कारण प्रचंड किमतीमुळे वजनातल्या अगदी थोड्या फरकानंही किंमत खूपच बदलणार होती. ट्यूलिपच्या वेगवेगळ्या जातींप्रमाणे ही किंमत बदलत होती. ४०० पेरिट्स वजनाचे अॅडमिरल लिफकेन या जातीचे कंद प्रत्येकी ४४०० फ्लोरिन्सला तर व्हिसरी जातीचे तितकेच कंद प्रत्येकी ३००० फ्लोरिन्सला मिळत होते!

या सट्टेबाजीचा कहर झाला तो म्हणजे एका गंमतशीर व्यवहारात. सात अनाथ मुलांच्या नावावर त्यांच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी ठेवलेली संपत्ती होती मौल्यवान ट्यूलिपचे ७० कंद! या कंदांच्या लिलावात एका कंदाची बोली ५२०० फ्लॉरिन्स तर एकूण कंदांचा व्यवहार ५३००० फ्लॉरिन्स इतका झाला होता! हार्लेमच्या एका व्यापाऱ्यानं तर त्याच्या अर्ध्या आयुष्याची कमाई नफा न मिळवता केवळ मित्रमंडळींकडून कौतुक करून घेण्यासाठी या ट्यूलिपच्या कंदांसाठी खर्च केली! आणखी एकदा अशीच धमाल झाली. एका श्रीमंत व्यापाऱ्यानं ३००० फ्लोरिन्सला (त्या काळातले २८० पौंड स्टर्लिंग!) सेम्पर ऑगस्टसचे कंद विकत घेतले होते. दुसऱ्या दिवशी ते जागेवर न दिसल्यानं अस्वस्थपणे तो ते शोधत असताना ते घेऊन येणारा नावाडी ट्यूलिपलाच कांदा समजून खाताना त्याला दिसला. भयंकर संतापून त्या व्यापाऱ्यानं त्या नावाड्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि या गुन्ह्याकरता त्या नावाड्याला मग अनेक महिने तुरुंगाची हवा खावी लागली! असंच एकदा एक वनस्पतिशास्त्रज्ही एका डच व्यापाऱ्याकडे पाहुणा म्हणून आलेला असताना पूर्वी न बघितलेला ट्यूलिपचा कंद एक दुर्मिळ कांदा समजून तो त्याचं विच्छेदन करायला लागला. चिडून त्या डच व्यापाऱ्यानं त्या वनस्पतिशास्त्रज्ञाला रस्त्यातून अक्षरश: फरफटत नेऊन मॅजिस्ट्रेटसमोर नेलं, तेव्हा त्याला त्या ‘कांद्या’ची किंमत ४००० फ्लोरिन्स आहे हे कळलं! त्यालाही बराच दंड आणि तुरुंगवास भोगावा लागला होता! असे बरेच किस्से त्या काळात घडत!

ट्यूलिपला मिळणारी प्रचंड मोठी बाजारपेठ बघून अनेकांनी मग भविष्यातल्या भावांच्या अंदाजाप्रमाणे ‘फ्युचर काँन्ट्रॅक्ट्स’ करून कोवळ्या रोपांची सट्टेबाजी सुरू केली. याला ‘विंड ट्रेड’ असं म्हणायला लागले. १६१० साली अशा व्यापाराला कायद्यानं बंदी घालूनही सगळ्यांनीच ट्यूलिपच्या बाबतीत कायद्याचं बेधडकपणे उल्लंघन करायला सुरुवात केली! पण हा वेडेपणा कुठेतरी थांबणारच होता. आणि झालं तसंच! १६२७च्या फेब्रुवारी महिन्यात ३ तारखेला हार्लेमच्या बाजारात एक दिवस अचानकपणे या कंदांसाठी ग्राहक कमी झाले. आणि मग ते कमी होतच गेले. मागणी घटतीय, त्यामुळे आता भाव घटतच राहणार आणि आपला तोटा होणार, त्यापेक्षा आत्ताच ते कंद विकलेले बरे असं समजून सगळ्यांनी ते विकण्यासाठी ही गर्दी केली. मग काय विचारता? मागणीच्या मानानं पुरवठा वाढल्यानं ट्यूलिपच्या किमती आणखीनच धडाधड कोसळायला लागल्या. कालांतरानं मग जे कंद पूर्वी ५००० फ्लॉरिन्सला विकले जात होते ते ४००० फ्लॉरिन्स, ३००० फ्लॉरिन्स असं करत-करत शेवटी जेमतेम १०० फ्लॉरिन्सला विकले जायला लागले! त्याचा परिणाम अर्थातच भयानक झाला. असंख्य व्यापाऱ्यांचं आणि ग्राहकांचंही त्यात अतोनात नुकसान झालं. शेकडो मंडळी कंगाल होऊन भिकेला लागली. पूर्वी वाढीव भावानं खरीदण्याचे जे करार (फ्यूचर काँट्रॅक्ट्स) कित्येकांनी केले होते ती मंडळी आता ते करार पाळेनात. यावर मग भांडणं सुरू झाली. अनेक वादविवाद, चर्चा यांच्यानंतर १६३६च्या नोव्हेंबरपूर्वीचे करार रद्द ठरवले गेले आणि त्यानंतर करार केलेल्या ग्राहकांना एकूण व्यवहाराच्या १०% रक्‍कम विक्रेत्यानं द्यावी, असं सांगितलं गेलं. या निर्णयानं अर्थातच कोणाचंच समाधान झालं नाही. मग मंडळी कोर्टात गेली. फ्यूचर काँन्ट्रॅक्टस्‌ केलेल्यांना कोर्टाकडूनही काही मदत मिळाली नाही. कारण असे व्यवहार अगोदरच बेकायदेशीर ठरवले असल्यानं या काँन्ट्रॅक्ट्समधले लोक अक्षरश: देशोधडीला लागले आणि अनेक रावांचे रंक झाले! ट्यूलिपचा हा बुडबुडा असा फुटल्यानं नेदरलँडस्‌मध्ये नंतर बराच काळ मंदीचं वातावरण निर्माण झालं.

व्हिलन (खलनायक)

 सरंजामशाही पद्धतीतून युरोपमध्ये भांडवलशाही उभी राहत होती. तो काळ होता १५व्या शतकापासून १८व्या शतकापर्यंतचा. सरंजामशाहीमधे जमीनदार आपल्या आलिशान घरात राहत आणि गावातली आजूबाजूची जमीनही त्यांच्याच मालकीची असे. भांडवलशाहीसाठी कामगार, भांडवल आणि भांडवली नीतिमूल्यं/कायदे या सगळ्यांची गरज होती. पण सरंजामशाहीमध्ये भूदास हे जमिनीला बांधलेले होते. जमीनदार स्वत:साठी मोठी जमीन ठेवून उरलेल्यातले लहान-लहान तुकडे भूदासांना भाड्यानं देत. या भूदासांमध्येही फ्रीमेन, व्हिलेन्स, कॉटेजर्स आणि गुलाम असे बरेच प्रकार आणि पातळ्या होत्या. यातले ‘फ्रीमेन’ हे जमीनदाराला भाडं दिल्यावर इतर काहीही करू शकत. ‘व्हिलेस’ या मंडळींना जमीनदाराची जमीन कसून आणि त्याची इतरही बरीच कामं करून उरलेल्या वेळातच स्वत:ची जमीन कसता येई. त्यांना गाव सोडून कायद्यानं कुठे जाताही येत नसे. कॉटेजर्सना तर दिवसभर जमीनदारांकडे काम करून राहायला फक्त झोपडी आणि खाण्यापुरतं अन्न मिळे. गुलामांना सगळ्यात कमी हक्क असत. थोडक्यात, जमीनदाराची मोठी जमीन, भूदासांना ‘भाड्यानं’ कसायला दिलेले जमिनीचे लहान-लहान तुकडे आणि गुरांना चरण्यासाठी एक सामायिक जमीन असं जमिनीचं वाटप त्या काळी असे. त्याच वेळी इंग्लंडमधल्या लोकरीला भाव चांगला यायला लागला. मग स्वत:च्या मेंढ्यांना चरायला जास्त जमीन मिळावी म्हणून जमीनदारांनी सामायिक चरण्याची जमीन कुंपण लावून (एन्क्लोज करून) इतरांच्या गुरांना वापरायला परवानगी नाकारायला सुरुवात केली. यातूनच पुढे ‘एन्क्लोजर’ चळवळ चालू झाली. शेवटी त्या वेळचं सरकार हे जमीनदारांच्याच बाजूनं असल्यानं त्याविषयीचे ‘ॲक्ट्स ऑफ एन्क्लोजर्स’ असे त्याविषयी कायदेही करण्यात आले. यामुळे मग अनेक भूदासांना शेती करणंच अशक्य होऊन बसलं. मग शेतीतल्या लोकांचा लोंढा शहरांकडे यायला लागला. ही मंडळी शहरांत येऊन लहानसहान कामं करणं, भीक मागणं याबरोबरच चोऱ्या-माऱ्याही करायला लागली. तेव्हापासून या ‘व्हिलेन’वरूनच ‘व्हिलन (खलनायक)’ हा शब्द निघाला. पण पुढे-पुढे त्यातली हुशार, तरुण मुलं यंत्रांवर कामं करायला लागली आणि अशा तऱ्हेनं जगातले पहिले औद्योगिक कामगार तयार झाले.