गझल उपदेशाचा

तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको;
मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको.

आत्मास आत्म्याचे मिळे; ते कोण घेईल काढुनी?
पण इंद्रिया दरडावुनी शरिरास तू हिणवू नको

मोठ्यास मोठे मान तू, त्याहून मोठे चिंतता;
पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको

खोटा गळा काढू नको; खोटा टिळा लावू नको;
जीव जडतो त्या ठिकाणी पाय तू अडवू नको.

विवेक, संयम, नम्रता असले सदाचे सोबती,
तरि व्हायचे वेडे जिथे तेथे मढे होऊ नको.

खुश्शाल जा तू मंदिरी, त्याला-तिला देण्या फुले;
पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरु नको.

पोचायचे जेथे तिथे ना ऊन आणिक सावली,
म्हणुनी वडाच्या खालती अस्वस्थ तू होऊ नको.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - जातक

झपताल

ओचे बांधून पहाट उठते...
तेव्हापासून झपझपा वावरत असतेस.
कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून
दोन डोळे उमलू लागतात
आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून
तुझ्या स्तनांवर बाळसे चढते.
उभे नेसून वावरत असतेस.
तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल
पुन्हा एकदा लाल होते.
आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो!
मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात,
त्यांची मान चिमटीत धरुन
तू त्यांना बाजुला करतेस.
तरीपण चिऊ काऊच्या मंमंमधील
एक उरलेला घास त्यांनाही मिळतो.
तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तुंमध्‍ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..
स्वागतासाठी "सुहासिनी"असतेस,
वाढतांना "यक्षिणी"असतेस,
भरवतांना "पक्षिणी" असतेस,
साठवतांना "संहिता" असतेस,
भविष्‍याकरता "स्वप्नसती" असतेस.
....संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.


कवी - विंदा करंदीकर

भास

संध्याकाळी किनाऱ्यावर एकाएकी झाला भास
कोण आलं... कोण गेलं? कोणीच नाही जवळपास?

कुठून आली... कुठे गेली? मी पाहिली एवढ खरं
अस येणं अस जाणं तिला दिसलं नाही बरं!

चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली
रेतीवरती पाउलखुणा न ठेवता परत गेली

थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली
गुल्बाक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली!

पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगल का हे पुन्हा येणं?
तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईन देणं !

आयुष्याच्या क्षितीजावर अंधारात बुडले रंग
कशासाठी, कशासाठी आता असा तपोभंग?

समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो
ओल्याचिंब देहांनीच पेटलो होतो, विझलो होतो!

आता असे कोरडे.. जसे जळण्यासाठी उत्सुक सरण
निमित्ताला ठिणगी हवी! एवढ्याकरता दिलं स्मरण?


कवी - वसंत बापट.

ये उदयाला नवी पिढी

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी

ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल आम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी?

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी


कवी - वसंत बापट

सैनिकाप्रत

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे

प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे

कवी - वसंत बापट

शाई, कागद, टांक...

शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे
(काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला!
स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला-
"काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला!" वदे!

टाकी बंद करून सर्व खिडक्या-जाळ्या, झरोके तसे
दारालाही तशीच लावित कडी आतूनबाहेरुनी!
दोस्ताला कुठल्यातरी बसविले दारावरी राखणी;
"काव्याची बघतो मिजास!" वदला अस्पष्ट काही असे!

आता कंबर बांधुनीच कवने 'पाडावया' तो बसे
वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लीत चोहीकडे!
आले धावुनि लोक सर्व! दुसरे कोणा सुचावे कसे?
चिंताक्रान्त मुखे करूनि बसले निःस्तब्ध दारापुढे!

झाला तब्बल तास! चाहुल परी काही न ये आतुनी,
सर्वांचा अगदीच धीर सुटला! कोमेजले चेहरे!
भाळी लावुनि हात कोणी वदती "मजी प्रभूची बऽऽरे!"
दृष्टी खिन्नपणे नभी वळवुनी निःश्वास टाकी कुणी!

गंभीर ध्वनि तोच आतुनि निघे! उंचावली मस्तके!
श्वासोच्छ्वास क्षणैक थांबत! मुखे रुंदावली कौतुके!
डोकावूनि बघे फटींतुनि कुणी-तो त्या दिसे अद्‌भुत!
होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत!!


कवी - प्र. के. अत्रे

आम्ही कोण?

'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!


कवी - प्र. के. अत्रे