एप्रिलफूल

फुलराजाने फुलराणीला फुलांच्या फुलदाणीत फूल देऊन शुभेच्छा दिल्या.
तो म्हणाला, 'हे फुलराणी, तू फुल टू ब्युटीफुल, वन्डरफुल
आणि सगळ्या फुलात कलरफुल.
माझ्या भावना आहेत ख-याखु-या. समजू नकोस त्याला एप्रिलफूल.'

प्रेमपत्र

अखंडीत लिहिले
अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर सुधारले मात्र

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥


कवी - माधव ज्युलियन

मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

ऋण

पदी जळत वालुका
वर उधाणलेली हवा जळास्तव सभोवती
पळतसे मृगांचा थवा

पथी विकलता यदा
श्रमुनि येतसे पावला तुम्हीच कवी हो, दिला
मधुरसा विसावा मला !


अहो उफळला असे
भवति हा महासागर धुमाळुनि मदांध या
उसळतात लाटा वर,

अशा अदय वादळी
गवसता किती तारवे प्रकाश तुमचा पुढे
बघुनि हर्षती नाखवे !

असाल जळला तुम्ही
उजळ ज्योति या लावता असाल कढला असे,
प्रखर ताप हा साहता,

उरात जखमातली
रुधिर-वाहिनी रोधुनी असेल तुम्हि ओतली
स्वर-घटात संजीवनी !

नकोत नसली जरी
प्रगट स्मारकांची दळे असंख्य ह्रदयी असती
उभी आपुली देवळे


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

मधुबाला

मदीरा साकीसंगे जेथे
एकच होतो मधु प्याला
ती स्वर्गाहुन सुखकर म्हणती
कुणी बच्चंजी मधुशाला
नकोत असल्या व्यर्थ जल्पना
सर्व असंभव काव्यकल्पना
तुम्हास तुमची मधुशाला
अम्हास प्यारी मधुबाला

नार अनारकलीसम नाजुक
पडदा दुर जरा झाला
महाल स्वप्नांचा झगमगता
लखलखली चंद्रज्वाला
डोळे दिपता चोरी झाली
दिलदारांची ह्रदये गेली
कठोर काळा दाद न देता
फरार झाली मधुबाला

कुठे हरपली शोधीत बसला
जगात जो तो दिलवाला
स्वप्नामध्ये खळी चाचपुन
स्पर्शुन पाही कुणी गाला
अजुन तिला मन शोधीत राही
धुंडुन झाल्या दाही दिशाही
रजतपटावर कितीक झाल्या
मधुबाला ती मधुबाला


कवी - वसंत बापट

अमेरीकन शेतकरी भाऊ

अमेरीकन शेतकरी भाऊ केवढं तुमी तालेवार
उगवतीला मावळतीला पघावं ते हिरवंगार
एवढा थोरला बारदाना चारच गडी त्याच्या पाठी
औजारं बी नामी तुमची पेरनी, कापनी, मळनीसाठी
मिशीशीप्पी नदी म्हंजी ईमानदार कामवाली
पानी भरती, चक्की पिसती, बिजलीबत्तीबी तिनंच केली
म्या म्हनलं, "ह्यो राक्किस कोन?"...तर ती फवारनीची चक्की
निस्तं योक बटन दाबा...फसाफसा उडवती फक्की
गाया मस्त दूध देत्यात बैलं कापून खाता म्हनं
अगडबंब गोदामांतनं खंडी खंडी भरता दानं
गहू म्हनां भुईमूग म्हनां समदं बख्खळ पिकत असंल
बाजाराची कटकट न्हाई सॅमकाकाच ईकत असंल
सूटबूट ह्याट पाईप... आयला कामं होत्यात कशी
तुमची पोरं झ्याकूबाज... शिरीमंतांची असत्यात तशी
आमच्या गवनेराला नसतं असं आंगन हिरवकंच
असा बंगला अशी मोटर अशी बायको गोरीटंच


कवी - वसंत बापट