सागरा प्राण तळमळला !

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .
तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !'
विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी,मी,
तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,
सागरा, प्राण तळमळला ! || १ ||

शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा, प्राण तळमळला ! || २ ||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,
तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला
सागरा, प्राण तळमळला || ३ ||

या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?
त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?
जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,
कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,
सागरा, प्राण तळमळला || ४ ||


कवी      -     स्वा. विनायक दामोदर सावरकर
संगीत   -     पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर      -     लता मंगेशकर,  उषा मंगेशकर,  मीना मंगेशकर
                    पं. हृदयनाथ मंगेशकर

हंस व नळराजा

न सोडी हा ऩळ भूमि पाळ माते...।
असे जाणोनी हन्स वदे त्याते....।।
हन्स हिन्सा नच घडो तुझ्या हाते..।
सोड राया जाईन स्वस्थळाते...।। १।।

जाग जागी आहेत वीर कोटी..।
भले झुन्जारही शक्ति जया मोठी....।।
तया माराया धैर्य धरी पोटी..।
पाखरू हे मारणे बुद्धि खोटी....।।२।।.।

वधुनि माझी हे कनक रूप काया..।
कटक मुकुटादिक भूषणे कराया..।।
कशी आशा उपजली तुला राया..।
काय नाही तूजला दया माया...।।३।।

म्हातारी उडता न येचि तिजला, माता मदिया अशी।
कान्ता काय वदू नव प्रसवती, साता दिसाची तशी ।।
पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजितसे..।
हातासाजी न्रुपा तुझ्या गवसलो. आता करावे कसे....।।४।।

सदय ह्रदय याचे भूप हा ताप हारी,।
म्हणुनी परिसता मी होय येथे विहारी..।।
मजही वध कराया पातकी पातला जो..।
वरूनि पति असा ही भूमि कैसी न लाजो..।।५।।

येणे परी परिसता अती दीन वाचा..।
हेलावला नळ पयोधि दया रसाचा.।।
सोडी म्हणे, विहर जा अथवा फिराया..।
राहे यथा निज मनोरथ हन्स राया..।।६।।

सुटुनि खग पळाला, बैसला शाल शाखे..।
क्षणभरि निज देही मुक्ति विश्रान्ति चाखे..।।
स्वजन तव तयाचे भोवताली मिळाले...।
कवळिती निज बन्धु बाष्प बिन्दु गळाले...।।७।।

निसावा घे काही, उडुनि लवलाही परतला...।
न्रुपाळाच्या स्कन्धि बसुनि मणिबन्धि उतरला...।।
म्हणे हन्स, क्षोणी पतिस तुज कोणी सम नसे...।
दयेचा हा ठेवा तुज जवळी देवा वसतसे...।।८।।

ऐक राया तू थोर दया सिन्धु..।
नीति सागरही तूचि दीन बन्धु..।।
निखन्दोनी बोलिलो नको निन्दु...।
तुझे ऐसे उपकार जया वन्दु....।।९।।

हन्स मिळणे हे कठिण मयी लोकी...।
सोनियाचा तो नवल हे विलोकी..।।
तशा मजलाही सोडिले तुवा की..।
तुझा ऐसा उपकार मी न झाकी...।।१०।।

किति रावे असतील तुझ्या धामी...।
किति कोकिळ ही सारिका तसा मी..।।
चित्त लागियले तूझिया लगामी...।
न्रुपा योजी मज आपुलिया धामी...।।११।।

हे पाखरू मजसी येईल काय कामा ।
ऐसे न्रुपा न वद पूरित लोक कामा ।।
मोले उणे व्यजन ते धरिता पुढारी ।
छाया करी तपन दीप्तिस ही निवारी।।१२।।

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

होते तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाची पाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी


कवी       -     ग. दि. माडगूळकर
संगीत    -     सुधीर फडके
स्वर       -     सुधीर फडके
चित्रपट   -    प्रपंच (१९६१)
राग        -    मिश्र पिलू

मृग

माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी


कवी - ग. दि. माडगुळकर

उगवले नारायण

उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll

उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll

उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll

वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll

हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll

मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll


कवयित्री - बहिणाबाई चौधरी

जरा अस्मान झुकले

ज़रा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले

ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले ...
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !


