बाभुळझाड

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे ll२ll

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll३ll

जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांदयावरती सुतारांचे
घरटे घेउन उभेच आहे ll४ll


कवी - वसंत बापट

सौंदर्याचा अभ्यास कर!

गाणें हें रचिले असें जुळवुनी कोठून कांहींतरी,
वाणी सत्य तुझी असेल भरली द्वेषानलानें जरी;
रम्याकार चमत्कृतिप्रचुर हें ब्रह्मांड नेत्रीं दिसे.
खेळे कांहिंतरीं तयांतुनि, मनीं गाणें तदा होतसे.

सूर्याची किरणें, सुनिर्मल तशा त्या तारकामालिका,
संध्येचे रमणीय रंग, उदयीं सृष्टी मनोहारिका,
वृक्ष श्यामल पुष्पसंकुल चलद्‍दूर्वादलाच्छादिता,
वाहे शांतपथा सुरम्य सरिता कल्लोलमालायुता;

प्रेमाने अभिषिक्त चित्र मग त्या रामण्यविश्वीं दिसे;
चित्ताची रमणीयता उतरुनी संगीत होतें तसें
तें सौंदर्यच आणीलें जुळवुनी कोठून कांहीतरी.
तूंतें तें न दिसे म्हणून सखया अभ्यास याचा करी.


कवी - बालकवी

चाफेकळी

"गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी!
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?"

ती वनमाला म्हणे "नृपाळा, हें तर माझे घ्रर;
पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे--
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें"

"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी! तुला;
तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.
तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी!
क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं."

सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं धडें;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनबाला म्हणे नृपाळा "सुंदर मी हो खरी,--


(हि कविता बालकवींच्या देहान्तामुळे अपूर्णच राहिली )

कवी - बालकवी 

शून्य मनाचा घुमट

शून्य मनाच्या घुमटांत
कसलें तरि घुमतें गीत;
अर्थ कळेना कसलाही,
विश्रांती परि त्या नाहीं;
      वारा वाही,
      निर्झर गाई,
      मर्मर होई.

परि त्याचे भीषण भूत
घोंघावत फिरतें येथ.
दिव्यरूपिणी सृष्टी जरी
भीषण रूपा एथ धरी;
जग सगळे भीषण होतें
नांदाया मग ये येथें;
      न कळे असला,
      घुमट बनविला,
      कुणीं कशाला?--


कवी - बालकवी


आत्मारामाची भूपाळी

उठा प्रातःकाळ झाला । आत्माराम पाहूं चला ।
हा समयो जरिं टळला । तरि अंतरला श्रीराम ॥ध्रु०॥

जीव-शिव दोघेजण । भरत आणि शत्रुघन ।
आला बंधु लक्षुमण । मन उन्मन होऊनी ॥१॥

विवेक वसिष्ठ सद‌गुरु । संतसज्जन मुनीश्वरु ।
करिती नामाचा गजरु । हर्षनिर्भर होउनियां ॥२॥

सात्त्विक सुमंत प्रधान । नगरवासी अवघे जन ।
आला वायूला नंदन । श्रीचरण पाहावया ॥३॥ 

कोठुनि येते मला कळेना

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !


कवी - बालकवी

मधुयामिनी

मधुयामिनि नील-लता
हो गगनीं कुसुमयुता
धवलित करि पवनपथा
कौमुदि मधु मंगला--

दिव्य शांति चंद्रकरीं
आंदोलित नील सरीं
गिरिगिरिवरि, तरुतरुवरि
पसरे नव भूतिला--

सुप्रसन्न, पुण्य, शांत
रामण्यकभरित धौत
या मंगल मोहनांत
विश्वगोल रंगला.


कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)