त्याच वाटेने येणं झालं माझं

हो…………… त्याच वाटेने येणं झालं माझं
चुकून चुकलेल्या शब्दांनी बोलणं झालं माझं ………
काय करू ? अजुनही मी तिथेच आहे थांबुन
माझ्या डोक्यावर तसेच ढग ओथम्बुन …………
दुखाने भरलेले ………आठवणीने शाहारलेले……..

कितीदा वाटलं की आता असंच दूर जावं निघून खूप
जिथे तुझी सावलीही दिसणार नाही मला
आणि जिथे तुझा स्पर्श झालेला वाराही पोहोचणार नाही
पण झाले नाही असे कारन त्या क्षणीही माझा हात तुझ्या हातात होता
………………………………….……. तुझ्या स्पर्शाने भारलेला

दूर जाताना तू माझा हात धरलास
जाऊ नकोस मला एकटा टाकुन डोळ्यात पाणी आणून म्हणालास
मी तशीच अजुन स्तब्धं त्याच वाटेवर तिथेच
माझा हात धरून तू उभा ………..आणि मी तुझ्याकडे बघताना
हतबल आणि ……….मी तशीच

तुमचं काही…माझं काही

मी वेगळ्या लहरीत कविता करतो
तुम्ही वेगळ्याच लहरीत कविता वाचता
मी माझे विचार कवितेत भरतो
तुम्ही तुमच्या जिवनाशी संदर्भ शोधता
मी माझ्या स्वार्थासाठी कविता करतो
तुम्ही कवितेला तुमचा अर्थ देता

म्हणूनच म्हणतो की,

मी एकांतात कविता करतो
तुम्ही एकांतातच वाचाव्या
एकांतात वाचता वाचता
वेग-वेगळ्या अंगाने पहाव्या

माझ्या कविता आहेत,
विचारांकडे जाण्याचे विमान….यात बसाल का?
या आहेत,
न संपणारी दलदल….यात फसाल का?

आहेत कविता दुरध्वनिसारख्या,
आवाज ऐकू येतो पण
विचार कळतातच असे नाही
शब्द हलके-जड कळतात
भावनांचा उतार-चढाव कळतोच असे नाही

शेवटी काय….भाषा सोडा,
विचारांकडे तेवढे लक्ष द्या
मला तसे कमीच समजते
तुम्ही मात्र समजून घ्या!

पोया (पोळा)

आला आला शेतकर्‍या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या
आतां शेंदूराले घोटा

आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या
लावा शिंगाले शेंदुर

लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला
घंट्या घुंगरू मिरवा

बांधा कवड्याचा गेठा
आंगावर्‍हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे
चारी पायांत पैंजन

उठा उठा बह्यनाई,
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरनाच्या पोया ठेवा

वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकर्‍या हातीं
याच्या जीवावर शेतीं

उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल
दानचार्‍याचाज मिंधा

चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया

खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी
आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले
माझं येवढं मांगन

कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां
बाशिंगाचं डोईजड

नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन
शेतकर्‍या तुझं रीन !


- बहीणाबाई चौधरी

पिलोक ( प्लेग )

पिलोक पिलोक
आल्या पिलोकाच्या गाठी
उजाडलं गांव
खयामयांमधीं भेटी

पिलोक पिलोक
जीव आला मेटाकुटी
भाईर झोंपड्या
गांवामधीं मसन्‌वटी

पिलोक पिलोक
कशाच्या रे भेठीगांठी !
घरोघरीं दूख
काखाजांगामधीं गांठी

पिलोक पिलोक
आतां नशीबांत ताटी
उचलला रोगी
आन् गांठली करंटी

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
नशीबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी
वरून तापे ऊन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आली रे पायीं
जानच पडीन रे
तुले लोकाच्या साठीं

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आतां
तुझ्या झांकल्या मुठी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
‘माझेज भाऊबंद
धाईसनी येतीन!’
नको धरूं रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायानें जानं
तुझा तुलेच जीव
लावीन पार आतां
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यातं झुकीसनी
चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हातीं
सोडूं नको रे धीर
येवो संकट किती
येऊं दे परचीती
काय तुझ्या ललाटीं

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

उपननी उपननी

उपननी उपननी
आतां घ्या रे पाट्या हातीं
राहा आतां उपन्याले
उभे तिव्हारीवरती

चाल ये रे ये रे वार्‍या,
ये रे मारोतीच्या बापा
नको देऊं रे गुंगारा
पुर्‍या झाल्या तुझ्या थापा

नही अझून चाहूल
नको पाडूं रे घोरांत
आज निंघाली कोनाची
वार्‍यावरती वरात ?

ये रे वार्‍या घोंघावत
ये रे खयाकडे आधीं
आज कुठें रे शिरला
वासराच्या कानामधी !

भिनभिन आला वारा
कोन कोनाशीं बोलली ?
मन माझं हारखलं
पानं झाडाची हाललीं !

वारा आलारे झन्नाट्या
झाडं झुडपं डोललीं
धरा मदनाच्या पाट्या
खाले पोखरी चालली

देवा, माझी उपननी
तुझ्या पायी इनवनी
दैवा, तुझी सोपवनी
माझ्या जीवाची कारोनी


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

पह्यला पाऊस

आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस
आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी

आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन

आला पाऊस पाऊस
आला लल्‌करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत

आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं

आला पाऊस पाऊस
वर्‍हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी

देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास

कवयित्री – बहिणाबाई चौधरी