कवी - ना. धो. महानोर

रुद्रास आवाहन

डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभैरवा, करीत कर्कश खा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां !

पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती,
झाड खटखट तुझें खड़ग क्षुद्रां !

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
"शांति ही!" बापुडे बडबडति जन-कीडे !
धडधडा फोड तट! रुद्र ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा !

पूर्वी नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयीं अन्य गृहीं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा!


कवी - भा. रा. तांबे

झाशीची राणी

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll


कवी - भा. रा. तांबे
जाति - महाकाली
स्थळ - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२९

लतांनो सांगू का तुम्हां !

लतांनो सांगू का तुम्हां, उद्या श्रीराम येणार!
वनाला सर्व ह्या आता, खरा आनंद होणार

तुम्हा कोठूनीया ठावा, कसा श्रीराम तो आहे
सुखशांती झरा तेथे, सदाचा वाहतो आहे
उद्या पाहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम
मुखे लागाल भुकाया, जय श्रीराम श्रीराम

बघूनी नाथ हर्षाने, मला उन्माद येईल
नका आणू मनामाजी, चुकोनी दोष होतील
लतांनो ध्याल ना पुष्पे, झर्‍यांनो ध्याल ना पाणी
पहा ही अर्पीली कैसी, फळे या घोर वृक्षांनी

नव्हे कोठून ही उष्ठी, जरासी सावलेली ही
कडू कच्ची फळे रामा, कशी देईन गं बाई
उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हांला मीच दावीन
फळे ही त्यास अर्पुनी, सुखे त्या पायी लोळेन
जय श्रीराम श्रीराम, जय श्रीराम श्रीराम


कवी - वा. गो. मायदेव

गाइ घरा आल्या

गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।

गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।

गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।

गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।

गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।

गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।

गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।

गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।

गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।

गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का?    ।।११।।

गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।


कवी - वा. गो. मायदेव

थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
ㅤㅤㅤㅤㅤㅤआई, थोर तुझे उपकार॥ध्रु॥
वदत विनोदें, हांसत सोडी
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण दुधाची धार॥१॥
नीज न आली तर गीत म्हणे
ㅤㅤㅤㅤㅤㅤप्रेम जिचे अनिवार॥२॥
येई दुखणें तेंव्हा मजला
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण करी उपचार॥३॥
कोण कडेवर घेउनि फिरवी
ㅤㅤㅤㅤㅤㅤचित्तीं लोभ अपार॥४॥
बाळक दुर्बळ होतों तेंव्हा
ㅤㅤㅤㅤㅤㅤरक्षण केलें फार॥५॥
त्वांचि शिकविलें वाढविलें त्वां
ㅤㅤㅤㅤㅤㅤआहे मजवर भार॥६॥
स्मरण तुझ्या या दृढ ममतेचें
ㅤㅤㅤㅤㅤㅤहोतें वारंवार॥७॥
नित्य करावें साह्य तुला मी
ㅤㅤㅤㅤㅤㅤहा माझा अधिकार॥८॥


कवी - भास्कर दामोदर पाळंदे

मीच का?

मी या जगांत भरल्या, दु:खास का पुसावे?
अनमोल आसवांना, ऐसेच का वहावे?

राधा न मी न मीरा, ना ती अनारकलि मी
का मीच विष प्यावे? बेड्यांत जोखडावे?

नजरांत खोट त्यांच्या, शापीत भाव सारे
सौंदर्य मीच माझे, मग शाप का म्हणावे?

सारेच ओळखीचे, दिसले ठसे हजारो
मीही तशीच का त्या, वाटेवरून जावे?

धर्मासही न चुकले, जर वागणे अधर्मी
ते पाश संस्कृतीचे मग मीच का जपावे?

भाळी कधीच माझ्या, रेखा न पाहिल्या मी
मग जे घडून गेले, संचीत का म्हणावे?

सृष्टीस निर्मिताना, ना 'तो' मुहूर्त पाही
माझ्या मनांत का मी, पंचांग बाळगावे?

