बया

दूर डोंगरांची घळ
तिथे आहे शिवालय ;
अशा भासाने गोंदते
बया बदकांचे पाय …

देवबाभलीचा काटा
त्याला हळदीचा डंख ;
पायी स्वस्तिक कोरता
हाती बदकांचे पंख !

डबक्यातून बदके
येती चालत गावाला ;
तशी स्वस्तिकांची माळ
झोंबे शिवाच्या पायाला …

बया ! काय म्हणायचे ?
नाव तिचे ना विरक्ती ?
सत्य मांडताना बाई
थोडी लागते आसक्ती !

तरी सुगाव्याचे भूत
बसे तिच्या मानगुटी ;
शिवालयातील घंटा !
नाद तिच्याही ललाटी …


कवी - ग्रेस 

राधेस जो मिळाला

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

कवी - ग्रेस

जीव राखता राखता

जीव राखता राखता तुला हाताशी घेईन
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन

तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा

तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन

दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना

तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी

मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन
नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन

तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल

भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग

नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल


कवी - ग्रेस

पाठीवर बाहुलीच्या

पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोर्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार …..

प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?

पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज

न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली

जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख

पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली


कवी  - ग्रेस

ही माझी प्रीत निराळी

ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग

सवयीचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळवारा
देहाची वितळण सारी
सोन्याहून लख्ख शहारा

तू खिन्न कशाने होशी
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी
दुखविल का वनमाळी


कवी - ग्रेस

वाट

तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे,
ती ही अशा कातर वेळी,

उदाच्या नादलहरी सारख्या
संधी प्रकाशात…

माझी सर्व कंपने इवल्याशा ओंजळीत
जमा होतात….

अशा वेळी वाटेकडे पाहाणे ,
सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म
लकेरीत तरंगत जाणे;
जसे काळोखातही ऎकू यावे दूरच्या
झऱ्याचे वहाणे….

मी पहतो झाडांकडे , पहाडांकडे,
तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो…..

आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात…


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

पांढर्‍या शुभ्र हत्तींचा

पांढर्‍या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला

त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या

पांढर्‍या शुभ्र हत्तींनी मग दोंगर उचलून धरले,
अन् तसे काळजा खाली अस्तींचे झुंबर फुटले

पांढरे शुभ्र हत्ती , अंधारबनातून गेले,
ते जिथे थांबले होते, ते वृक्षही पांढरे झाले


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता