प्रीत

ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग


कवी - ग्रेस

वाटा

माझ्या मनापाशी

चैतन्याचा क्षण

निळी आठवण

बाभळीचे डोळे

डोळ्यांतला काटा

माझा मला वाटा


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

एक

एक हात तुझा एक हात माझा

जसा शब्द खुजा शब्दापाशी

एका हृदयाला एकच क्षितिज

आकाशाचे बीज तुझ्या पोटी

एका कुशीसाठी एकाचे निजणे

बाकीची सरणे स्मशानात


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

वाटेपाशी

रात्र थांबवुनी असेच उठावे

तुझ्यापाशी यावे क्षणासाठी!

डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी

आणि दिठी दिठी शब्द यावे!

तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा

अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी

आणि उजाडता पाठीवर ओझे

वाटेपाशी तुझे डोळे यावे!


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

मर्म

ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
…असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

अलगद भरूनी यावे

क्षितिज जसे दिसते,
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी.

गाय जशी हंबरते,
तसेच व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही;
अलगद भरूनी यावे.



कवी - ग्रेस

दगडाची पार्थिव भिंत

मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।

जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।

दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।
'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।


कवी - मनमोहन नातू