ते सावलीत जाती, टाळूनिया उन्हाला
तेजोनिधीस, माझ्या मी सावलीत घ्यावे

मिळेल का अशी प्रियसी?

कधी कधी वाटत
माझं ही कुणी असाव
मीठी मध्ये तिच्या
तासन तास बसाव

पावसात एकत्र फिराव
नदीकाठी बसाव
तिच्या सहवासात
स्वताला विसराव

सुख दुखात तिच्या
अस सामील व्हाव
की रुततील काटे तिच्या पायाला
आणि लागतील माझ्या काळजाला घाव

तिच्यावर इतक प्रेम कराव
की जगातल सगळ सुख तिला द्याव
तिच्या डोळ्यात आपल
प्रेमाच जग पहाव

मिळेल का अशी प्रियसी
नेहमी शोधात फिराव...
मिळेल अशी कोणी तरी
या आशेवर जगत रहाव...!!!!

काय मिळत मोठ होवून..?

आईच्या अन्गाई गीताने लागणारी झोप,
आता लागते झोपीच्या गोळ्या खावून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

बाबान्नी बोट धरून शिकवलेले चालणे,
आता चालावे लागते काठीचा आधार घेवून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

आईने तेलाचा मारा करून वाढवीलेले केस,
आता ते ही लवकरच जातात डोक सोडून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

मित्रान सोबत रात्रन-दिवस असायच्या गप्पा,
आता फ़क्त-"हाय! कसा आहेस..?" ते ही फ़ोने वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

शाळेत सरांच्या रागवण्यातही असायची एक मज्जा,
आता फ़क्त संताप -चिडचिड बॉसच्या बॉसीन्ग वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

सारेच जगतात लहानपणीच्या आठवणिन्च्या जगात,
आनि जगतात-"आय मीस माय टीन-एज" म्हणुन..,
काय माहित काय मिळत मोठ होवून............

ह्र्दयात नकार होते

तिलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तिला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

आभारी आहे

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात लोळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

जयोऽस्तुते

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ||

राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,
स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,
परवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी,
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी ||१||

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं,
स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची,
स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेचि ।।२।।

मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती, सर्व जन सहचारी होते ।।३।।


हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||४||

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे


कवि - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

चिमणा राजा

गृहराज्यावर गाजवि सत्ता राजा चिमणा एक
जन्मजात हा! नको कराया यास कुणीं अभिषेक! ।।१।।

कटि आईची मृदुल आपुलें सिंहासन बनवून
मधुर बोबड्या अस्फुट वचनीं सोडि हुकूम तिथून ।।२।।

बसावयाला सुंदर घोडा त्यास असे काठीचा
परि आवडता अधिक त्याहुनी ताईच्या पाठीचा! ।।३।।

त्या घोड्यावर डौलें बैसे, चाबुक नाजुक हातीं
सहल करोनी देखरेखही ठेवी राज्यावरतीं ।।४।।

राजदंड जड राजे दुसरे वागविती स्वकरांत
मनें दुज्यांची मुठींत परि हा ठेवितसे दिनरात! ।।५।।

मृदुल करांची मिठी सोडवूं येइ न मल्लांनाही
अमोघ याची शक्ति यापरी, उपमा कसली नाहीं ।।६।।

पराभवाचें लक्षण दिसतां रुदनास्त्रा सोडीत
प्रबल शत्रुही मग त्यायोगें सहजचि होई चीत!।। ७।।


कवी - दामोदर अच्युत कारे

ऐकव तव मधु बोल

ऐकव तव मधु बोल, कोकिळे,
ऐकव तव मधु बोल ॥ध्रु॥

नकोत मजला मैना, राघू,
साळुंकी, चंडोल
नकोत मजला विविध सुरांचे
कृत्रिम हे हिंदोल ॥१॥

एक तुझा स्वर आर्त खरोखर
वाटे मज बिनमोल,
वसंत नाहीं अजुन संपला,
कां झालीस अबोल? ॥२॥

सुखें वसंतासंगें जा मग
पहावया भूगोल,
गा शेवटचा बोल लपुनहि
पर्णांमाजीं खोल ॥३॥

पाहिन नंतर वाट वर्षभर
दाबुनि चित्त विलोल
नको करूं पण आस एवढी
जातां जातां फोल! ॥४॥


