प्रणयमंजुषा उषा उदेली,
दिव्यत्वाने वसुधा नटली,
की स्वर्गाची प्रभा फाकली ही वरती खाली.
निर्विकार विश्वाचे अंतर
प्रशांत पसरे नभःपटावर
शांतिदायिनी भूमि मनोहर ही हसते खाली.
पटल धुक्याचे हळूंच सारुनि,
चंडोलाच्या चाटु वचांनी,
स्पष्ट भूमिला समजावोनी हा चुंबी तरणी.
उषःकालची मंगलगीते
ही सरिता, हे कानन गाते,
हा विहगांचा ध्वनी मजेचा साथची हो त्याते.
प्रभातवायू मंद वाहती,
वनराजी आंदोलन घेती,
हळूंच लतिका फुले आपुली-उधळुनिया देती.
माझ्या प्रिय विहगांनो, आता
प्रसंग सुंदर असा कोणता?
यापुढती हो उघडा अपुली - प्रेमाची गाथा.
पुरे कोटरी आता वसती,
रान मोकळे, पुष्पें हसती,
उडा बागडा प्रशांत गगनी जा, जा, जा वरती.
नभात मारा उंच भरारी,
प्रेमपूर्ण की रमा भूवरी,
विविधा सृष्टी ही देवाची तुमची ही सारी.
कवी - बालकवी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा