आई म्हणोनी कोणी

’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे



कवी - यशवंत

जाती-प्रजाती

तुझ्या प्रत्येक स्वप्नाला दिली मी मूठमाती
रिकामे भाळ घेउन धाय मोकलतात राती

कुणासाठी कुणी मेले तरीही नाव नसते
पतंगाचे दिव्यावर प्रेम, जळती तेल-वाती !

स्वत:चे स्वप्न आवडते मला तुकड्यांत बघणे
म्हणुन आलो तिच्या लग्नात मी वेडा वराती !

कुणी मुलगा, कुणी दासी, कुणी तर प्रेयसीही
तुझ्या सगळ्याच भक्तांची तुझ्याशी भिन्न नाती !

नको तू भेदभावाला 'जितू' मानूस कुठल्या
तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती !



कवी - रसप(रणजित पराडकर)

एकटा

एकटी स्वप्न माझी ,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा.

ओळखिच्या माणसांना

समजलो सहवास ज्याला तो खरा आभास होता
ओळखिच्या माणसांना ओळखिचा त्रास होता

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता

जन्मभर ओल्याच होत्या पापण्यांच्या ओंजळी अन्
जन्मभर माझ्या तृषेला मृगजळाचा ध्यास होता

पाहिले जेव्हा तुला मी बस् पहातच राहिलो गं
पण किती कोट्यावधीचा अर्थ त्या शून्यास होता


कवी - मयुरेश साने

उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड लढवू

जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेंव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

राष्ट्राचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

कवी - वसंत बापट

निरोप

बाळ, चाललासे रणा
घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा,
मीही महाराष्ट् कन्या
धर्मं जाणते विरांचा.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार.

अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे
अरे मीही सांगते ना
जीजा लक्ष्मीशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरुप
आठवावे रणांगणी.

घन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन.


कवियत्री - पद्मा गोळे

मी एक पक्षिण

मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी

स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन
निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय़ नीडांतुनी अन
विजा खेळती मत्त पंखांतुनी.

गुजे आरुणि जाणुनी त्या ऊषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारीते काय विणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर

कीती उंच जावे कीती सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी

कीती उंच जाईन पोहचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी



कवियत्री - पद्मा गोळे