कवी - माधव जुलियन

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें

हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी

थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले

धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली


कवयित्री - शांता शेळके

प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


गीतकार -  माधव ज्यूलिअन
गायक    -  गजाननराव वाटवे
संगीत    -  जी. एन्. जोशी

पतंग उडवूं चला

पतंग उडवूं चला
गडयांनो, पतंग उडवूं चला
रंग ढगांवर मावळतीचा
लाल पिंवळ्सर किती मजेचा
झुळझुळ वारा नदीकांठचा
बाजुस डोंगरमळा.

करु चला सुरवात बरोबर
सोडा सोडा रीळ भराभर
पंतग चढवा हे वार्‍यावर
ढगांस भेटायला.

मउ वाळुंत पाय रोवुनी
देउं झटका दोरा ओढुनी
पतंग जातील वर वर चढुनी
पंख नको त्यांजला.

जशीं पाखंरें आभाळांत
पंख पसरुनी तरंगतात
दिसतील तैसे पतंग रंगीत
खेळ किती चांगला !

सूर्य डोंगराआड लपेल
काळा बुरखा जग घेईल
खेळ तोंवरी हा चालेल
मजेदार आपुला.


कवी - अ.ज्ञा. पुराणिक

घननिळ

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया


कवी - विद्याधर करंदीकर

कादरखां

[ मुंबईत झालेल्या हिंदू -पठाणांच्या दंग्यात गारद झालेल्या एका पठाण विरास उद्देशून सदरहू 'विलापिका' रचिली आहे ]

हा कोण इथे पडलेला ! 'कादरखां काबुलवाला' ! धृ.

धिप्पाड देह हा अडवा ! पसरला सहा अन् फूट !
पालथे पलिकडे पडले ! विक्राळ खिळ्यांचे बूट !
चुणिदार चोळणा आतां ! फाटून होय चिरगूट !
बैसला पठाणी बडगा ! बाजूला दूर निमूट !

चिखलांत बुडाले कल्ले !
त्यां ओढिति चिल्लें-पिल्लें !
खिसमीस खिशांतिल उरलें
कुणी मारि तयावर डल्ला ! 'कादरखां काबुलवाला' !.....।।१।।

अफगाण दर्‍यांतिल आतां ! डुरकाळ्या फोडिति शेर !
बुरख्यांतुनि कंदाहारी ! उठलासे हाहा:कार !
तो शर्बत पीतां-पीतां ! दचकेल मधेंच अमीर !
'क्या हुवा!' ओरडुनि ऐसें ! बडवतात सगळे ऊर !

ते हेरतचे अक्रोड
ते बदाम-पिस्ते गोड
रडरडुनी होती रोड
अल्बुखार अंबुनि गेला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।२।।

तो हिंग काबुली आतां ! विकणार यापुढें कोण ?
व्याजास्तव बसुनी दारीं ! गरिबांचा घेइल प्राण ?
खाणार कोण यापुढतीं ! तीं कलिंगडें कोरून?
सजवी नूर नयनांचा ! कीं सुरमा घालुनि कोण ?

रस्त्यावर मांडुनि खाटा
हुक्क्यासह मारिल बाता-
हिंडेल कोण वा आतां
घालून चमेलीमाळा ? ! 'कादरखां काबुलवाला' ! .....।।३।।

करुं नका गलबला अगदीं ! झोंपला असे हा वीर !
जन्मांत असा पहिल्यानें ! पहुडला शांत गंभीर !
राहणें जितें जर, मागें ! व्हा दोन पावलें दूर !
हा बसेल मानगुटीला ! ना तरी होउनी पीर !

जा पळा-पंचनाम्याला
तो आला डगलेवाला,--
अडकवील कीं साक्षीला,
मग म्हणाल "पुरता भंवला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।४।।


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !


कवी - माधव ज्यूलियन

झाल्या तिन्हीसांजा

अजुनी कसे येती ना, परधान्या राजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हीसांजा ll ध्रु.ll

उशिर होई काढाया गाईंच्या धारा
शालु हिरा कालवडी देती हुंकारा
टवकारिती कान जरी वाजे दरवाजा ll१ll

वाट तरी सरळ कुठें पांदितिल सारी
त्यांतुनी तर आज रात्र अंधारी भारी
आणि बैल कसल्याही बुजती आवाजा ll२ll

'जेवणार मी पुढ्यात' घाली मधु रुंजी
झोपेने पेंगुळली तरी न नीजे मंजी
आणि किती करती आंत-बाहेरी ये-जा ll३ll

निवल्यावर हुरडयाच्या उसळीस न गोडी
लवकर कां सोडिती न मोट तरी थोडी
अधिकाधिक खाली-वर होई जीव माझा ll४ll

गुरगुरला जो पिसाळ काल जरा कांही
म्हणती त्या मेल्याला काळिज कीं नाही
परि पाठीराखी ती आहे अष्टभुजा ll५ll


कवी - यशवंत

मामाच्या गावाला जाऊया

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया


गीत      -    ग. दि. माडगूळकर
संगीत   -    वसंत पवार
स्वर      -    आशा भोसले
चित्रपट  -    तू सुखी रहा (१९६३)
राग       -    भैरवी

आला क्षण!

गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो; पण
गंभीरपणे घड्याळ बोले-
'आला क्षण-गेला क्षण!'

घड्याळास या घाई नाही,
विसावाही तो नाही; पण
त्याचे म्हणणे ध्यानी घेई-
'आला क्षण-गेला क्षण!'

कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमीत व्हावयास मन,
घड्याळ बोले अपुल्या वाचे-
'आला क्षण-गेला क्षण!'

कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणित घण,
काळ-ऐक! गातो अपुल्याशी-
'आला क्षण-गेला क्षण!'

लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करिती-
'आला क्षण-गेला क्षण!'


कवी -  केशवसुत

मामाची गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो

कवी - ग. ह. पाटील

फुलपाखरे

धरू नका ही बरे
फुलावर उडती फुलपाखरे

मजे मजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

हात लावता पंख फाटतील
दोरा बांधून पायही तुटतील
घरी कशी मग सांगा जातील
दूर तयांची घरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होता सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटुनी गोजिरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥


कवी - अ. ज्ञा. पुराणिक

आव्हान

छळून घ्या संकटानो,
संधी पुन्हा मिळणार नाही,
कर्पुराचा देह माझा
जळून पुन्हा जळणार नाही.

साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव
असाच नेईन किनार्‍याशी चुकलेली नाव
मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही ll १ ll

निराश मी होणार नाही, झुंजता तुमच्या सवे
मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे
वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही ll २ ll

आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी
धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी
संकटानो सावधान गाफील मी असणार नाही ll ३ ll


कवी - अशोक थोरात

डराव डराव!

डराव डराव! डराव डराव!
का ओरडता उगाच राव?

पत्ता तुमचा नव्ह्ता काल
कोठुनी आला? सांगा नाव
धो धो पाउस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!

बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव
जा गाठा जा अपुला गाव
आणि थांबवा डराव डराव!


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आभाळाची आम्ही लेकरे

आभाळाची आम्ही लेकरे,
काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा
धर्म वेगळा नाही

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकर्‍यांची आमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा
गाव वेगळा नाही

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
कर्म वेगळे नाही आम्हा
मार्ग वेगळा नाही

माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच आमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा
संत वेगळा नाही

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
श्वास वेगळा नाही आम्हा
ध्यास वेगळा नाही


कवी - वसंत बापट

या बाइ या

या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया.

ऐकु न येते,
हळुहळु अशि माझि छबि बोलते.

डोळे फिर्वीते,
टुलु टुलु कशि माझि सोनि बघते.

बघा बघा ते,
गुलुगुलु गालातच कशि हसते.

मला वाटते,
इला बाइ सारे काहि सारे कळते.

सदा खेळते,
कधि हट्ट धरुनि न मागे भलते.

शहाणि कशी,
साडिचोळि नवि ठेवि जशिच्या तशी.


