आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.


कवी - बा. सी. मर्ढेकर

बा. सी. मर्ढेकर

बाळ सीताराम मर्ढेकर (जन्म-डिसेंबर १, १९०९ मृत्यू- मार्च २०, १९५६) हे युगप्रवर्तक कवी; त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते. 

त्यांचा जन्म खानदेश जिल्ह्यातील फैजापूर येथे झाला. मर्ढेकरांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. मूळ आडनाव गोसावी असले तरी गावाच्या नावावरून मर्ढेकर हे आडनाव रूढ झाले. मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरूड हायस्कूल- मध्येही त्यांचे शिक्षण झाले.

बा.सी. मर्ढेकरांचे मूळ नाव ‘रमेश’ होते. घरी त्यांना ‘बाळ’ या नावाने संबोधले जात असे; त्यामुळे तेच नाव पुढे सर्वतोमुखी झाले. शाळेत असताना मर्ढेकरांनी त्यामुळेच ‘रमेश-बाळ’ या टोपणनावाने लेखन केले.

बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

‘शिशिरागम’ हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘कांही कविता’ (१९४७), ‘आणखी काही कविता’ (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह निघाले. या तिन्ही संग्रहांतील एकूण १२६ कविता व कवितासंग्रहांत समाविष्ट न झालेल्या सहा कविता, अशा एकूण १३२ कविता मर्ढेकरांच्या नावावर आहेत.


मर्ढेकरांच्या ‘कांही कविता’ या संग्रहातील नवकवितांवर अश्‍लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला (१९४८). तो त्या काळात खूपच गाजला. मर्ढेकरांनी त्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले व त्यातून ते निर्दोष ठरले. परंतु या खटल्याचा मानसिक त्रास मर्ढेकरांना खूप झाला. त्याचा परिणाम मर्ढेकरांच्या सर्जनशीलतेवरही झाला. १९४८ ते १९५६ या काळात त्यामुळेच मर्ढेकरांच्या प्रतिभेचा पूर्वीचा बहर पाहायला मिळत नाही.

मर्ढेकर यांना १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार "सौंदर्य आणि साहित्य" साठी प्रदान करण्यात आला.

मर्ढेकरांचे प्रकाशित साहित्य असे : 
कवितासंग्रह −शिशिरागम(१९३९), काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१) 
कांदबऱ्‍या− रात्रीचा दिवस (१९४२), तांबडी माती (१९४३), पाणी (१९४८) 
नाटक−नटश्रेष्ठ (१९४४) 
संगीतिका−कर्ण (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७) 
समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय−आर्ट्‌स अँड मॅन (१९३७), वाङ्मयीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन ॲन इंस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्या आणि साहित्य (१९५५). 

जन्म

नाही कोणी का कुणाचा । बाप-लेक, मामा-भाचा,
मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री? ॥

आई गोंजारते मुला । कासया हा बाप-लळा,
बाईलप्रीतीच्याही कळा । कशास्तव? ॥

येतें ऊर कां भरून । जाती आतडीं तुटून,
कुणी कुणाचा लागून । नाही जर? ॥

कैसा बांधला देखावा । जननमरणांतून देवा,
कुशीकुशींत गिलावा । रक्तमांसीं? ॥

का हें बांधकाम सुंदर । फक्त नश्वरतेचेंच मखर
अथवा दर्शनी महाद्वार । मिथ्यत्वाचें? ॥

मग कोठे रे इमारत । जिचें शिल्पकाम अद्भुत,
जींत चिरंतनाचा पूत । वावरें की? ॥

जरी कुठे ऐसें धाम । ज्याच्या पायऱ्याही अनुपम
आणि चुना-विटा परम । चिरस्थायी ॥

तरी मग रोकडा सवाल । कोरिसी हाडांचा महाल,
ठेविशी त्यांत हरिचा लाल । नाशवंत ॥

वास्तुशास्त्र कां बिलोरी । योजिशी येथेच मुरारी,
घडसी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच?


कवी - बा. सी. मर्ढेकर

अस्थाई

अस्थाईवर स्थायिक झालों,
चुकून गेला पहा अंतरा
ओरडून का अता लागणे
ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा!

नशेत झुकला निशापती अन्
अस्मानाच्या कलल्या तारा;
अंधारावर विझून गेला
रात्रीचा या वीज-पिसारा

क्लिन्न मनोगत मोटारींचें
कुशींत शिरले काळोखाच्या;
नालबंद अन् घोड्याची ये
टाप समेवर जिवंततेच्या.

शांत जगाच्या घामावरला
उडून काळा गेला वास;
बेटाबेटांतुनी मनांच्या
जराच हलला श्वासोच्छ्वास.

अस्थाईवर पुन्हा परतलों,
चुकून गेला पहा अंतरा;
ढिल्या गळ्यावर षड्ज बांधणें
अता खालचा परंतु हसरा.


कवी - बा.सी.मर्ढेकर

सकाळी उठोनी

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुणाच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||


कवी - बा. सी. मर्ढेकर.

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

माझं आपलं असं प्रेम !!!!

चंद्र सुर्य आणून देईन,
पदरात घालीन लक्ष तारे !
बांधून ठेवीन तुझ्या दारी,
तुझ्या केसांशी खेळते वारे !!!

असं मी मुळीसुद्धा म्हणणार नाही
उगाचं भाव खाण्यासाठी मी खोटं बोलणार नाही...

माझं आपलं सरळसोट सांगण
"माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
अगदीच 'हीर - रांझा' नसलं तरी
थोडं थोडसं सेम आहे !!!

पेट्रोल जाळत फ़िरणं तुझ्यापाठी
मला अजिबात जमणार नाही,
शायनिंगसाठी पैसा उधळणं
मला अजिबात झेपणार नाही.

तरीसुध्दा मार हाक मनापासुन कधी !
उभा असेन तुझ्यासमोर तुझ्यासुद्धा आधी !!!
कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे !
हां ! 'जॉन - बिपाशा' सारखं नाही
माझं आपलं माझ्यासारखं प्रेम आहे !!!!

आणखी एक खरं सांगतो,
तुझं माझ्यावर आणि
माझं तुझ्यावर प्रेम असलं तरी !
'केवळ' सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी
बघत राहीन इतर पोरी !!

पण हे अगदी नक्की त्या कितीही सुंदर असल्या
आणि कितीही मोहक हसल्या तरी,
तुझ्याचं खळीवर पागल होतो,
तुझ्याचं बटांवर पागल आहे आणि
तुझ्याचं डोळ्यात आकाश बघेन !!