पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.


कवी - बालकवी

गाणाऱ्या पक्ष्यास

समय रात्रीचा कोण हा भयाण
बळे गर्जे हे त्यांत घोर रान
अशा समयी छबुकड्या पाखरा तू
गात असशी; बा काय तुझा हेतू?

गिरी वरती उंच उंच हा गेला
तमे केले विक्राळ किती याला
दरी गर्जे, फूत्कार पहा येती,
किती झंझानिल घोर वाहताती

दीर्घ करिती हे घूक शब्द काही
क्रूर नादे त्या रान भरुनी जाई
अशा समयी हे तुझे गोड गाणे
रम्य पक्ष्या, होईल दीनवाणे

तुझ्या गानाचे मोल नसे येथे
कुणी नाही संतुष्ट ऐकण्याते
जगे अपुल्या कानास दिली टाळी
वृथा मानवी हाव अशा वेळी

तुझे गाणे हे शांत करी आता
पहा, गर्जे वन घोर हे सभोंता
किर्र करिती हे तीक्ष्ण शब्द कीट
असे त्यांचा या समयी थाटमाट

पुढे येईल उदयास अंशुमाली
दिशा हसतील वन धरिल रम्य लाली
हरिणबाळे फिरतील सभोवार
तदा येवो गाण्यास तुझ्या पूर

तुझे भ्राते दिसतील एक ठायी
हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही
वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे
मधुर नादे वन भरुनि टाक सारे


कवी - बालकवी

पक्ष्यांचे गाणे

प्रणयमंजुषा उषा उदेली,
दिव्यत्वाने वसुधा नटली,
की स्वर्गाची प्रभा फाकली ही वरती खाली.


निर्विकार विश्वाचे अंतर
प्रशांत पसरे नभःपटावर
शांतिदायिनी भूमि मनोहर ही हसते खाली.


पटल धुक्याचे हळूंच सारुनि,
चंडोलाच्या चाटु वचांनी,
स्पष्ट भूमिला समजावोनी हा चुंबी तरणी.


उषःकालची मंगलगीते
ही सरिता, हे कानन गाते,
हा विहगांचा ध्वनी मजेचा साथची हो त्याते.


प्रभातवायू मंद वाहती,
वनराजी आंदोलन घेती,
हळूंच लतिका फुले आपुली-उधळुनिया देती.


माझ्या प्रिय विहगांनो, आता
प्रसंग सुंदर असा कोणता?
यापुढती हो उघडा अपुली - प्रेमाची गाथा.


पुरे कोटरी आता वसती,
रान मोकळे, पुष्पें हसती,
उडा बागडा प्रशांत गगनी जा, जा, जा वरती.


नभात मारा उंच भरारी,
प्रेमपूर्ण की रमा भूवरी,
विविधा सृष्टी ही देवाची तुमची ही सारी.

कवी - बालकवी

अनंत

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत।

कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?

विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?

अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?

तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाईल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून।

कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे;

हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनी जड गोड काळिमा पसरी लाटांवर;

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर


कवी - बालकवी

प्रीती हवी तर

प्रीती हवी तर जीव आधी कर अपुला कुर्बान,
प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान !

तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत,
याद ठेव अंगार जगाला लावील निमिषांत !

प्रीती निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी?
प्रीतीदेवी जगदेकवीर जो जाय तयापाठी !

नव्हे प्रीतीला रंग लाविला लाल गुलाबांचा,
परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा.

गुल गुल बोले प्रीती काय ती? काय महालांत?
प्रीती बोलते काळ घालिता कलिजाला हात !

स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला
हीन जिवाने घेऊ नये त्या जहरी प्याल्याला !

सह्य जिवाला होय जाहला जरी विद्युत्पात,
परी प्रीतीचा घात भयंकर दुसरा कल्पांत !

जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात;
साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत !


कवी - बालकवी

दोष आणि प्रीति

दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?

दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.

गड्या पुर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्युना, ये मार मिठी देही
प्रीति माझ्या ह्रदयात करी वास
न्युनतेला पुर्णत्व द्यावयास !


कवी - बालकवी