गीत    -   दत्तात्रय कोंडो घाटे
संगीत -   वसंत देसाई
स्वर    -   साधना सरगम
'मी ५ मिनिटात तय्यार होते....' असे एखाद्या मुलीने म्हणणे
.
.
.
.
आणि
.
.
.
.
.
'मी ५ मिनिटात तेथे पोहचतो....' असे एखाद्या मुलाने म्हणणे.....

एकाच नाण्याच्या दोन बाजू

स्टफ्ड मेथी टिक्कि

साहित्यः
१. उकडुन / मॅश केलेले बटाटे - २ मध्यम
२. हिरव्या मिरच्या - २
३. बारिक चीरलेली मेथि - १ वाटि
४. पेरभर आलं
५. मुठभर कोथिंबीर
६. कॉर्न फ्लोअर - १ ते २ चमचे आवश्य्कतेनुसार
७. चवीनुसार मीठ
८. तेल - शॅलो फ्राय करण्यासाठि

स्टफिंगसाठि:
१. मक्याचे दाणे - १/२ वाटि (उकडुन भरडसर वाटणे)
२. किसलेले चीज - १/२ वाटि (आपापल्या आवडिप्रमाणे; मी चेडार चीज वापरलय)
३. चवीनुसार मीठ (चीज मधे कितपत आहे त्या प्रमाणात)
४. हिरवी मिरची - १ बारिक चिरुन (तिखट हवं असल्यास)

कृती:
१. मिक्सर मधे आलं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट पाणि न घालता करुन घ्या
२. एका कढईत १ चमचा तेल टाकुन बारिक चीरलेली मेथि परतुन घ्या. मेथिला पाणि सुटेल म्हणुन कोरडि होईस्त परतत रहा. मेथि जर कडु असेल तर चिरायच्या आधि मेथिला थोडं मीठ लावुन बाजुला ठेवा. एक ५-१० मि. दोन्हि हातांनि घट्ट पिळुन घ्या. पाण्याबरोबर मेथिचा कडवटपणा निघुन जाईल.
३. आता एका बाउल मधे मॅश केलेले बटाटे, आलं-मिरची-कोथिंबिर पेस्ट, परतलेलि मेथि, चवीनुसार मीठ टाकुन एकजीव करुन घ्या
४. गरजेप्रमाणे कॉर्न फ्लोअर टाकुन घट्ट्सर मळा
५. स्टफिंगसाठिचं सर्व साहित्य एकत्र करा
६. आता बटाटयाच्या मीश्रणाची पारि करावी व कॉर्न/चीजचं मिश्रण भरुन पारि बंद करावी
७. टिक्कि सारखा गोल आकार देउन तव्यावर दोन्हि बाजुनी शॅलो फ्राय करावी. बाजु उलटताना काळजी घ्या नाहितर टिक्कि फुटुन मिश्रण बाहेर येईल
८. गरमागरम टिक्कि आवडत्या सॉस / पुदिना चटणिसोबत सर्व करावी

टिपा:

१. जर टिक्कि प्रकार नको असेल तर सर्व साहित्य एकत्र करावे व लिंबाएवढे गोळे करुन तेलात डिप फ्राय करावे.
२. तरिहि वरच्या प्रकारात जास्त तेलकट नको असेल तर थोडया तेलात आप्पेपात्रात फ्राय करावे पण मेथिचं कोटींग असल्यामुळे आतुन शिजल्याचा नक्कि अंदाज येत नाहि आणि सतत परतावे / उलटावे लागतात नाहितर मेथि लवकर जळते

कसं असावं

(शिरीष कणेकर ह्यांचा 'सामना' मधील लेख)

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं .

शूर असावं तर राणा प्रतापसारखं.

स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.

देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.

कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .

हुशार असावं तर बिरबलासारखं .

धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.

करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.

सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.

सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.

राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.

बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.

समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.

अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.


नियतीला पराभूत करावे तर कर्णासारखं.

देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.

निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.

शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.

राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.

लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .

लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.

खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.

लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.

लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.

उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.

सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.

अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.

व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.

बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .

गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.

घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.

बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.

चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.

भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.

बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.

प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.

निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.

प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.

बाईने रूपवान व 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.

बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .

निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.

लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.

लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.

दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.

त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या

मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.

बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्र नेमाडेसारखं.

बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदास फुटाणेसारखं.

आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.

रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कळ्लेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

राहिले जरी हे प्रेम अव्यक्त
मनी न उरली बोच हि फक्त
जगणे…..वाटणार ओझे नाही
ज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही !!
रजनीकांतचा जन्म ३० फेब्रुवारी रोजी झाला..
.
.
.
त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तरी मक्या ३१ फेब्रुवारीलाच झाला.काय कराव कार्ट ऐकतच नाही.

तुझी आठवण

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥

आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥

वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥


संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,
माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली ...॥४॥

मराठीतून बोल…

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू
मराठीतून बोल…

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण
मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास…

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की
पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या…

माय
झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली
मॅड…

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी
माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका…

मराठी इसरत चालल शाळेतले
शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण…

ज्ञानोबा
तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे
असतो गुडी पाडवा…

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच
बोला सारे मराठी रक्षणासाठी…!!!

कुणा काही देता देता

कधी रिकाम्या हातात
भरली सुरई यावी
डोळे मिटून चालता
स्वप्नगुंफा गवसावी

शून्य शून्य नजरेला
क्षितीजाचा रंग यावा
पावसाच्या थेंबातून
रुपगंधी अर्थ यावा

कधी काही ओलांडता
पाया रुतावी हिर्वळ
कुणा काही देता देता
पुन्हा भरावी ओंजळ


कवी - वासंती मुझुमदार

ऊन होऊनी पसर

 ऊन होऊनी पसर जगावर
हिरमुसलें तॄणपान फुलू दे
थव्यास मुकले फूलपाखरु
चुकलेपण आपुले भुलू दे

दव जे जमले नयनी माझ्या
जिथल्या तेथे ते उजळू दे
त्यात गवसले मन हे माझे
विकासत्या गगनी वितळू दे

वारा होऊनी विहर जगावर
दडलाअडला गंध उलू दे
ज्याला त्याला अपुल्यामधल्या
गूढ सुखाचा थांग कळू दे

कवी - बा. भ. बोरकर

रुपकळा

प्रति एक झाडामाडा
त्याची त्याची रुपकळा
प्रति एक पाना फुला
त्याचा त्याचा तोंडवळा

असो पाखरु मासोळी
जीव जिवार मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव
काही आगळी वेगळी

असो ढग असो नग
त्याची अद्भुत रेखणी
जी जी उगवे चांदणी
तिच्या परिने देखणी

उठे फुटे जी जी लाट
तिचा अपूर्वच घाट
फुटे मिटे जी जी वाट
तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे
अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे, आपुली
चाले यातुनच यात्रा


कवी  -  बा.भ.बोरकर

स्पर्श

फुलल्या लाख कळ्या
स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या

ध्वनिकंपित तनुच्या शततंत्री
बंदी मन रतीमोहमंत्री
लय लागुनिया नाचु लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या

धूप जळे तिमिराचा पवनी
विनिद्रनयना व्याकुळ अवनी
पिकुनी लावल्या नक्षत्रांच्या द्राक्ष लता पिवळ्या

भुई वाळुची संगमरवरी
तीवर काळ्या फेनिल लहरी
व्यथेतुनी सुख मंथित ग्रंथित झाल्या मधुर निळ्या

सुटल्या अवचित जटिल समस्या
फुटला रव स्मरकुटिल रहस्या
जननांतरिच्या स्मृतिच्या ज्योती पाजळल्या सगळ्या

द्रवली नयने, स्रवली हृदये
दो चंद्राच्या संगम-उदये
दुणी पौर्णिमा, रसा न सीमा, उसळ्यांवर उसळ्या


कवी - बा. भ. बोरकर

माझे घर

तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हातरी केव्हातरी
फेसाळल्या लाटांपाशी सिंधुसरितेच्या तीरी।
बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर॥

मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड
गर्द हिरवे न्हाणीशी नीरफणसाचे झाड।
केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा
त्यात सवत्स कपिला ओल्या चार्‍याचा नि साठा॥

