उपननी उपननी
आतां घ्या रे पाट्या हातीं
राहा आतां उपन्याले
उभे तिव्हारीवरती
चाल ये रे ये रे वार्या,
ये रे मारोतीच्या बापा
नको देऊं रे गुंगारा
पुर्या झाल्या तुझ्या थापा
नही अझून चाहूल
नको पाडूं रे घोरांत
आज निंघाली कोनाची
वार्यावरती वरात ?
ये रे वार्या घोंघावत
ये रे खयाकडे आधीं
आज कुठें रे शिरला
वासराच्या कानामधी !
भिनभिन आला वारा
कोन कोनाशीं बोलली ?
मन माझं हारखलं
पानं झाडाची हाललीं !
वारा आलारे झन्नाट्या
झाडं झुडपं डोललीं
धरा मदनाच्या पाट्या
खाले पोखरी चालली
देवा, माझी उपननी
तुझ्या पायी इनवनी
दैवा, तुझी सोपवनी
माझ्या जीवाची कारोनी
कवयित्री – बहिणाबाई चौधरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा