जालियनवाला बाग

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

सागर

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे


कवी - कुसुमाग्रज

सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी

प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट

आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत

(अर्थात - चहाच्या कपात पडलेल्या माशीस... )

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके.

या प्रभातसमयास मंगल,
चमकती दंवमौक्तिक निर्मल,
गात पक्षिगण हा गगनी फिरे,
पण दशा तव काय अर-अरे!

ओसरीवरुनि या तव मैत्रिणी,
गात स्वैर फिरतात सुलक्षणी;
परि तुला न बघती मुळि ढुंकुनी,
'संकटी जगि कुणा न असे कुणी!'

मंडई नव्हति का तुज मोकळी,
की मिठाई 'मघुरा-भुवनांतली',
नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,
म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,
मनुजवस्तित आलीस का इथे!

करीत 'दत्तु-भट' काय तपासणी
म्हणुनि घाबरुनी आलीस तू झणी!
शर्कराकण येथिल सांडले
सेवुनी न तुज सौख्य जाहले?

की 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवी भूक न काय तुझी बरे?
पेय बोलुनिचालुनि घातकी,
बुडविते बघ भारतियास की !

या अशा व्यसनात विलायती,
अडकता फळ दारुण शेवटी !
नर जसा बुडतो भवडोही
तेवि खालिवर जासि अयाई!

काडी वाचवि जरी बुडत्याला,
काडीचा न परि आश्रय गे तुला!
स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
बघु तरी उघड्या नयनी कशी?

अंगि तेवि भरले भयकापरे,
आणि त्यात निवला न चहा बरे!
हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,
छे, सले नुसती मनी कल्पना?

समिप पाउसकाळहि पातला,
आणि तू निघुनि जाशिच आजला!
अहह, आम्रफल-मोसम येईल,
अम्हि असू परि तू नसशील!

फेकु सालटि चोखुनि चोखुनि,
तुजविना पण जातिल वाळुनी
तुजविना कवि-मुखे दिसतील की,
भृंगहीन कमळांसम ती फिकी,

कौन्सिलात, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवाचुनी?
राजकारण रोज नवे नवे,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.

शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,
त्या इशारत कोण तरी गडे?
यापरी नव-तरंग मनात
येउनी ह्रदय होय कंपित.

पेयपृष्ठि उठली इतुक्यात,
मंद-श्वास,-लहरीसह लाट!

फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणि खालती खोल गेली!

टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,
चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

परीटास...

परिटा येशिल कधी परतून? || धृ ||

काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून!

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!

सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन!

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून!

तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन!

गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन!

रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन!

सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
परिटा येशिल कधी परतून?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कवी आणि कारकून

बोले हासुनि कारकून कुठला गर्वे कवीला असे
'माझे साम्य तुझ्यामधे दिसतसे-आहोत बंधू जसे!
दोघेही दिनरात्र ना खरडतो काहीतरी आपण,
जन्माचे पडलेत की ठळक हे बोटास काळे वण!

'माझे अक्षर का कुणास उमगे-आला जरी तो खुदा
ब्रह्याच्याहि पित्यास का समजणे काव्यार्थ तूझा कदा!
येती कागद जे समीप करणे त्यांची मला नक्कल
तूही ना नकला अशाच करिसी-लागे न ज्या अक्कल!

आणे, पै, रुपये हिशेब करितो-ज्यांचे न हो दर्शन,
नाही पाहियली तरी करिसि ना ताराफुले वर्णन?
पोटाचे रडगान मी रडतसे वेळी अवेळी जसे
चाले संतत काव्यरोदन तुझे तीन्ही त्रिकाळी तसे!'

'मित्रा, हे सगळे खरे,' कवि वदे, 'तुझ्याप्रमाणे पण-
माझ्या मूर्खपणास ना दरमहा देई कुणी वेतन!'


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

फत्तर आणि फुले

होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला
वर्षें कैकहि तरी न तो हाले मुळीं आपुला
आनंदी फुलवेल एक जवळी होती सुखें राहत
बाळे सांजसकाळ हासत तीचीं तैशीच कोमेजत

थट्टेखोर फुलें हंसूनि ती वदलीं धोंड्यास त्या एकदा
"धोंडा केवळ तू ! अरे, न जगती काही तुझा फायदा !"
संतापून तयांस फत्तर म्हणे " कां हीं वॄथा बोलणी
सारी सुंदरता इथेंच तुमची जाईल रे वाळुनी !"

धोंडयाच्या परि काळजास भिडले ते शब्द जाऊनिया
काळाठिक्कर यामुळें हळुहळू तो लागला व्हावया
पुष्पांच्या कवळ्या मनांतहि सले ते फत्तराचें वच
गेली तोंडकळा सुकून, पडली तीं पांढरी फारच !

कोणी त्या स्थलि शिल्पकार मग तो ये हिंडता हिंडता
त्याच्या स्फुर्तिस फत्तरांत दिसली काहीतरी दिव्यता
त्याची दिव्यकलाकरांगुलि न जों त्या फत्तरा लागली
श्रीसौंदर्यमनोरमा प्रगटुनी साक्षात् उभी राहिली

वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकी ये त्या स्थळा
ती मूर्ती बघतांच तो तर खुळा नाचावया लागला
त्यानें ती खुडुनी फुलें भरभरा पायीं तिच्या वाहिली
तों, त्यांची फुलुनी कळी खद्खदा सारीं हसूं लागली

लावण्यकॄति ती वनांत अजुनी आहे उभी हांसत
पुष्पेंही बसलींत तीं बिलगुनी पायी तिच्या खेळत


कवी - केशवकुमार