फुलपाखरांच्यासाठी पुढे फुलझाडे चार।
आंबा एकादा कलमी यावी म्हणुनिया खार।
गारव्याच्यासाठी काही गार नाजूक पोफळी
नागमोडी त्यांच्यावर पानवेल मिरवेल॥

वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे
शेजारच्या माडावर पाहीन मी सोनसडे।
कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी
पारव्यांची कुजबुज खिडकीच्या गजांवरी॥

असा पहाटेला घेत हुक्क्या चहाची लज्जत
लिहीन मी भावगीते तेथे घुमत घुमत।
आणि येता थोडा शीण बसुनिया गच्चीवर
रेखाटीन भोवतीचे चित्र एखादे सुंदर॥

जाळी फेकणारे कोळी, त्यांच्या मासळीच्या होड्या
खपणारे वावराडी, त्यांच्या विसाव्याच्या विड्या।
कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट
बांगड्यांशी खेळणारा कधी ओलेतीचा घट॥

आणि मग सेवीन मी जाईजुईचा गे भात
पोईतल्या मासळीचा स्वाद घेत साथ साथ।
वेताचिया खाटेवर थोडा बागेत दुपारी
झोपेन मी घोळवीत तुझी अमली सुपारी॥

आणि सूर्यास्तास माझा रंगी घेऊन शिकारा
तुझ्यासंगे जाईन मी इंद्रचंद्राच्या माहेरा।
कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकवील गाणी
ऐकेन ती समाधाने डोळा घेऊनीया पाणी॥

थंडीवार्‍यात पश्मिनी शाल स्कंधी घालशील
काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळील।
घरी येताच नातरे आनंदाने म्हणतील
सांगा गोष्ट किंवा म्हणा नवे गाणे॥

रचुनिया सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा
जेणे जाणवेल त्यांना उद्या दुसर्‍याची व्यथा।
मग रेलून गच्चीत टक लावीन आकाशी
दाट काळोखातही मी चिंब भिजेन प्रकाशी॥

असे माझे गोड घर केव्हातरी केव्हातरी
अक्षरांच्या वाटेनेच उतरेल भुईवरी॥


कवी  - बा. भ. बोरकर

उत्तररात्र ओलांडून

उत्तररात्र ओलांडून खुळे चांदणे घरात आले
गाढ झोपेत मूल मूल दवामधले फूल झाले

आई त्यांची हिरवी वेल पान्पान आळसलेली
स्वप्नपत्री खुडत असताना मोतीचूर पावसात न्हाली

सोनदिवीचे पाचही डोळे जागून झाले मंद मंद
गार झोंबरा वारा आला घरात ओतीत धुंद गंध

मीच तेव्हढा जागा झालो गगनभर पांगली वीज
अकस्मात नागीण कशी प्राण चाटून गेली वीज

अंधारातल्या पारिमीता संपून उजळ झाली शुद्ध
शिळ्यापाक्या सुखाखाली उपासपोटी दिसला बुद्ध

खिडकीमधून उडत आले बोलले कोवळे पिंपळपान
" पावस-पाण्यात पिकली पुनव चल लवकर वेचून आण "

वेडे पाय चालू लगले तोच जूनी आठवण झाली
उंबरठ्यापाशी कपाळभर दरदरून हूम आली

तसाच फिरुन वारें कसा जागवले मी सारे घर
त्याच्या संगे वेचली पुनव चूर होऊन रात्रभर

रोज चांदणे घरांत येते फुलतो संसार पिंपळ कसा
कवडसासा अजून बुद्ध बसून आहे उघडून पसा


कवी - बा. भ. बोरकर

जपानी रमलाची रात्र

तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात

रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड

अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया

धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री

तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला

अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ

जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी

तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल

करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले

अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ

स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा

गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी

पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे

आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज

नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र

कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते

गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ

डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी

तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता

आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात!


कवी - बा.भ.बोरकर

निळा

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...

असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा :
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग :
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.


कवी - बा. भ. बोरकर

लावण्य रेखा

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा


कवी - बा.भ.बोरकर