ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविलें ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबरही | साम गायन करी || २ ||

प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें |
रामा जनार्दनी | पायीं मस्तक ठेविलें || ३ ||


रचनाकर्ते - समर्थ रामदास स्वामी

लपे करमाची रेखा

लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला

बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन

नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

माहेर

बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरी
दारी खेटराची रास घरीं भरली कचेरी

गांवामधी दबदबा बाप महाजन माझा
त्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा

माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली
आम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली

तुझे भाऊ देवा घरीं नहीं मायबाप तुले
तुले कशाचं माहेर लागे कुलूप दाराले

भाऊ 'घमा' गाये घाम 'गना' भगत गनांत
'धना' माझा लिखनार गेला शिक्याले धुयांत

आम्ही बहीनी 'आह्यला' 'सीता, तुयसा, बहीना'
देल्या आशीलाचे घरीं सगेसाई मोतीदाना

लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल

जीव व्हती लाही लाही चैत्र वैसागाचं ऊन
पाय पडतां 'लौकींत' शीन जातो निंघीसन

तापीवानी नही थडी जरी वाहे थोडी थोडी
पानी 'लौकी'चं नित्तय त्याले अम्रीताची गोडी

माहेरून ये निरोप सांगे कानामंधि वारा
माझ्या माहेराच्या खेपा 'लौकी' नदीले विचारा !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

जीव देवानं धाडला

जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला'
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'

दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जलमाची जाग आली

नही सरलं सरलं जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन

आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!

येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप

ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं?
देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन

अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा
नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा

हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास

जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाचं
उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

आदिमाया

आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?

बारा गाडे काजळ कुंकू पुरल नहीं लेनं
साती समदुराचं पानी झालं नही न्हानं
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?

धरतीवरलं चांदी सोनं डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं तेभी झालं थिटं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

इडा पिडा संकटाले देल्हा तूनें टाया
झाल्या तुझ्या गयामंधीं नरोंडाच्या माया
आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?

बरह्मा इस्नू रुद्र बाळ खेळईले वटीं
कोम्हायता फुटे पान्हा गानं आलं व्होटीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

नशीबाचे नऊ गिर्‍हे काय तुझ्या लेखीं?
गिर्‍ह्यानाले खाईसनी कशी झाली सुखी ?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

नऊ झनासी खाउन गेली सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तेव्हां कुठें राहिन सृष्टीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

घरोट

देवा, घरोट घरोट तुझ्या मनांतली गोट
सर्व्या दुनियेचं पोट घरीं कर्माचा मरोट
अरे, घरोट घरोट वानी बाम्हनाचं जातं,
कसा घरघर वाजे त्याले म्हनवा घरोट

अरे, जोडतां तोडलं त्याले तानं म्हनू नहीं
ज्याच्यांतून येतं पीठ त्याले जातं म्हनूं नहीं
कसा घरोट घरोट माझा वाजे घरघर
घरघरींतून माले माले ऐकूं येतो सूर

त्यांत आहे घरघर येड्या, आपल्या घराची
अरे, आहे घरघर त्यांत भर्ल्या आभायाची
आतां घरोटा घरोटा दयन मांडलं नीट
अरे, घंट्या भरामधीं कर त्याचं आतां पीठ

चाल घरोटा घरोटा तुझी चाले घरघर
तुझ्या घरघरींतून पीठ गये भरभर
जशी तुझी रे घरोटा पाऊ फिरे गरगर
तसं दुधावानी पीठ पडतं रे भूईवर

अरे, घरोटा घरोटा तुझ्या माकनीची आस
माझ्या एका हातीं खुटा दुज्या हातीं देते घांस
अरे, घरोटा घरोटा घांस माझा जवारीचा
तुले सनासुदी गहूं कधीं देते बाजरीचा

माझा घरोट घरोट दोन दाढा दोन व्होट
दाने खाये मूठ मूठ त्याच्यातून गये पीठ
अरे, घरोटा घरोटा माझे दुखतां रे हात
तसं संसाराचं गानं माझं बसते मी गात

अरे, घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटीं
दाने दयतां दयतां जशी घामानं मी भिजे
तुझी घरोटा घरोटा तशी पाऊ तुझी झिजे

झिजिसनी झिजीसनी झाला संगमरवरी
बापा, तुले टाकलाये टकारीन आली दारीं !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

दया नही मया नही

दया नही मया नही, डोयाले पानी
गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी

केसावार रुसली फनी
एकदा तरी घाला माझी येनी

कर्‍याले गेली नवस
आज निघाली आवस

आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही
टाया पिटीसनी देव भेटत नही

पोटामधी घान, होटाले मलई
मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई

तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला
पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला

मानसानं घडला पैसा
पैशासाठी जीव झाला कोयसा

मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर
दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर

डोयाले आली लाली
चस्म्याले औसदी लावली

वडगन्याले ठान नही
घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही

म्हननारानं म्हन केली
जाननाराले अक्कल आली


कवियत्री - बहिणाबाई चौधरी